'मॅड'

हानपणापासून माझा सर्वात आवडता छंद आहे तो पुस्तक वाचण्याचा. हलक्याफुलक्या कथा असलेली पुस्तकं ,ऐतिहासिक कादंबर्‍या, धीरगंभीर वास्तववादी पुस्तकं, माहितीपर पुस्तकं अश्या अनेक प्रकारच्या पुस्तकांचा मी आजवर खूप आस्वाद घेतला आहे. लहानपणी माझे मित्र मला नेहमी म्हणायचे, आम्हाला ही शाळेची पुस्तकं वाचायलाच जीवावर येते आणि तू इतकी जाडजाड पुस्तक कशी वाचत बसतो. मॅडच होते ते , त्यांना काय माहीत की खरं तर पुस्तकं वाचायला कुठे लागतात, ती मनापासून उघडली की  स्वत:हूनच ती आपल्याला सगळं सांगत राहतात. आपल्यासमोर सगळी दृश्य जिवंतपणे उभी करतात. तर अश्या ह्या माझ्या पुस्तकवेड्याच्या मनात एक कोपरा खास वपुंच्या पुस्तकांसाठी निरंतर राखून ठेवलेला आहे आणि तसाच एक वेगळा कोपरा 'शाळा' व 'दुनियादारी' ह्या पुस्तकांसाठी राखून ठेवलेला होता. गेली किती तरी वर्ष ही दोन पुस्तक त्या कोपर्‍यात गुण्यागोविंदाने राज्य करीत होती.
पण काही दिवसापूर्वीच त्यांना त्यांचं राज्य 'लंप्या' बरोबर वाटून घ्यावं लागलं. कोण लंप्या ? तुमच्यापैकी अनेक जण कदाचित ओळखत असाल ह्या लंप्याला, पण अगदी गेल्या महिन्याभरापर्यंत मी तरी ह्याला ओळखत नव्हतो. एकाच दिवशी मनाली (स्वच्छंदी) आणि रश्मी (मनस्वी) ह्या दोघींच्या ब्लॉगवर सर्वप्रथम ह्या मॅड लंप्याची मॅड ओळख झाली. मग काही दिवसातच मी हळुवारपणे लंपनच्या मॅड भावविश्वात प्रवेश केला आणि मग काय, मला तो एकदम 'बेष्ट'च वाटला. आणि शेवटी ते काय म्हणतात ना त्यातली गत... लंप्याने थोड्याश्या  मॅड असलेल्या मला पूर्ण  मॅड केलं,' कम्प्लेट' मॅड... अश्या त्या मॅड लंप्याची मी तुम्हाला इथे ओळख करून देणार आहे. साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण....

तर  'लंप्या' म्हणजेच 'लंपन' हा प्रकाश नारायण संत ह्यांच्या कथासंग्रहामधील नायक - कर्नाटकातील कारवार नजीकच्या एका छोट्याश्या गावात आपल्या आजी-आजोबांबरोबर राहणारा अगदी कोवळ्या वयाचा एक शाळकरी मुलगा. त्याचं स्वत:च एक वेगळंच जग आहे. आजूबाजूचे सगळे सजीव-निर्जीव घटक त्याला   ह्या ना त्या कारणाने  मॅड वाटतात. अनेक छोट्या छोट्या गोष्टीचं निरीक्षण करायची त्याची मॅड सवय आहे. एकदा का  हात डोक्यामागं घेऊन तो एखाद्या गोष्टीकडे पाहू लागला की मग त्याला वेळ-काळाचे काही भान राहत नाही. त्याच्या डोक्यातील चक्र नेहमी चालूच. प्रत्येक गोष्टीचा तो एकोणविसशे  वेळा विचार करतो. त्या निरीक्षणावरून तो अनेक भन्नाट  'लॉजिक' लावतो. छान छान गाणी गायला त्याला आवडतात. वाचनाची तर त्याला  प्रचंड हौस, अगदी पुस्तकवेडा. त्याला नेहमी दहा बारा तासांऐवजी खरं तर एकोणीस-तास झोपावंसं वाटतं. कधीतरी, आईपासून दूर राहत असल्याने तो थोडासा हळवाही होतो. त्याला त्याची शाळा  खूप आवडत असते कारण ह्याच शाळेत त्याच्या आईने शिक्षण घेतलेलं असतं. त्याची एक मैत्रीणही आहे सुमी नावाची, का कोण जाणे पण हिची नुसती आठवण आली तरी त्याला पोटात काहीतरी गडबड झाल्यासारखं वाटतं. तर असा आहे हा आमचा लंप्या.


हा निरागस, अल्लड, आपली अचाट कल्पनाशक्ती वापरणारा आणि थोडासा संवेदनशील लंपू आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जातो. त्याचे आजी-आजोबा, आ‌ई-बाबा, सुमी, बाबूराव, मनी आणि लहान बाळ बिट्ट्या, कणबर्गी गंग्या, टुकण्या ,संप्या, परळ्या, यमज्या, हणब्या, एशी, केबी, वंटमुरीकर देसाईंचा बोका, 'लक्ष्मी' झाड, तिथलं तळं, 'हंपायर' जंब्या कटकोळ, लंप्याचा गामा पैलवान खेकडा, ड्रिलचे मास्तर हत्तंगडी, आचरेकरबाई, म्हापसेकर सर , सायकलचं  दुकान चालवणारा टी. जी.  कासारगोड, नकादुतले खंडागळे मामा, सोन्याबापू, तेलसंगी, हिंडलगेकर अण्णा, साउथ इंडियन तुंगभद्रा, सांबप्रसादचं घर, दुंडाप्पा हत्तरगीच्या टांगा , लंपूला त्याच्यासारखाच एकटा वाटणारा गुंडीमठ रोड अश्या कितीतरी जणांची तो त्याच्या भावविश्वातून ओळख करून देतो; आणि ही सगळी सजीव-निर्जीव पात्र आपल्यासमोर जिवंत होऊन उभी राहतात. आपण एकवीसशे त्रेचाळीस वेळा सगळं परत परत वाचत राहतो. लंपूही आपला हात धरून आपल्याला सगळीकडे हिंडवत राहतो. हळूहळू काळ-वेळेचे, जागेचे, वयाचे सगळे बंध निखळून पडतात. त्याच्याबरोबर मॅडसारख भटकत असताना तो  आपला खास की काय तसा मित्र होऊन जातो. अनेक धागे जुळत जातात. आणि मग अचानक कधीतरी नकळत आपणच लंप्या होऊन जातो.


लंप्याला आपल्याशी अशा प्रकारे जोडण्याचे सगळे श्रेय प्रकाश नारायण संतांच्या अप्रतिम लेखनशैलीला जाते. त्यांचे वडील उत्तम ललितलेखक होते तर त्यांच्या आई इंदिरा संत ह्यांच्याबद्दल काही वेगळं सांगायला नको. वयाच्या सतराव्या वर्षीच ललित लेखनास सुरुवात करणार्‍या प्रकाश नारायण संतांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत ह्या घराण्याला अजून एका उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांनी अडनिडं वयातील मुलांच्या भावविश्वाचे अगदी  सूक्ष्म निरीक्षण केले असल्याचा साक्षात्कार ही पुस्तक वाचतांना आपल्याला वारंवार होतो. कथेची उत्तम बांधणी , अगदी जिवंत वाटणारी वर्णनं, साधी सरळ भाषा, कानडी वळणाच्या मराठी बोलभाषेचा जागोजागी  छान वापर, ह्या त्यांच्या ह्या लेखनातील अगदी जमेच्या बाजू . ते उत्तम चित्रकारही होते. त्यांच्या पहिल्या तीन पुस्तकांसाठी त्यांनी स्वतःच रेखाटनं केली होती. ‘मॅड‘ हे मॅड विशेषण कशासाठीही वापरणं, आपल्याला अगदी त्या वयात घेऊन जाणार्‍या शब्दरचना,(खालील मंत्र वाचा) वेगवेगळ्या संख्यांचा वाक्यातला उपयोग, आडवयातील मुलाच्या नजरेतून विविध गोष्टी मांडण्याचं प्रचंड कौशल्य, लंपनचे वेगवेगळया लोकांबरोबर जुळवलेले हळुवार ऋणानुबंध सगळं सगळं आपल्यावर एक वेगळीच जादू करते. मी ह्याचवर्षी कारवार भागाला भेट दिलेली असल्याने ह्या पुस्तकातील अनेक वर्णनांना चांगलाच 'रिलेट' करू शकलो.


गोट्या खेळतांनाचा प्रकाश नारायण संतांनी सांगितलेला भन्नाट मंत्र इथे टाकावासा वाटतोय ....

पंचापांडू - सह्यादांडू - सप्तपोपडे - अष्ट जिंकिले - नऊनऊ किल्ले - दश्शा पेडा - अकलकराठा बाळू मराठा - तिरंगी सोटा - चौदा लंगोटा - पंधराशी परिवळ - सोळी घरिवल - सतरम सीते - अठरम गरुडे - एकोणीस च्यकच्यक - वीसा पकपक - एकवीस कात्री - बावीस रात्री - तेवीस त्रिकाम फुल - चोवीस चोर - पंचवीस मोर

वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर ह्या चार पुस्तकातून लंपनचं भावविश्व  तरलपणे उलगडून दाखवतांना ते आपल्याला मनमुराद आनंद देतात. ही चार पुस्तकं म्हणजे एक आगळावेगळा खजिनाच आहे. ह्या चार पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यातलं कोणतंही एक पुस्तक वाचलं तरी ते अपूर्ण वाटत नाही. पण एकदा का तुम्ही ह्या लंपनच्या भावविश्वात शिरलात की चारही पुस्तकं कशीही मिळवून तुम्ही ती मॅडसारखी वाचून काढेपर्यंत किंवा त्यानंतरही तुम्ही लंपनला सोडत शकत नाही आणि तो ही तुम्हाला सोडत नाही. ही सगळी पुस्तकं वाचतांना आपल्याला निखळ आनंद  देतात पण त्याच बरोबर अनेक कथांच्या शेवटी घडलेल्या घटना मनाला चटका लावून जातात. ' झुंबर' मधील 'स्पर्श' ह्या कथेत आपल्या वडिलांच्या मृत्यूची जाणीव झालेला लंपन  तर अंगावर काटा आणतो. खूप हुरहूर लावून जाते ती कथा. लंपनच्या आयुष्यातील तरुणपणाच्या दिवसांवर संतांना एक कादंबरी लिहायची होती पण 'झुंबर' हा कथासंग्रह प्रकाशित होण्यापूर्वीच त्यांचं निधन झालं, आणि मराठी रसिक एका अतिशय चांगल्या कादंबरीला आणि लेखकाला मुकले असं मला वाटतं. खरंच संतांचा तरुणपणाचा लंपन कसा असता... ह्याचं उत्तर कधीच मिळणार नाही ह्याची खात्री असूनही  ह्याबद्दल  कधीकधी खूप विचार करतो मी ...


लहानपणापासून सत्याण्णव हजार चारशे त्रेचाळीस  पुस्तकं वाचलेली असतांना  इतका चांगला कथासंग्रह  वाचनात  कसा आला नाही ह्याचं मला खूप आश्चर्य वाटलं; आणि मला लंप्याची ती ओळ आठवली. "माझ्यासारखा मॅड शोधूनही सापडणार नाही. असला मॅड म्हणजे दहा गुणिले दहा भागिले शंभर! मी. एकच!".  मग माझ्यासारखे अजूनही काही पुस्तकवेडे महाभाग असतील ज्यांची लंप्याशी ओळख झालेली नसेल  असं वाटलं आणि  त्यांच्यासाठी हा लेखनप्रपंच. खरंच कधीतरी अगदी मॅड सारखे काहीतरी वाचत सुटावं असं वाटलं  तर लंपनच्या मॅड  भावविश्वात जरूर प्रवेश करा ... एक वेगळाच मंतरलेला मॅड अनुभव तुम्हाला मिळेल...


"लंप्याच्या भाषेत सांगायचं म्हणजे, 'एकदा नाही, दोनदा नाही तर अठ्ठावीसशे तीस वेळा जरी ह्या कथा ' मॅड सारख्या वाचल्या' तरी त्या ताज्याच वाटतील. एक निराळ्याच शैलीचा आणि वाचकाशी चटकन संवाद साधून त्यालाही लंप्याच्या वयाचा करून टाकणारा कथासंग्रह मराठीत येतो आहे ह्या आनंदात मी आहे....."- इति पुल.


लेखक: देवेंद्र चुरी

७ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

मस्तच आहे पुस्तक परिचय. वाचायलाच हवं असं खास काही.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

मस्त... एका बैठकीत वाचून संपवलं होत. मला खूप आवडतं :) :)

Priyanka Joshi म्हणाले...

खूप खूप धन्यवाद ह्या पुस्तकाबद्दल कळविल्याबद्दल..i couldn't believe u actually ve read 97,443 books till date?? really?

सुधीर कांदळकर म्हणाले...

पुस्तक परिचय नंबर एक झालं आहे. शारदा संगीत असो की पंखा नाहीतर झुंबर, बहुतेक कथानके चटका लावून जातात. पंखा मधल्या कॅरमपटूंच्या परिस्थितीचा फेरा देखील. सगळी पुस्तके जरूर वाचावीत.

उत्तम पुस्तक परिचय केलात आणि प्राजक्ताचे झाड हलवून फुलांचा सडा पडावा तसा स्मृतींचा दरवळ हलवून गेला.

अमित गुहागरकर म्हणाले...

सुंदर पुस्तकपरिक्षण. चारही पुस्तकं विकत घेवून वाचेनच आता.

Manali Satam म्हणाले...

आमच्या "स्वच्छंदी" चे नाव इथे आलेय, माहीतच नव्हते! या पुस्तकांनी वेड लावलय म्हटलं तरी हरकत नाही...
>>>"दहा गुणिले दहा, भागिले शंभर" +१

indraneel म्हणाले...

खूपच सुंदर. अगदी एकोणतीस गुणिले एकोणतीस गुणिले एकोणतीस वेळा जरी लंपन बद्दल वाचले ना तरी समाधान होत नाही. इतक्यातच मी मराठी पुस्तक मित्र या पुस्तकांच्या ब्लॉग साठी लंपन वर एक लेख लिहिला. तेव्हा या लेखाची माहिती मिळाली. सुंदर मांडलंय तुम्ही. :) माझं विवेचन तुम्ही वाचू शकता इथे http://marathipustakmitra.com/2013/05/06/lampan-vanvaas-prakash-narayan-sant/