बिल!

"साहेब, ह्यावेळच्या विस्तारातपण जर त्या समाजाला एकही मंत्री मिळाला नाही, तर ते परत दहा आमदारांची धमकी द्यायला लागतील."
"अहो लक्ष देऊ नका तिकडे. दहा आमदारांच्या धमक्या गेली अडीच वर्षं देताहेत. समित्यांवर बसून मजा मारायला मिळतेय, ती पण जाईल त्यांची. पुन्हा दहानं मोठा फरक पडायचा नाही, तीन-चार इथून तिथून सहज मिळून जातील. तुम्ही त्यापेक्षा गृहमंत्रीपदाचं काय करता येतं ते बघा. मागच्या अतिरेकी हल्ल्यात राजीनामा घेतला होता आपण आबांचा, आता तर एक निवडणुकही उरकलीय, बराच काळ गेलाय. पुन्हा बसवा त्यांनाच."
"अहो पण साहेब ते मित्रपक्षाचे लोक.."
"त्यांना बोंबलू दे हो. त्यांची मलिदेवाली खाती जाणार नाहीत तेव्हढं बघा म्हणजे झालं. आणि दोन-चार राज्यमंत्री इथे-तिथे देऊन टाका."
"पण ते ह्यावेळेस अजून मंत्री मागणार नाहीत कशावरून."
"मागतील ना, पण आमदार आपले जास्त आहेत. गेल्यावेळेस त्यांचे जास्त होते, तेव्हा त्यांची दादागिरी आपण सहन केली. आघाडीचा धर्म आहे तो!"
"ह्म्म.. पण साहेब, ह्या विस्ताराची आत्ता फारशी गरज नव्हती. फुकटच मित्रपक्षाला दोन-चार मंत्रीपदं खैरातीत द्यावी लागणार, आपले आमदार कमी होते, तेव्हा आपल्याला खूपच कमी मंत्रीपदं होती."
"भाऊ, अहो आपल्याला आपले अपक्ष राखायचेत की नाहीत? आणि उद्या विकास पार्टीवाल्यांची कुलंगडी बाहेर पडली आणि त्यांचा राजीनामा मागायची आपल्यावर पाळी आली, तर त्यांचे वीस आमदार राजीनामे फडकवतील, तेव्हासाठी बॅक अप हवा आपल्याकडे."
"ह्म्म."

-----

"ए अकबर, ती हातोडी दे रे." विनय ओरडला.
पंधरा वर्षांचा अकबर धावत धावत हातोडी घेऊन आला. विनयनं अलगद खाली वाकून ती हातोडी घेतली आणि मग सराईतपणे बांबूंच्या त्या सांगाड्यावरून चढत वर गेला. कोपर्‍यावरती खिळा ठोकून त्यात कापडाचं टोक अडकवलं आणि पुढच्या कोपर्‍याकडे गेला. अकबर कुतूहलानं हे सगळं पाहत होता.
भव्य मैदानावरती तितकाच भलाथोरला तंबू उभारण्याचं काम सुरू होतं. दुसर्‍या दिवशी मंत्रिमंडळाचा शपथविधी तिथे होणार होता. वातानुकूलित तंबूचं बांधकाम युद्धपातळीवर सुरू होतं. मैदानाच्या दुसर्‍या कोपर्‍याशी डेकोरेटर्सचा तांत्रिक चमू काहीतरी करत होता. विनय भल्याथोरल्या बांधकामामध्ये कुठेतरी हरवलेला पाहून अकबर तांत्रिक चमूचं काम पाहण्यासाठी निघून गेला.

"काय रे अकबर, कधीपासून लागलास शेठकडे?" दुपारी टपरीवर जेवताना विनयनं विचारलं.
"कलहीच." अकबर तिखट लागल्यामुळे नाकातून वाहणारं पाणी पुसत म्हणाला.
"तुला काही शाळा-बिळा नाही का?" विनयनं अचानक विचारलं.
अकबरला क्षणभर सुचेचना काही. त्यानं टेबलावर नजर फिरवली, सगळे दमलेभागलेले जीव बकाबक खात होते, फक्त विनय थांबून अकबरच्या उत्तराची वाट पाहत होता.
"महिन्याभरापूर्वी अब्बा वारले माझे..."
"बस बस. कळलं मला. जेव आता." विनय एकदम घाईघाईत त्याला पुढे बोलू न देता म्हणाला.

-----

एक जुनाटशी ऍम्ब्युलन्स थडथडत म्युनिसिपल हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये शिरत होती, तेव्हाच विनय हॉस्पिटलच्या गेटसमोर रिक्षातून उतरला. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि लक्षपूर्वक हाताचा आधार देऊन रिक्षामधून आपल्या आईला उतरवू लागला.
"तिथे लाईनमध्ये जाऊन बसा." इमर्जन्सी वॉर्डातल्या नर्सनं कोर्‍या चेहर्‍यानं भल्याथोरल्या हॉलच्या एका टोकाकडे बोट दाखवत म्हटलं.
विनय खोकणार्‍या आईला आधार देत कोपर्‍याकडे निघाला. 'जुनी असल्यामुळे प्रशस्त बिल्डिंग आहे.' विनय मनाशीच विचार करत होता.
दोनेक तास लाईनमध्ये बसून आणि आईचा खोकला वाढतच चालल्यानं त्याचा संयम संपला. त्यानं मोबाईलवरून मित्राला फोन लावला आणि थोड्याच वेळात तो एका खाजगी क्लिनिकमध्ये पोचला. चटकन एक्स-रे काढण्यात आला आणि त्याला एका डॉक्टरांचा रेफरन्स देण्यात आला, आणि त्यांच्या कन्सल्टेशन रूमसमोर नेऊन त्याला बसवण्यात आलं. आतला पेशंट बाहेर आला की पुढचा नंबर त्याचा.\

डॉक्टरांची फी फार जास्त नसली तरी बजेटच्या बाहेरच होती, पण आईच्या तब्येतीपुढे काहीच जास्त नव्हतं. घोळ तिथेच झाला होता. आईला टीबी झाल्याचं निदान होतं. तिला हॉस्पिटलाईज करणं भाग होतं. त्यातल्या त्यात चांगलं पण स्वस्त असं हॉस्पिटल डॉक्टरांनीच सजेस्ट केलं. आणि औषधं लिहून दिली, जी हॉस्पिटलच्या डॉक्टरांना वाचायला देण्यास सांगितलं.
त्यानं आईला हॉस्पिटलाईज केलं आणि मग डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या परवानगीनुसार घेऊन आला. आईला कदाचित तीन-चार दिवस तिथेच राहावं लागेल असं त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि तिच्या वॉर्डबाहेर रात्री थांबण्याची परवानगी दिली. मग तो धावतपळत घरी गेला आणि आईसाठी काही हलकं जेवण तयार करून पुन्हा हॉस्पिटलला पोचला.

-----

"तुझे वडील मिल्ट्रीत होते ना? त्याचा काही उपयोग होत नाही काय सरकारी हॉस्पिटलांमध्ये?" रमाकांत विचारत होता. विनयनं शेठकडे फोन करून कळवलं होतं की दोन दिवस यायला जमणार नाही म्हणून. शेठ आधी पगार कापायची धमकी देत होता, पण आई आजारी आहे सांगितल्यावर एक दिवसाची भरपगारी रजा मंजूर केली होती. मग शेजारीच चालू असलेल्या साईटवर काम करणारा रमाकांत त्याला भेटायला हॉस्पिटलात आला होता.
"त्याचा काही उपयोग नाही रे." विनय शून्यात बघत म्हणाला.
"अरे चहा पी. थंड होईल." रमाकांत हातातल्या कटिंगचा एक घोट घेत म्हणाला. दोघे हॉस्पिटलबाहेरच्या टपरीवर बसले होते.
"माझा बाप युद्धात शहीद झाला. पण आम्हाला चक्राशिवाय काही नाही मिळालं." विनय थोडासा कडवटपणे म्हणाला.
"पैसे?"
विनय कुत्सित हसला, " मिळाले ना. बाप मेल्याच्या तीन वर्षांनंतर मिळाले. माझी शाळा सुटली होती. वीरचक्र मोडून विकून झालं होतं आणि मीच गावच्या सुताराकडे काम करताना सुट्ट्या टाकून सरकारी ऑफिसांमध्ये खेटे घालून ते मिळवले." विनयनं चहाचा एक घोट घेतला.

-----

"काय रे आई कशी आहे?" रमाकांतनं ऑफिसात शिरणार्‍या विनयला पाहून विचारलं.
"डॉक्टर सांगताहेत बरी आहे आता. औषधं लिहून दिलीत आणि आराम करायला सांगितलाय. चाळीतच एक बाई डबा देतात, त्यांना सांगून आलोय."
"मग आजपासून काम सुरू तुझं?"
"हो रे. म्हणून तर आलो. शेठनं एकच दिवस भरपगारी दिली होती रजा. आधीच हॉस्पिटलचं बिल अन औषधांच्या खर्चाचे लाखभर झाले रे. बँक अकाऊंट रिकामं होत आलंय. त्यात दोन दिवसाचा पगारही गेला."
"गेला नाही. तुझी रजा भरपगारी करायला सांगितलीय शेठनी." अकाऊंटंटचा असिस्टंट रघू म्हणाला. तो सिगरेट फुकून आत शिरत होता.
"काय सांगतोस?" विनयच्या चेहर्‍यावर एकदम वीतभर हसू उमटलं.
"अरे मोठा लग्गा लागला ना आपल्याला!" रघू त्याची पाठ थोपटत आत गेला.
विनयला अजून उलगडा झाला नाही.
"विनय, तू रमाकांतबरोबर जा. तो शपथविधीचा तंबू उतरवायचाय." सुपरवायझर सांगून आत गेला. विनय सही करायचं रजिस्टर शोधू लागला.
"अरे पण शपथविधी तर परवाच होता ना? आज कसा तंबू?" विनय सही करत म्हणाला.
"तोच तर लग्गा, रघू म्हणत होता तो. म्हणूनच शेठ खुशीत आहे." रमाकांत हसून म्हणाला. "चल रस्त्यात सांगतो."

------

गाडी चालवता चालवता रमाकांत बोलत होता, "अरे शपथविधी झाला आणि दहा नवे मंत्री बनले. पण एकाही मंत्र्यानं पंडाल काढायची ऑर्डर दिली नाही. शेठनं तंबू तसाच ठेवला. दोन दिवस एक्स्ट्रा झाले. वीस लाखाचं जास्तीचं बिल झालं. शेठनं मंजूर पण करून घेतलं. सरकारला काय वीस लाख म्हणजे...."


लेखक: विद्याधर भिसे

५ टिप्पण्या:

ArtLover म्हणाले...

काय बोलणार... :(
हेच जळजळीत सत्य आहे...

Priya Patankar - Shinde म्हणाले...

छान कथा

क्रांति म्हणाले...

हे असंच असतं, आणि असंच चालायचं. कथा चांगली मांडली आहे.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

ह्म्म्म्म... चालायचंच.

Shreya's Shop म्हणाले...

कालाय तस्मै नम:, वर्पासून खालपर्यंत सगळे लुटारू च भरले आहेत.