सुखी संसाराची सोपी वाटचाल....

मोर २५ वर्षांची मुलगी बघितल्यावर बरेचदा चेहर्‍यावर  अविश्वासच दिसायचा! हिच्याकडून जमणार आहे का आपल्या मुलाचं /मुलीचं लग्न? मुळात ही आपल्या मुलापेक्षा वयाने लहान, हिला कितीसं कळणार आहे? हाच अविश्वास, माझा आत्मविश्वास बनला. समोर आलेल्या अनेकांनी माझ्याकडे नोंदणी करायचं टाळलं, पण एकदा का त्यांच्या मुलाला अनुरूप मुली दाखवून दिल्या की मग आपोआप नोंदणी करायचे आणि दुसर्‍या पालकांनाही  घेऊन यायचे. मला कधी कधी गंमत वाटायची. पहिल्या भेटीत आणि आत्ताच्या भेटीत किती फरक झालाय या माणसांच्यात! जशी जशी लग्न ठरत गेली तस तसा माझाही आत्मविश्वास आणखीन वाढला. पूर्वीपेक्षा माझ्यातही बराच बदल  झाला होता ! पूर्वी सिंहाचा चेहरा घेऊन असायचे मी पण मनात मात्र उंदीरच दडलेला  असायचा. आता जे चेहर्‍यावर आहे तेच मनातही. गेल्या २ वर्षात बरंच काही बदललंय!

अनेक मुलं आणि मुली. जे लक्षात राहिलेत आणि ज्यांना विसरणं कठीण आहे. कधी अवाजवी अपेक्षांमुळे तर कधी पत्रिकेवर अती विश्वास. कधी बाह्य सौंदर्य तर कधी हवा मुलाला गलेलठ्ठ पगार. काहींनी भरपूर विचार करून अपेक्षांची एक चौकट बनवून ठेवलेली. तर काहींनी काहीच विचार केलेला नसतो. सुन्न करून गेलेल्या अशा कितीतरी घटना आहेत.

हुंड्यामुळे परत माहेरी आलेली नाममात्र घटस्फोटित कविता. लग्नानंतर १५ दिवसातच हुंड्यासाठी जाच होऊ लागला. जीवावर बेतलं तेव्हा भावाने माहेरी परत आणलं. सुंदर,सालस आणि नेहमी फ्रेश असणार्‍या कविताने लग्नाचा विचार सोडला. पण लहान भावाला तिची घुसमट कळत होती. त्याने तिला खूप समजावून माझ्याकडे आणली. योगायोगाने तेव्हाच एका घटस्फोटित मुलाचे वडील बाहेर बसले होते. आमची केबिनमधली चर्चा त्यांनी ऐकली आणि, ’माफ करा’ असं म्हणून आत आले. "माझा मुलगा आत्ता बरोबर नाहीये, पण मुलगी आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे. माझ्या अंदाजाने २९ गुण जुळतील. हा मुलाचा फोटो" म्हणून खिशातून एक फोटो काढून दाखवला. पुढच्या रविवारी कविता आणि तिचा भाऊ, लग्न ठरल्याची, आणि रजिस्टर लग्न करत असल्याची बातमी घेऊन आले.

राहुलची कथा वेगळीच. जागरण, गोंधळ झाल्यावर सर्वजण जेजुरीला गेले. गाडी पार्क करून उतरतात तोच बायको, समोरच उभ्या असलेल्या एका तरूणाची  ' हा माझा बॉयफ्रेंड ’ अशी ओळख करून देते. दचकलेला राहुल आणि त्याचे आई वडील तिच्याशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना न जुमानता ती त्या तरूणाबरोबर बाइकवरून गेलेली असते. (लग्नात सासरकडून घातलेल्या मंगळसूत्र आणि चांदीच्या दागिन्यांसहित). राहुल आता प्रत्येक मुलीशी किमान ३ वेळा घराच्या बाहेर भेट झाल्याशिवाय पुढचं मत सांगत नाही. अनेक आई-वडिलांना हे खटकतं. पण राहुलचा निर्णय योग्य आहे. हे सगळं थोड्या-फार फरकाने अनेकांच्या बाबतीत घडलंय. कधी घटस्फोट होतो तर कधी मनाविरुद्ध  संसार चालू राहतो. राहुलच्या धाकट्या भावाने 'मी लग्नच करणार नाही' अस आई बाबांना सांगून ठेवलंय. त्या एका मुलीने पूर्ण घराच्या आनंदावर विरजण टाकलंय.

यात दिलासा म्हणून माझी भेट झाली ती कौशलशी. कौशलच्या आणि त्याच्या आई-वडिलांच्या अपेक्षा माफक होत्या. बरेच जण, आम्हाला काहीही नको पण तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे सोनं घाला असे म्हणणारे असतात. पण कौशलचे आई-वडील ’आम्हाला काही नको’ असे ठामपणे म्हणणारे होते. अदितीची, घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे लग्नाचा खर्च दोघांत वाटून घेण्याची त्यांची तयारी होती. अदिती आणि कौशल सर्व बाबतीत एकमेकांना अनुरूप होते. माझ्याकडून जमत असलेलं हे पहिलंच लग्न. मला बैठकीसाठी आमंत्रण होतं. सगळं काही सुरळीत चालू असताना कौशलच्या मामांनी सोन्याची साखळी आणि लॉकेटची मागणी केली. मुलीकडचे आणि कौशल आणि त्याचे आई वडील जरा गोंधळलेले दिसले. सुपारी फोडून मुलाकडची मंडळी घरी गेली. मी अदितीच्या घरीच होते. कौशलच्या आईचा फोन आला."अगं कीर्ती, सोनं वगैरे काही नकोय आम्हाला. मुलगी सोन्यासारखी आहे तीच हवी आहे फक्त. पण मामा बोलून गेले. चार चौघात त्यांना काही बोलू शकलो नाही, पण आमची काहीच अपेक्षा नाही."
भर लग्नात काही अडथळा नको म्हणून कौशलच्या आई वडिलांनीच लग्नाआधी सोन्याची चेन आणि लॉकेट अदितीच्या आई वडिलांना दिलं आणि तेच लग्नात कौशलसाठी द्यायला सांगितलं. लग्न निर्विघ्नपणे पार पडलं. दोघांचा संसार सुखाचा चालू आहे.

मी केबिनमध्ये असताना बाहेर मनीष आणि सीमाचे आई वडील थांबले होते. इथे मनीष-सीमाचं  हळू हळू बोलणं सुरू झालं. एकमेकांची माहितीही कळली. ’पण, ही मला पसंत करेल का  नाही करणार? त्यापेक्षा नकोच.’ म्हणून त्याने तिचा विचार डोक्यातून काढला. ३-४ दिवसानंतर सीमाच्या घरच्यांनीच विचारलं तेव्हा मनीषच्या चेहर्‍यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

काळाने झडप घालून आपल्या साथीदाराला नेले आणि म्हातारपणाची काठी म्हणून ज्यांच्याकडे पाहतो त्या  मुलांनीही  झिडकारले. अनेक ५५-६० चे वर मानसिक आधारासाठी दुसर्‍या लग्नाचा विचार करतात. पण घरातून पाठिंबा मिळत नाही. अनेक जण मुलांना प्रॉपर्टीतून बेदखल करण्याची तयारी दाखवतात. पण आपल्या समाजामध्ये अशा लोकांसाठी वधू मला अजून तरी सापडल्या नाहीत.

आयुष्यभराचा जोडीदार हा कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही. अजूनही लग्न, पत्रिका बघूनच होतात. आषाढात, पौष महिन्यात,पितृ पंधरवड्यात लग्नाची बोलणी होत नाहीत. नाशिकला  जाऊन नागबळीसाठी   २५-२५ हजार खर्च करणारे अनेक आई-वडील बघितलेत. अमुक तमुक शांतीसाठी  बोटात विविधरंगी खडे आणि अपेक्षांचे मोठ-मोठे डोंगर. वयाची ३५ वर्षे  उलटली तरी कुठेही तडजोड करायला नकार देणारे वधू आणि वर. कितीही जाड मुलगा असला तरी त्याला सडपातळ मुलगीच हवी असते. १२ वी पास मुलीला इंजिनिअर मुलगाच हवा असतो! मुलीला ५,०००रूपये पगार असला तरीही मुलाला पन्नास हजार दरमहा, हीच अपेक्षा असते! मुलाचा अगदी व्यवस्थित व्यवसाय असला तरी मुलाला नोकरी असण्याला जास्त महत्त्व दिलं जातं. मुलगा कितीही जबाबदार, हुशार, मनमिळाऊ असला तरी त्याच्या डोक्यावरच्या गळालेल्या केसांमुळे त्याला नकार येत राहतो. जरा सावळी मुलगी असली तरी तिला नकार येतच राहतो. स्वतः सापत्य घटस्फोटित असले तरी बायको मात्र विनापत्य घटस्फोटित हवी. अपत्य चालणार असेल तर मुलगा नको. आणखीनही बरंच काही....मात्र हे  सगळं बदलण्याची गरज आहे आणि त्यासाठीच माझे प्रयत्न चालू आहेत. घरी कांदेपोहे आयोजित करण्यापेक्षा ऑफिसमध्ये एकमेकांची ओळख करून दिल्यावर मुलं-मुली एकमेकांशी जास्त मोकळेपणाने बोलतात. तरुण पिढी बदलते आहे पण जुनी पिढी आपली मतं  बदलायला तयार नाही. कसंही करा पण वधू-वरांचा शोध डोळसपणे करा. आपल्या अपेक्षा मांडण्याआधी एकदा मनाच्या आरशात स्वतःला जरूर पाहा. भावी आयुष्यासाठी शुभेच्छा.
नांदा सौख्य भरे!

लेखिका: किर्ती शेळके
भ्रमणध्वनी क्रमांक: ९८२२३५५८८७
लग्नघर
१२१६,कसबा पेठ, दुकान क्रमांक ३, रमण बिल्डिंग,
पवळे चौक, पुणे ४११०११

९ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

the best

chetan म्हणाले...

khoopach sundar

Shailendra म्हणाले...

Khoopach Chhan, Mhanatat Jodya swargatach banavlya jatat

अनामित म्हणाले...

great thoughts

hay magazine creator u did
best thing by providing anonymous
option for commenting now i ill comment on all liked things
BTW magazine is good

mukund म्हणाले...

khupch chan

अनामित म्हणाले...

Nice... Experiances are putted in very nice way...
Kirti... All The Best. Keep up the great work.

सुधीर कांदळकर म्हणाले...

अगदी सत्य आणि मनातले लिहिले आहे.

पत्रिका पाहून लग्न ठरवणे, अमावस्येच्या दिवशी तसेच संपूर्ण पौष महिन्यात सगळी लग्नघरे रिकामी असणे, मंगळ असलेल्या मुलीचे लग्न रखडणे याला काय म्हणावे?

अनामित म्हणाले...

khup sundar lekh ahe!uttam mandani.patrika baghvi ka nahi ha kharach sanshodhanacha prasna ahe.lok andhlepanane kiti paise kharch kartat hyasagalyawar

श्रेया म्हणाले...

पूर्वी फक्त मुलीकडच्यांना मनस्ताप व्हायचा पण आजकाल मुलीकडचे/मुलाकडचे असा काहीच भेद राहिलेला नाही.