डोळ्यातले पुसावे !

माझ्या जगात ऐसे कोणी तरी असावे
येता क्षणीच पाणी डोळ्यातले पुसावे

घरट्यात सांजवेळी परतून शांत निजता
स्वप्नात सारखेपण दोघासही दिसावे

प्रेमात अंध झालो असलो जरी तुझ्या मी
अंधत्व दूर करण्या लटकेच तू रुसावे

करणे शिकार माझी हा छंद पाळला तू
जाळ्या शिवाय तुझिया बाहूत मी फसावे

देवा समोर बसलो डोळे मिटून माझे
झालीस मेनका तू तुजवर नजर स्थिरावे

पत्त्यात खेळताना कानून काय नवखे !
बाजी तुझीच असते मी नेहमी पिसावे

भेटी अशाच व्हाव्या साधून क्षण बसंती
जग कोण सांगणारे? हसणे किती हसावे

"निशिकांत" सांगतो मी साधा हिशोब आहे
नात्यात आपुल्यांच्या मीपण कधी नसावे

कवी: निशिकांत देशपांडे

४ टिप्पण्या:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

वाह, सुरेख गझल !

अमित गुहागरकर म्हणाले...

स्वप्न आणि पत्त्यांचा शेर खास आवडला..!! एकंदर गझलही.

क्रांति म्हणाले...

पत्ते अप्रतिम! आवडली गझल.

ulhasbhide म्हणाले...

छान गझल. आवडली.