खरेदी दिवाळीसाठीची !

दिवाळी म्हटली की सुरुवात होते खरेदीपासून. पहिला मान फराळाचे पदार्थ बनवण्यासाठी लागणार्‍या साहित्याचा. म्हणजे इतरवेळीही आपण वाण्याकडे जायचो पण हे कसं म्हणजे प्रत्येक पदार्थ फक्त आपल्यासाठी नाही तर चार घरी देण्यासाठीही बनणार, शिवाय घरातली बच्चेकंपनी दिवाळीच्या सुट्टीत घरी असणार म्हणजे त्यांनाही जास्तीचं लागणार या हिशेबाने नेहमीपेक्षा जास्त आणि मुख्य म्हणजे चमचमीत पदार्थांसाठीची.

पदार्थ तरी एक का अनेक. अगदी यावर्षी फार नाही हं करणार मी असं जरी म्हटलं तरी चकली,चिवडा,लाडू,करंजी हे मानकरी तर हवेत म्हणजे पोहे, भाजणीसाठीच्या डाळी,रवा,बेसन,साखर,मैदा,तेल,तूप हे गुरु तर हवेत आणि मग प्रत्येक पदार्थाला तीट म्हणून मनुके, बेदाणे, शेंगदाणे, डाळे, खोबरं हे सगळं एकत्र आणायचं म्हणजे होतेच की मोठी खरेदी.

चार मानकरी म्हटले तरी हळूहळू एक एक शिलेदार आपसूक वाढत जातो. म्हणजे कसं तर चकली तळायला घेतली आणि शेवटचा घाणा टाकायला आला की अरे तेल उरतंय वाटतं मग चला थोडी बारीक शेवपण पाडून टाकू. सोर्‍याची चकती तर बदलायची आहे आणि पीठ काय पटकन मळून होईल, असं म्हणता म्हणता शेव कधी दुसर्‍या एका डब्यात जाऊन बसते कळतंच नाही.

दुसर्‍या दिवशी करंजी करतानाही शंकरपाळे हळूच आपला नंबर लावतात. चिवडा तर मोठ्यांना आवडतो म्हणून तिखटाचा आणि लहानांचा विचार हवा म्हणून थोडा गोड अशी दोन रुपं यायच्या आधीच ल्यायला असतो. लाडू एकच प्रकारचा केला असं कधी होतंच नाही. रवा आणि बेसन हे दोन प्रकार केले जातात. म्हणजे सुरुवातीला चार म्हटलं होतं पण डबे भरताना मात्र चाराचे आठ कसे होतात कळतंच नाही.

फराळाचं आटपलं की वेध लागतात ते कपड्याचे. यावर्षी बाजारात कसली चलती आहे, आपलं बजेट आणि वयाप्रमाणे काय घ्यायचं ते साधारण ठरलं तरी प्रत्यक्षात मात्र घरातल्या मुलीला हवा तसा फ़्रॉक किंवा ड्रेस शोधणं हे पुष्कळवेळा एका बुटातल्या सिंड्रेलाला शोधण्यासारखं होतं. कुठे रंग आवडला तर पॅटर्न आवडत नाही. तर कुठे अमकी झालर बरी दिसत नाहीये, ही फुलं शोभत नाहीये एक ना दोन अनेक कारणं. आणि हे सगळं सगळं पसंत करून घेतलेली वस्तू घरी गेल्यावर हमखास नापसंत असते...

साडी खरेदीबद्दल तर काही बोलायलाच नको. आधी शेजारणीची किंवा कुठल्या नातलगीची पाहिली असेल तर "मेरी साडी उसकी साडी से उप्पर" पाहिजे म्हणून जे काही डोक्यात घोळत असेल त्याचा यजमानास थांग लागणे कठीण. आणि पुन्हा तीच ती रंग,पोत, काठ, पदर, डिझाइन इ.ची रडकथा सारखीच असते. या सगळ्या गदारोळात ती कुठे लपलेली साडी आपल्या हातात बॅगरुपी येईस्तो एका सुंदर दिवसाची संध्याकाळ झालेली असते. मग उरल्या कमी उत्साहात घरातल्या पुरुष मंडळीसाठीही कुठे शर्ट पीस, पॅंट पीस किंवा तयार शर्ट-पॅन्टची खरेदी (अर्थातच जी दादर लोकल पकडायची असेल त्याच्या बरोबर दहा मिन्टं आधी) होते आणि झालं बुवा म्हणून कुटुंब परतीला लागतं.


आता खरं तर राहिलं असतं ते खास दिवाळी स्पेशल म्हणजे दिवाळीचे फटाके. फटाक्यांची कुत्र्याच्या छ्त्रीसारखी उगवलेली दुकानं असली तरी आपला एक नेहमीचा दुकानदार (हा खूपदा स्टेशनरीवाला किंवा प्रोव्हिजन स्टोर्सवाला का असायचा हे मला पडलेलं कोडं आहे) असे त्याच्याकडेच होई. म्हणजे मुख्य, पहिलं जे बजेट आखलं असेल त्याप्रमाणे घ्यायचे फटाके त्याच्याकडून घेतले जात. हे फटाके घरी आल्यानंतर घरातल्या मुलग्याचं मुख्य काम म्हणजे गच्ची किंवा बाल्कनी, जिथे कडकडीत ऊन देता येईल तिथे ते देत बसणे. आधी सहामाहीच्यावेळी अभ्यासाला एका जागी बसायला टंगळमंगळ करणारं बाळ हे कार्य मात्र गुणवत्ता यादीत यायच्या चिकाटीने करी. त्यानंतर दिवाळी आली आणि हे फटाके पटापट संपले की मग ती आधी म्हटलेली कुत्र्याच्या छत्र्यावाली दुकानंही रोजची फटाक्यांची बेगमी करायला कामाला येत. अर्थात, सुरुवातीला आणलेले फटाके पुरवून वापरायची वृत्तीच जास्त असे.

हळूहळू फराळ, फटाके संपत. घरी आलेले पाहुणे किंवा आपण कुठे गेलो असू तर आपला तिथला मुक्काम संपे आणि मग ही अशी ट्रिपल खरेदी करायची वेळ यायला पुढच्या वर्षाची वाट पाहायला लागे...

वाचताना पसारा वाटलं तरी हे खरेदी पुराण किती छान, आटोपशीर होतं असं वाटायचं कारण म्हणजे आता दिवाळी हाकेच्या अंतरावर आली तरी यातलं काहीच दिसत नाहीये. याचा अर्थ खरेदी होतच नाही असं नाही पण त्याचं स्वरूप बरंच बदललंय.निगुतीने केले जाणारे फराळाचे पदार्थ ऑर्डरला दिलेत कारणास्तव आउटसोर्स तर झालेतच पण पूर्वी फक्त दिवाळीला खाल्ल्या जाणार्‍या ह्या जिनसा आता वर्षभर मिळतात आणि खाल्ल्याही जातात मग त्यातलं अप्रूप कुठे राहणार...कपडे खरेदीचं तर काही बोलायलाच नको. आता सारखं खुणावणार्‍या मॉलमध्ये गेलं की कपडे आणि त्यासोबत आणखीही बरीच खरेदी सारखी सारखी होत असते. काही वेळा तर कंटाळा आलाय या सबबीखालीही लोकं खरेदी करतात. पैशाची उपलब्धी वाढलीय हे त्यामागचं कारण असलं तरी त्या प्लान करून फक्त सणासाठी केल्या जाणार्‍या वार्षिक खरेदीचा आनंद कुठेतरी हरवलाय हे मात्र नक्की. फटाके तर दिवाळीच्या दिवसांत नको त्या प्रमाणावर आणले जातात. लवंगीची माळ सुटी करून एक एक लवंगी वात काढून तासन्तास तो आवाज काढत रमलेलं पोरगं आता दुर्मिळच. त्यात ते फोडलेल्या फटाक्यांची दारू गोळा करून त्याचा होममेड फटाका बनवणारा प्राणी तर एक्सिंट.....

काळ बदलतोय तसं आपण बदलायला हवं हे मान्य केलं तरी पुन्हा काही दिवस असेही यावेत जेव्हा हा खरेदीचा आनंद मनाला मिळावा. आणि मग सगळं पसरून काय आवडलं, काय नाही हे घरातल्या सर्वांनी एकत्र बसून एकमेकांची खेचत त्या खरेदी आठवणी काढत विरंगुळ्याचा एक क्षण पदरी पाडून घ्यावा. कशी वाटते कल्पना?

लेखिका: अपर्णा संखे-पालवे

1 टिप्पणी:

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

हा हा हा, अगदी चपखल वर्णन ......दिवाळी तयारीचं. आजकाल मी यासगळ्यालाच मुकते आहे याचं वाईट वाटतं. आता हेच बघ ना, गेली तीन वर्षं नविन आकाशदिवा आणायचं चाललंय पण मी घरी पोचते अगदी दिवाळीच्या दिवशी. त्यामुळे जे आहे तेच लावलेलं असतं. मग त्यातल्यात्यात मी दिवाळीचे तीनही दिवस विविध रांगोळ्या काढून आणि दोन चार दिवाळी अंक खरेदी करून दुधाची तहान ताकावर भागवत असते. ह्यावेळी दिवाळीअंक खरेदी सुद्धा करणार नाहीये. फारसं दर्जेदार नसतंच. आणि आपले हे डिजीटल दिवाळी अंकच वाचून पुरतात. :-) दिवाळीच्या शुभेच्छा!