आयुष्यावर बोलू काही...

हजच सुचलं तुला नि मला, त्या दिवशी बोलताना, अचानक आलेली कल्पना...वॉव.....अ ग्रेट आयडिया याssssर ! अरे खरंच ! पण आपण बोलू शकू का रे ? अगदी मनापासून, हृदयातलं....सांग ना रे...........


आयुष्यं, मग ते कुणाचंही असो, होss अगदी पानां-फुला-फळांपासून पशू-पक्षी-मानवांपर्यंत...सगळ्यांचं आयुष्य स्वतंत्र असतं का ? छट्‌ , उलट प्रत्येकाचं आयुष्य एकमेकांबरोबर जोडलं गेलेलं असतं. जसं... आता तुझं नि माझं. जोपर्यंत आपण एकमेकांना ओळखतही नव्हतो तोपर्यंत आपलं आयुष्य वेगळं होतं आणि आता............एकमेकांना आयुष्यातून वजाच करता येत नाही,हे खरं !

आयुष्य असतं अळवावरच्या पाण्यासारखं , पाण्याच्या थेंबासारखं. वार्‍याच्या एखाद्या झुळुकीने पानाच्या हलक्याशा होणार्‍या थरथरतेबरोबर निसटून जाणारं. आयुष्याला खूप खूप जपावं लागतं. ते परत परत मिळत नसतं, मिळणारही नसतं, कसं ? एखाद्या गोष्टीसारखं. वाळवंटातल्या मृगजळासमान भासणारं आयुष्य खरोखरच मौल्यवान असतं. आपल्याला हवं हवं वाटताना आपल्यापासून दूर दूर जाणारं. खरंच ! कधी कधी हेवा वाटतो मला.  का रे असतं आयुष्य असं ? सांगशील मला ?..........

पटतंय मला, आयुष्य म्हणजे मधुर गीत, जे गुणगुणायचं मस्तीत. सुरांनी त्याला सजवायचं असतं, नदीच्या वाहत्या पाण्यासारखं त्याला वाहवतच ठेवायचं असतं. अनेक वळणा-वळणांवर थांबत-थांबत, सगळ्यांना आपलं प्रेम  देत, स्वभावाचा गोडवा वाटत, प्रत्येकात आपलं असं अस्तित्व हरवून जायचं आणि तरी पण....... हो कळलं रे ! …....तरीही स्वत:ला वेगळं ठेवायचं. आत्मसमर्पणाच्या भावनेनं त्याला पूर्णत्वाची जाणीव द्यायची. आपल्या आयुष्यीच्या आनंदाची कायम दुसर्‍यावर बरसात करायची. थंडीत आपण शाल लपेटून घेतो आणि ऊब निर्माण होते तसंच आयुष्य दुसर्‍याला पांघरायला द्यायचं.
       
काय गंमत आहे, बघ ना ! अचानक कुणीतरी आपल्या जीवनी येतं आणि मग.......मग तर दोघांच आयुष्य सरळमार्गी होतं, आणखी सांगायचं तर समांतरच. जसं दोन समांतर रेषा एकमेकांना कधीच मिळत नाहीत, छेदतही नाहीत. आयुष्य देखिल असंच असतं, समांतर रेषांसारखं . एकमेकांच्या साथीने फक्त बरोबरीने चालायचं आणि शेवटी अनंतात विलीन व्हायचं. आयुष्य म्हणजेच प्राण. तो असेल तर स्वर्ग आणि नसेल तर …....! आयुष्य म्हणजे फुलपाखरू! फक्त मधुकण गोळा करण्यासाठी आणि निव्वळ त्याचेच दान करण्यासाठी. बर्‍याच वेळा असं वाटतं, आयुष्य म्हणजे समाज बंधनाचं कारागृह. आपण कितीही म्हटलं तरी न झुगारता येणारं; तसंच झुगारलं  तर.............त्याची शिक्षा भोगायला लावणारं. तरीपण उडणार्‍या पक्षांचे पंख म्हणजे प्रेमळ, शक्तिशाली आयुष्य. यांच्या ताकदीवरच तर आपण मारतो भरारी यशाची. तुला माहित्ये ? इतकं असलं तरी प्रत्येकाचं क्षितिज ठरलेलं असतं.

आयुष्य म्हणजे देवापुढे तेवणार्‍या शांत, सोज्वळ निरांजनासारखं, दुसर्‍याला सतत प्रकाशित ठेवणारं. नैवेद्याच्या ताटासारखं, अनुभवांच्या अनेक चवींनी, भावनांच्या इंद्रधनू रंगांनी संतुष्ट करणारं. घंटेच्या निनादासारखं.....आपल्या प्रियजनांच्या शब्दांचं गुंजारव करणारं, पुनीत प्रार्थनेसारखं, नेहमीच इतरांना सुखी ठेव म्हणणारं.अगदी आतून सांगायचं तर आयुष्य म्हणजे परमपित्या परमेश्वराचा मिळालेला “आशीर्वाद”, खरं ना ? तो आहे म्हणूनच मी आहे, तू आहेस, सगळेच आहेत. हा निसर्ग, हे द्वैतविश्व आणि अद्वैताशी नातं जोडणारं आपलं भावविश्व..........

बाप रे ! बघता बघता किती बोललो ना, तरी असं का बरं वाटतंय की, काहीच सांगितलं नाही, अजूनही खूप खूप काहीतरी सांगायचंय. तुझ्याशी बरंच बोलायचंय. हे तर वरवरचं झालं, होय ना रे ? मग्मनातलं कसं बरं सांगायचं ? तरीपण थोडासा प्रयत्न मनापासून......

कधी कधी बर्‍याच गोष्टी
कागदावर उतरवणं जमत नाही
नुसत्याच शाब्दिक खेळाने
आयुष्य पुरतं उमगत नाही

        आयुष्य म्हणजे गूढ कोडं
        सुटल्यासारखं वाटणारं
        डोळसपणे त्याकडे पाहता
    चकवा देऊन फसवणारं
           
            आयुष्य म्हणजे मोकळं आभाळ
            कायम भरारी मारण्यासाठी
            प्रगती पथावर चालता चालता
            अद्वैताशी नाते जोडण्यासाठी    
                       
                    आयुष्य म्हणजे गुरू माझा
                    अनुभवांतून खूपसं शिकविणारा
दुसर्‍यांचं दु:ख निवारताना
स्वत:चेच अश्रू हरविणारा

आयुष्य म्हणजे कोरी पानं
ज्यावर आपण लिहायचं असतं
अत्तराच्या कुपीसमान हेही
थोडंसं बंदिस्त ठेवायचं असतं

सरते शेवटी काय म्हणावं
आयुष्य म्हणजे आयुष्य असतं
इथून-तिथून बघावं तर
थोडया फरकाने सारखंच असतं

                                    आयुष्य म्हणजे नेमकं काय
कधीच नाही विचारायचं
त्याच्या कृपेचा प्रसाद म्हणून
योग्य जाणीवेनेच जगायचं

म्हणूनच एकदा परत सांगते......

    सगळंच नसतं उघड करायचं
    हृदयाचा शोध घेत असताना
    मनास मनानं जाणून घ्यावं...आयुष्यावर काही बोलताना...आयुष्यावर काही बोलताना.


लेखिका: सौ.प्रियांका म. पाटणकर (सुचिता देवधर)

priyanka_sweetheart24@yahoo.co.in

३ टिप्पण्या:

Shreya's Shop म्हणाले...

आयुष्य इतकं विविधरंगी असतं हे कधी लक्षातंच आलं नाही. पण आयुष्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या उपमा वाचून मला १९४२ ए लव्ह स्टोरी मधलं ’एक लडकी को देखा’ या गाण्यात जावेद अख्तर नी एका मुलीला पहिल्यावर काय वाटलं ते सांगताना दिलेल्या उपमा आठवल्या.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मस्त, आवडेश एकदम :)

Alvika म्हणाले...

mast lihiley. ayushyache vegvegale pailu chhan ulagadun dakhavael ahet.