जसा बहरला कल्पतरू !

हिशोब करता आयुष्याचा
काही आठवू काही विसरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

जीवनातले कडे कोपरे
साठे माणिक मोत्याचे
जेथे रमलो हळूच विणले
जाळे नात्या गोत्याचे
कठीण समयी कधी न पडला
प्रश्न पुढे मी काय करू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

कष्टाविण का खडबड झाले
हात आपुले आज असे?
आम्हीच लिहिल्या नशीब रेषा
भाग्य आम्हाला हवे जसे
हिंमत आहे आकाशाला
कवेत आपुल्या सहज धरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

खूप राहिलो सूर्यप्रकाशी
संध्या छाया दिसू लागल्या
आठवणीच्या लक्ष तारका
वेचू त्यातील सर्व चांगल्या
सूर मारुनी खोल समुद्री
मोत्यांच्या ओंजळी भरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

धवल यशाची जणू पताका
जीवन करण्या शुभ्र साजिरे
धाग्यांनी सुखदु:खाच्या विणले
आयुष्याचे वस्त्र गोजिरे
या वस्त्रावर आपण दोघे
इंद्रधनूचे रंग भरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

कांगारूचे जीवन जगलो
पोटी धरुनी सर्व मुले
कुठे उडाली? त्यांना लाभो
क्षितिजापुढचे क्षेत्र नवे
पैलतीर तो दिसू लागला
डोळे मिटुनी ईश स्मरू
वळून बघता जीवन भासे
जसा बहरला कल्पतरू

कवी: निशिकांत देशपांडे

४ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

कवितेतला आशावाद, ध्येयवाद खूप आवडला.

क्रांति म्हणाले...

अतिशय सुरेख कल्पना, प्रतीकांची सुंदर गुंफण.

अनामित म्हणाले...

chaangale kaavy aahe pan jaraa laamblachak vaatalee.

Alvika म्हणाले...

chhan.