चला कॅरावके शिकूया...!

ज ज्या विषयाला मी हात घालतोय, त्याला काय म्हणावे, माझे मलाच कळत नाही. संगीत विषयाचा फारसा अभ्यास नाही, गायनायोग्य आवाज नाही आणि तरीही संगीताच्या एका पैलूचे मुखदर्शन इतरांना करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. प्रारंभीच एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की, ज्यांना माझ्याएवढी किंवा माझ्यापेक्षा संगीताची अधिक जाण आहे त्यांनी या लेखाच्या अजिबात वाटेला जाऊ नये. मात्र ज्यांनी कॅरावके हा शब्ददेखील अजून ऐकलेला नाही त्यांनी मात्र अवश्य हा लेख वाचावा आणि उदाहरणादाखल जे गीत दिले आहे तेही जरूर  ऐकावे.

गेली दोन वर्ष आंतरजालावर वावरतांना ठळकपणे माझ्या एक बाब लक्षात आली की, अनेकांकडे सुंदर आणि सुमधुर आवाज आहे. त्यांनी जर कॅरावके तंत्र अवगत केले तर त्यांना संगीताचा अमर्याद आनंद लुटता येऊ शकेल. स्वत:च्या आवाजात अत्युत्तम संगीतसाजासह गाणी रेकॉर्डींग करता येऊ शकेल. स्वत:च स्वत:ची गाणी ऐकून किंवा इतरांना ऐकवून स्वर्णिम आनंदाचे क्षण मिळवता येऊ शकेल.

पूर्वीच्या काळी प्रथम गीत लिहिले जायचे. गीतकाराने लिहिलेल्या गीताला त्यानुरूप संगीतकार चाल लावायचेत. लावलेल्या चालीशी सुसंगत वाद्याची निवड करून संगीत दिले जायचे. पण काळानुरूप त्यात बरेच बदल होत गेले आणि बरीच उलटापालट झाली. सर्वप्रथम संगीतकाराच्या डोक्यात घोळत असलेली चाल संगीतबद्ध करून त्या संगीतात आणि चालीत फिट बसेल असे गीत गीतकाराने लिहायचे, अशी एक नवी पद्धत विकसित झाली.  कॅरावके प्रकारही काहीसा याच प्रकारात मोडणारा आहे.

लोकप्रिय गाण्यांच्या चालींना संगीतबद्ध करून ते प्रथम रेकॉर्डींग केले जाते. त्यानंतर गायकाने संगीतातील रिकाम्या जागा हेरून, त्याला साजेशा स्वरूपात आपला आवाज मिसळून   त्यानुरूप गायचे, यालाच कॅरावके तंत्रज्ञान म्हणतात. आजकाल बाजारात बर्‍याचशा गाण्यांच्या कॅरावके सिडी उपलब्ध आहेत. तेंव्हा आपणही हा प्रयोग अवश्य करून बघा.

उदाहरणादाखल मी १९८० च्या सुमारास लिहिलेले " मना रे" हे भक्तिगीत  "कांच्या रे कांच्या रे" या कॅरावके संगीतात गाण्याचा प्रयत्न केलाय.


मना रे मना रे....!

मना रे मना रे, नको आडराना 
जाऊ सोडोनी सतमार्गा ॥धृ०॥

घर तुझे नाशिवंत असे हे रे
आशा मनिषा काम क्रोध सोयरे हे
देह हा जाईल, आत्मा हा राहिल
असे तुझा कोठे वास रे  ॥१॥

तुझे हाती जीवनाची नाव ह्या रे
तोलुनिया संयमाने हाकार रे
भरतीही येईल, ओहोटीही जाईल
आला भोग संयमाने भोग रे ॥२॥

वासनेच्या आहारी तू जाऊ नको
पाप भरले जहर तू पिऊ नको
संग असा घेई जो, मोक्षपदा नेई जो
"अरविंदा" चढवी तू साज रे ॥३॥

- गंगाधर मुटे "अरविंद"
------------------------------------------



लेखक: गंगाधर मुटे

५ टिप्पण्या:

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

मस्त जमलेय गंगाधरदादा ! याबाबतीत तुम्हाला गुरू करायलाच हवे.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

सहीच... छान वाटलं. अजुन येऊ द्यात :) :)

Alvika म्हणाले...

changala vishay ahe. kharech shikayala have. apan nehami vegavegale upkram rabavat asata, tyatilach ha ek. abhinandan.

सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! मजा आली.

बाळासाहेब तानवडे म्हणाले...

गंगाधरजी,सुंदरच जमलंय.
karaoke track मिळतो ते ठीक आहे ,पण आपण karaoke track सोबत रेकॉर्ड कसे केलेत ते सांगाल का?