नरसोबाची वाडी !

दिवाळी म्हटलं की, मला आठवण होते नरसोबाच्या वाडीची.

नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे दत्तात्रय महाराजांचं एक जागृत असं देवस्थान कृष्णामाईच्या तिरावर वसलेलं आहे. सांगली पासून २५ किमी अंतरावर असणारं हे गाव म्हणजे साक्षात दत्तभूमीच. ही भूमी श्री. दत्तमहाराजांचे अवतार असलेल्या नरसिंह सरस्वतींच्या १२ वर्षे वास्तव्याने पावन झालेली आहे.
आमच्या घरामध्ये श्री.दत्तमहाराजांची आराधना केली जात असल्यामुळे, आम्ही दिवाळीच्या आधी येणार्याध गुरूव्दादशीला नरसोबाच्या वाडीला जायचो. तिथे ह्या काळात खूप मोठा उत्सव असतो.

पुण्याहून सांगलीला जाणार्याsस बसमध्ये बसलं की शेवटचा स्टॉप म्हणजे नरसोबाची वाडी. रात्री अगदी उशीरा पोहोचल्यावर विनोद पुजारी म्हणून बाबांचे मित्र होते, आम्ही त्यांच्याकडे उतरायचो. त्यांचं घर मस्त दुमजली होतं. राहण्या-खाण्याची सगळी व्यवस्था तेच बघायचे.दिवाळी म्हणजे अगदी कडक थंडी, तरीपण आम्ही एकदा का होईना कृष्णामाईला पहाटे जाऊन अंघोळ करायचो. त्यानंतर मंदिरातील काकड आरती व प्रात:कालपूजेला हजर व्हायचो.

मंदिराचे आवार खूप मोठे आहे, प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पहिल्यांदा डाव्या बाजूची दुकानं तुमचं स्वागत करतात. ह्या दुकानांमध्ये पुजासाहित्य, प्रसाद आणि थोरा-मोठयांना वाचायला उपयुक्त अशी पुस्तकं देखील मिळतात. इथे मिळणारे पेढे अतिशय चविष्ट असतात. इथली खासियत म्हणजे कवठ बर्फी आणि ड्रायफ्रुट बर्फी, ह्या दोन प्रकारच्या बर्फी तुम्हांला दुसरीकडे कुठेच इतक्या छान मिळणार नाहीत.  इथली बासुंदी तुम्ही एकदा चाखलीत की तिची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत.

तर, आत आल्यावर उजव्या बाजूला, नारायणस्वामींचं मंदिर आहे. त्यामागे, मोठी धर्मशाळा बांधलेली आहे.थोडंसं पुढे गेलं की, डाव्याबाजूला मुख्य मंदिर आहे जेथे औदुंबराच्या झाडाच्या सावलीमध्ये नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. नरसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबाची वाडी सोडण्यापूर्वी ह्या जागी आपल्या मनोहारी पादुकांची स्थापना केली होती, ज्याचा पुढे श्री.गुळवणी महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि सध्यस्थितीतील  मंदिराची रचना झाली.

आता थोडी नजर वळवा, समोरच कृष्णामाईचं दुथडी भरून वाहणारं स्वच्छ, नितळ पाणी चकाकताना दिसेल. असं म्हणतात की, पूर्वी पावसाळ्यामधे कृष्णामाईला इतका पूर यायचा की पाणी मंदिरातील पादुकांना स्पर्श करीत असे. पण, आजही कृष्णामाईच्या पात्राला पाणी अगदी काठोकाठ असतं. नदीकाठी बांधलेल्या सुंदर घाटामुळे मंदिर परिसराला एक उठाव आलेला आहे. असं हे प्रसन्न वातावरण असलेल्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही घराकडे परतायचो. 
 
पुढे घराकडे जातांना, रस्त्यावर थोडंसं धुकं असायचं आणि सकाळच्या शुद्ध हवेत धुपा-दिपाचे वास दरवळत असत आणि क्वचित कुठून तरी गरम पाण्याच्या बंबाचा धूर दिसत असे. दुतर्फा असणार्या घरांची अंगणं सुद्धा सडा-संमार्जन करून सिद्ध असत.सुवासिनी मंदिरामध्ये पुजायला जातांना दिसत. दिवाळी सुरू होण्यास अवकाश असून देखील अगदी मंगलमय वातावरण असायचं.

नरसोबाच्या वाडीला, मंदिरामध्ये सकाळी ९ ते १२ ह्या वेळेत मनोहारी पादुकांची पुजा करण्याची संधी भाविकांना मिळते.आम्हीदेखील एकादशीच्या दिवशी ही पुजा करीत असू. मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान खिडक्या बसवलेल्या आहेत ज्यामधून पुजा करणार्या व्यक्तीला पादुकांची होणारी पुजा व्यवस्थित बघता येते. तसंच मुख्य व्दारातून इतर भाविकांना दर्शन घेता येते. ह्या तीर्थक्षेत्री असणारे ब्राह्मणवृंद आपल्याकडून यथासांग पुजा करवून घेतात. दुपारी १२ ते १ च्या सुमारास महापूजा, नैवेद्य व आरती होते.

त्यानंतर आम्ही परतायचो. दुपारी विश्रांती घेऊन मग संध्याकाळी आम्ही कृष्णामाईच्या पैलतिरी वसलेल्या 'अमरेश्वर' ह्या शंकराच्या मंदिराला भेट देत असू. हे मंदिर कृष्णामाईच्या काठावर वसलेलं असल्याने तुम्ही नावेतून जाऊ शकता किंवा चालतही जाऊ शकता.संधिकालाच्या प्रकाशात कृष्णामाईचं पात्र अधिकच सुंदर भासतं, त्या प्रवाहाकडे बघता बघता संध्याकाळच्या पूजेची वेळ कधी होते कळतच नाही.

सकाळी झालेल्या महापूजेपेक्षाही मला संध्याकाळी असणार्या" पालखीचं खूप आकर्षण असायचं. नारायणस्वामींच्या मंदिरामध्ये पालखीची तयारी केली जाते. विशेष म्हणजे ही तयारी सर्व भक्तगणांना बघायला मिळते. सर्वप्रथम उत्सवमूर्तीला अभिषेक केला जातो. त्यानंतर चंदनगंध,कुंकुम,काजळ आदींनी मुखवट्याची सजावट केली जाते. त्यानंतर पुणेरी फेटा बांधला जातो. सरतेशेवटी ताज्या फुलांची आरास केली जाते. त्यानंतर आरती-वात,नैवेद्यहोतो आणि "राजाssधिराज, महाराज" च्या गजरात मिरवणुकीची सुरुवात होते. पालखीसोबत चंद्र, सूर्य, चवरी (वारा घालण्याचा पंखा) घेऊन तसंच भालदार, चोपदार औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतात. भक्तांना देखील ह्या पालखीमध्ये स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते. दत्तात्रय महाराजांची विविध स्तुतीपर पदं म्हणत म्हणत ही मिरवणूक साधारण तासभर चालते आणि दिवसाची सांगता होते.

दुसरा दिवस असतो गुरूव्दादशी चा, ह्या दिवशी मोठ्या प्रमाणात भक्तगण आपल्या गुरूमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरता येतात. महापूजा झाल्यानंतर प्रसाद असतो. नरसोबाच्या वाडीला मिळणार्याू प्रसादाचं पण एक वैशिष्ट्य आहे. इथे पुरी-भाजी असा प्रसाद नसून खीर व वांग्याची भाजी हा प्रसाद असतो. प्रसादाची खीर ही भरडलेला गहू आणि गुळाची केलेली असते. अतिशय चविष्ट अशा या प्रसादाचं सेवन केल्यावर आत्मा तृप्त होतो. त्या दिवशी पुन्हा संध्याकाळी पालखी असते. अशातर्हे ने गुरूव्दादशीचा उत्सव पार पडतो.

...आज कित्येक वर्ष झाली, आम्ही नरसिंहवाडीला गुरूव्दादशीच्या निमित्ताने जाऊ शकलो नाही, पण दिवाळी म्हटलं की आम्हाला ह्या सगळ्या उत्सवाची आठवण होत नाही असं क्वचितच घडत असेल..

जसा हा उत्सव माझ्या लक्षात आहे तशीच नरसोबाच्या वाडीशी निगडित एक आठवण खूप वेगळी आणि छान आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्याकडे किल्ला करायची पद्धत आहे. तिथे तर किल्ला बनविणे स्पर्धा घेतली जाते आणि ही स्पर्धा अशी तशी नाही तर अगदी अटीतटीची असते. फक्त २,४ विटा घेऊन थोडी माती थापली की किल्ला तयार ही तिथे किल्ल्याची व्याख्या नाही. तर, तिथे लहान-मोठी सगळी मुलं व्यवस्थित आखणी करून, विचार करून शिवाजी महाराजांचा एखादा प्रसिद्ध किल्ला निवडतात.  मग माती, विटा, चुना, विविध रंग ह्या सर्व साहित्यासह किल्ला बांधणीला सुरुवात करतात आणि साधारण २-४ दिवसात त्या प्रसिद्ध किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनवतात. त्यानंतर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज, त्यांचे मावळे तसंच किल्ल्याच्या आवारात छोटंसं तळं करून त्यात दिव्यावर चालणारी बोट अशा गोष्टी रचून सजावट करतात. आम्ही सर्वजण तर हे सगळं बघून अगदी हरखून जायचो आणि आपण पण असाच किल्ला करायचा घरी गेल्यावर हा विचार घेऊन नरसोबाच्या वाडीचा निरोप घ्यायचो..

तर, कशी वाटली तुम्हांला ही आगळी-वेगळी सफर..जमलं तर तुम्ही पण एकदा जाऊन याच, माझं तर ह्या दिवाळीचं प्लॅनिंग फिक्स झालेलं आहे. 

*** मंदिराचे छायाचित्र महाजालावरून साभार!***

लेखिका: प्रियांका जोशी

२ टिप्पण्या:

Pranita म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Pranita म्हणाले...

Priyanka, Narsobachya wadicha warnan khoopach chaan lihila aahes....wachun wadi dolyasamor distat aahe...aata tar me bhartaat parat aalyawar Narsobachya Wadila nakki janar. :)


Pranita