कल्लोळ!

ज रात्री निघायचं होतं गावाकडे. खूप दिवसांनी, तब्बल दोन महिन्यांनी. नवीन जॉब लागल्यावर जाणेच झाले नाही गावाकडे. सकाळपासूनच जरा जास्तच मूड चांगला होता.कामही छान होत होते.आत्ता दुपारी जेवण जरा कमीच गेले. माझ्या टीम लीडरने तसा टोमणा मारलाच.काही हरकत नाही, तसा तो खूप चांगला आहे. असो.

शेवटी आत्ता चार वाजता ऑफिस सोडले. 
'निघायची खूप घाई आहे.  काही घ्यायचे का पुतणीसाठी? काय घ्यावं ?.. चल, रूम वर तर जाऊ, मग बघू काही घ्यायचे असेल तर' असं काहीसं मनात चालू असताना रूम कधी आली कळलंच नाही. खरंच आज खूप फास्ट आलो आपण. किरण रूमवरच आहे वाटतं, बरं झालं, आहे तर तो. टाइम पास तरी होईल जाईपर्यंत.

"काय किशोर, लवकर आलास, आज गावाकडे जायची घाई वाटतं?" पहिलाच प्रश्न....
च्यायला, ह्याला गावाकडे जायला मिळत नाही म्हणून माझ्यावर जळतो वाटतं. तसा बरा आहे म्हणा.
"हो रे." मी.
"टॅटु नाही का आला अजून? च्यायला, मी आज ५ च्या आधी आलो रूम वर.. खरंच किती वेळ असतो
ऑफिसमध्ये आपण. चल, चहा घ्यायला जाऊ. "
नको रे, जाऊ थोड्यावेळाने. एकदाच बाहेर पडू, मग मी निघतो लगेच शिवाजीनगरला.
ठीक आहे. थोड्यावेळाने जाऊया....
अश्या गप्पा मारता मारता वेळ कधी गेला कळलंच नाही.
७ वाजले आता. चला, चहा घ्यायला जाऊ. मी बॅग आवरून घेतो पटकन.
चला चला चला, किशोर राव, आवरा, लवकर निघा...
चार्जर घेतलं, ब्रश घेतला....... सगळी एकदा उजळणी करून घेतलेली बरी...
चहा घेऊन, रिक्षा करूनच जावे. काय हे, मनामध्ये पुन्हा एकदा आनंदाने उडी मारलीस किशोर...किती तो आनंद असतो? च्यायला, तो अभय गावाकडे जाऊन बसला आहे आधीच...चलो, आज आपणही जातो आहोत, त्यात काय ! एक दिवस उशीरा तर उशीरा.... काही हरकत नाही..
दरम्यान मी शिवाजीनगरला पोहचलो. बसला यायला उशीर होता. टाइम पास करावा म्हणून, नजर एखादी मुलगी दिसते का ते शोधत होती...छ्या! कोणीच नाही... चल रे, काही हरकत नाही....बसमध्ये मिळेल एखादी....
गर्दी तर खूप आहे.. ते एक बरं झालं, रीझर्वेशन करून घेतले ते, नाही तर मायला उभे राहूनच जावे लागले असते.
बस आली आणि लागली.....
"हॅलो पपा बस लागली आहे, निघतो आहे पुण्यावरून. सकाळी भेटेन मी..."
इथे कोणी आहे का?... एक गरीब म्हातारी एका बाजूच्या मुलाला विचारत होती...
नाही हो , रीझर्वेशन आहे, सगळी गाडी फुल आहे वाटतं. दुसर्‍या गाडीने या....
बिच्चार्‍या आजी.. ह्यांना तरी कोन सांगणार की गाडीचं रीझर्वेशन करून यावे म्हणून.. काय हाल असतात एकेकाचे, काय माहीत...चला गाणे ऐकत बसावे...
गाणे लावून होईपर्यंत बस निघाली.. गिर्‍याला एक समस टाकतो....
बस शिवाजीनगरच्या बाहेर पडून रस्त्याला लागली होती.....
समस टाईप करून बघेपर्यंत स्टेशन क्रॉस केले. नजरेत दिसले ते जहांगीर हॉस्पिटल...औरंगाबादला जाताना इथल्याच लेडी डॉ.ची पर्स वापस दिली होती... च्यायला साधी थँक्स सुद्धा म्हणाली नव्हती.....
आता काय, समोर दीदीचं घरं.. खरंच, दीदी किती चांगली आहे...सख्या बहिणीपेक्षा जास्त माया करते आपल्यावर..चला, देव जे करतो ते खरंच खूप चांगलं करतो.....
हे एक बरं असतं, प्रवासात माणूस स्वतःशी  जास्त बोलत राहतो..किती छान असतं ना. फक्त स्वतःशी बोलता येतं. काहीच टेन्शन नसतं.. कुणाची काहीच कटकट नसते...
गाणे लावायचे का? लावूयात, मस्त, निवांत गाणे ऐकता येईल...आता गावाकडे गेल्यावर काय काय कामे पेंडिंग आहेत, काय माहीत.. खरंच, जॉब लागला आणि जॉब करतो म्हणजे असं काही नाही ना की मी घरच्यांच्या काहीच कामाला येत नाही... असंही, बाबाला आता जास्त काम होत नाही.. आपलं कर्तव्य आहे की त्यांच्या जवळ राहणे.. आपण पुण्याला राहतोय,  कशामुळे तर फक्त पैसा कमावता यावा म्हणून..खरं तर मला तरी कुठे राहण्याची इच्छा आहे पुण्यात, पण पर्याय नाही ना.. जॉब तर केलाच पाहिजे.. पैसा तर मिळवता आलाच
पाहिजे. नाहीतर जे आपल्याला, आपल्या घरच्यांना सुख द्यायचं आहे ते देणार कसं.... सुख, काय असत हे सुख.. आपण सुखी आहोत का? काय असते बरं सुखाची व्याख्या?फक्त जॉब करणे... पैसा कमावणे आणि कमावलेल्या पैशावर आपण भौतिक सुखाच्या वस्तू घेणे याला सुख म्हणतात? का माणसे जोडणे, त्यांची मने सांभाळणे याला सुख म्हणतात?  ह्म्म्म्म्म.... म्हणे, मने सांभाळणे! आपलं कधी कोणी मन सांभाळलं का?
का? कोणीच नाही सांभाळलं का? घरचे सोडून असे बरेच जण आहेत, की जे  तुला खूप मानतात...... काय करायचे बाकीच्यांनी तुला भाव देऊन?
प्रेमामध्ये तुला ती सोडून गेली होती, तुला  एकटेच टाकून... तिने कधी विचार केला का तुझ्या मनाचा?
जोराचा झटका देऊन गाडी  थांबली होती... जेवणासाठी! च्यायला,खूप वेळ झाला की! बघता बघता नगर आलं...चला, काहीतरी टाइम पास खाऊन घ्यावे.. काय खायचं ?? काहीच नको. आईच्या हातचं खाऊया गावाकडे. तूर्तास फक्त चहावरच भागवूया...
गाडी परत सुरू झाली... तशी मनामध्ये परत विचारांची गर्दी सुरू झाली.....चहामुळे परत झोप उडाली....

कोण होती ती तुझी, जिच्यावर तू इतकं जिवापाड प्रेम केलंस? काय गरज होती तिला माझ्या आयुष्यात यायची? मला वचनं देण्याची... तू पण किती वेडा रे, तिच्या पाठीमागे पागल झालास.. तरी अभय, रघू सांगत होते की तिच्या प्रेमामध्ये वाहत जाऊ नकोस म्हणून. तुलाच ऐकायचे नव्हते..ह्म्म! सोड रे तो विषय आता. नको तो विषय, झालं तिचं लग्न आता .... गेली ती फॉरेनला....
मित्र फार मोठी मदत करतात ना ह्या असल्या विषयांमध्ये.. खरंच,मित्र म्हणजे आपल्या आयुष्याला
लाभलेली देणगीच आहे.. आता हेच बघ ना, तुझा स्वत:चा किती मोठा मित्र परिवार आहे....
मायबोलीवरचे सगळेच चांगले आहेत.. अभय,रघू, किरण, अमेय, सचिन, प्रमोद, स्वप्नील. किती छान आहेत स्वभावाने... कधी कधी वाटते.... की हे सुद्धा आपलेच घर आहे... काही दिवसांनी आता किरण जाईल परत औरंगाबादला राहायला. आपण खरंच त्याला खूप मिस करू नाही? नाही म्हटलं तरी ४ वर्ष झाली रे बघता बघता...सकाळचा चहा काही चुकत नाही त्याच्या सोबत घेण्याचा.....
विचार करता करता डुलकी कधी लागली कळलंच नाही...नगरच्या पुढे बरीच आली होती  बस.. एक झोप तर झालीच होती तशी. पोटामध्ये भुकेचा डोंब उसळला होता पण आईच्या हातचं खायचं आहे म्हणून... मन म्हणत होतं काहीही खाऊ नकोस ..आई किती करते आपल्यासाठी.... किती अपेक्षा आहेत तिच्या माझ्याकडून.. तिला बघायचंय, माझं पुण्यात घर झालेलं.. तिला खूप हौस आहे फिरण्याची, पण मला काही पॉसीबलच होत
नाहीये तिला पुणे दाखवण्याचे.. आता ते एक टेन्शन आहे, गावाकडे गेल्यावर निघताना सारखं डोळ्यातून पाणीच बाहेर काढते.. बरं, तिचं एक बरोबर आहे पण तिला तरी कसं सांगू की तुझ्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर माझा पाय निघत नाही गं  पुण्याला जायला.. आज्जी पण तशीच... तिला सुद्धा खूप वाटतं माझ्याबद्दल... किती
लाड करते ती माझे... अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं आहे तिने मला.... सध्या तरी पॉसीबल नाहीये, पण तिला आणि आईला जगातील सर्वोत्तम सुख द्यायचं आहे तुला... म्हणून तुला पैसा कमावणं, पुण्यात जॉब करणं आवश्यक आहे.....
बाहेर नुसतेच लाइट्स दिसत आहेत. जणू काही ते आपल्याशी लपंडावच खेळत आहेत. रस्ता किती सुना पडला आहे नाही... एकटाच,आयुष्यभर असाच... सगळे त्याचा वापर करतात स्वार्थासाठी पण त्याला कधीच अपेक्षा नसते की आपलंही भलं होईल... याच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे नाही....

तेवढ्यात एक माणूस शेतातल्या खोपीमध्ये झोपलेला दिसला....
किती थकला असेल हा... शेतात काम करून. मस्त निवांत झोप लागलेय बिच्यार्‍याला.... खरं तर याचीही आपल्यासारखी स्वप्न असतील नाही... काय असतील याची स्वप्नं... की फक्त शेतीताच विचार असेल कायम?
खरंच! पाहिजे होतं कळायला, दुसर्‍याच्या मनातलं...
किती तरी चांगल्या वाईट गोष्टी कळल्या असत्या.....

आयुष्याच्या ४० व्या वर्षा नंतर हेच करायचं..
पुण्यात मस्त पैसा कमावू, गावाकडे एवढी शेती आहे. मस्तपैकी त्याच्यातच पीक काढू.... आरामात जगू... ते एक स्वप्न भारी आहे ना... मी शेतात असेन..माझी बायको माझ्यासाठी जेवण घेऊन येईल परडीमध्ये.. ती आणि मी, एकाच ताटात.. मस्त जेवण करु...पण, ती कशी असेल काय माहीत.. तिला आवडेल का गावाकडचं राहणं, शेती?? खरंच, कशी असेल ती ... पटकन गाणं आठवलं एक, लगेच लावूयात.....

पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

हिमवर्षावातही कांती तव पाहूनी
तारका नभातल्या लाजल्या मनातुनी
ओघळले हिमतुषार गालावर थांबले
ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले

अशीच, आपली सध्या तरी गत आहे.. खरंच, चांगली भेटावी म्हणजे बरं,  नाहीतर च्यायला सगळेच स्वप्न पाण्यात जायचे....
चला, माजलगाव आले, उतरा लवकर.. कंडक्टरची हाक.. डोळे किलकिले करून पाहतो तर माजलगावचे माझे कॉलेज दिसले... चला, उतरावं लागेल. आता फक्त दोन तास बस स्टॅड वर की लगेच गावाकडे...चला पोहचलो एकदाचा गावाकडे !
......
पोहचल्या पोहचल्या, गंगेचा तो पूर्णं परिसर पाहिला आणि पुण्याचा थकवा.. बॉसचा असलेला राग... कंपनीतली कामाची कटकट... सगळं विसरून कामाला लागलो.........

लेखक: किशोर करंजकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: