कोंकणी!

गोव्यात आल्यानंतर अगदी ठळकपणे लक्षात येणारी गोष्ट म्हणजे इथे बोलली जाणारी गोड , काहीशी सानुनासिक कोंकणी भाषा. १९९२ साली तिला राजभाषेचा दर्जा मिळाला. पण ती मराठीला इतकी जवळची आहे की अजूनही कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे की नाही यावरून वाद होतात. खरं पाहता, मराठी ज्याला कळते त्याला जरा सावकाश बोललेली कोंकणी कळते. आपण सर्वांनीच मुंबई आकाशवाणीवरील 'कोंकणीतल्यान खोबरों' कधीतरी ऐकल्या असतीलच. गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यात महाराष्ट्रात विलिनीकरण आणि त्याच्या अनुषंगाने कोंकणीच स्वतंत्र चर्चा याबद्दल जोरात चर्चा सुरू झाल्या. यावरून हिंसक आंदोलनं सुद्धा झाली पण शेवटी १९७५ साली साहित्य अकादमीने कोंकणीला स्वतंत्र भाषेचा दर्जा दिला.  आणि नंतर १९८७ साली गोव्यात कोंकणीला राजभाषा म्हणून दर्जा मिळाला.

कोंकणी ही इंडो युरोपियन समूहातली इंडो आर्यन भाषा आहे. मराठी आणि कादोडी या तिच्या अगदी जवळच्या भाषा आहेत. मालवणी आणि कुडुंबी या भाषा सुद्धा कोंकणीच्याच गटात वर्गीकृत केल्या जातात. 'कोंकण' हे नाव कोंकणे या आदिवासींवरून या प्रदेशाला मिळालं असावं असा अंदाज आहे. आता हे आदिवासी नासिक, डांग ठाणे या प्रदेशात मुख्यत्वेकरून आढळतात, पण प्राचीन काळात त्यांची वस्ती रत्नागिरीच्या आसपास होती असं म्हणतात. त्यांच्या भाषेचं कोंकणीशी काही साधर्म्य दिसतं. संस्कृत आधी वापरात आली की प्राकृत याबद्दल वाद आहेत, त्यात आपल्याला पडायचं नाही. पण प्राकृत ही मराठी आणि कोंकणी दोन्हीची जननी आहे असा एक समज आहे. परंतु, कोंकणीत काही शब्द संस्कृतमधून थेट आलेले आजही वापरात आहेत, ते मराठीत फार प्रचलित नाहीत, जसे की, 'उदक' म्हणजे पाणी 'हांव' म्हणजे मी हा तर सरळ अहम ला जवळचा आहे. आपय (आव्हय) म्हणजे बोलाव, रांध म्हणजे शिजव वगैरे.

वैदिक संस्कृत आणि प्राकृत या दोन्ही भाषा इ.स. २४००च्या आसपास कोंकणात राहत असलेल्या आर्यांच्या वंशजांच्या भाषा होत्या. पैकी संस्कृत ही पूर्णपणे नियमाने बांधलेली, तर प्राकृत ही सगळ्या लोकांच्या बोलण्यात असलेली. प्राकृतच्या अनेक उपशाखा होत्या. यातल्या शौरसेनी प्राकृत आणि महाराष्ट्री प्राकृत या दोन्हींचा कोंकणीवर खूप प्रभाव दिसून येतो. इ.स. ८७५ च्या आसपास महाराष्ट्रात महाराष्ट्री वापरात होती, या महाराष्ट्री प्राकृतामधून अपभ्रंश भाषा उदयाला आली. तिच्यात कोंकणीची बीजं दडलेली आहेत.

सातवाहनांचं साम्राज्य गोव्यातही होतं हे लक्षात घेतलं तर प्राकृतामधून कोंकणीचा विकास झाला असावा असं मानण्याला जागा आहे. कारण सातवाहनांचा सर्व कारभार 'महाराष्ट्रीमधून चालत असे. प्राकृत भाषेत लिहिलेल्या 'गाथा सप्तशती'मधे 'ण' चा वापर सढळ हस्ते होतो. गाथा सप्तशतीमधली णई म्हणजे नदी कोंकणीत येते ती न्हई होऊन. कोंकणीत नऊ ला "णव" म्हणतात आणि 'ण' या अक्षरापासून सुरू होणारे शब्द इतर कोणत्या भाषेत जवळ जवळ नाहीतच! शौरसेनीचा कोंकणीवरचा प्रभाव 'दांडो' 'सुणो' अशा 'ओ'कारान्त शब्दातून दिसून येतो, याच कारणाने म्हणजे शौरसेनीच्या प्रभावामुळे गुजराती आणि बंगाली भाषांमधे असे 'ओ'कारान्त शब्द सापडतात.

महाराष्ट्रमधून मराठी आणि कोंकणी भाषा वेगवेगळ्या विकसित झाल्या असाव्यात, मराठी आणि कोंकणीमधे लक्षात येण्यासारखा ठळक फरक म्हणजे “मी येतो” आणि “मी येते” या दोन्हीसाठी कोँकणीत आहे “हांव येतां”. भूतकाळ आणि भविष्यकाळाची रूपे करताना मात्र “आयलो/आयले” आणि “येतलो/येतले” हे दोन्ही भाषांत सारखंच आहे. पण या दोन्हीं भाषांच्या मधला दुवा म्हणजे 'पैशाचिक प्राकृत'. गोव्यात कोंकणी भाषेत उपलब्ध असलेलं पहिलं लिखाण म्हणजे 'कृष्णदास शामा' याने १५व्या शतकात लिहिलेले गद्य महाभारत आणि रामायण. यांची भाषा खूपशी पैशाचिक प्राकृतला जवळची आहे असं वि. का. राजवाडे यांनी म्हटलं आहे. आजच्या काळातली मालवणी बोली सुद्धा मराठी आणि कोंकणी यांच्या अधेमधे कुठेतरी येते.
ज्ञानेश्वरांनी आपल्या रचना 'अमृतानुभव' आणि ज्ञानेश्वरी' प्राकृतात केल्या असं म्हटलं जातं. अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी दोन्हीत कोकणीला जवळचे अनेक शब्द आहेत. त्यांची उदाहरणं इथे देण्याचा मोह आवरत नाही. 'नेणों' म्हणजे "माहिती नाही", बाईल म्हणजे स्त्री, राती म्हणजे रात्र, दिवो म्हणजे दिवा, नीद म्हणजे झोप, मसी म्हणजे शाई, सोयरीक म्हणजे नातं, आणि असेच कितीतरी शब्द! 'निदेचे जाउपे' ही शब्दयोजना म्हणजे निद्रेचे अपत्य, अर्थात अशा तर्हेेची शब्दयोजना कोंकणीत आजही आहे, ती 'करप म्हणजे करणे, 'खावप' म्हणजे खाणे इ.  ज्ञानेश्वरीत शब्दांची 'ठावो' 'दिवो" अशी 'ओ'करान्त रूपे येतात ती तशीच्या तशी आजच्या कोंकणीतही वापरात आहेत. किंबहुना कोंकणी नीट बोलता यायला लागली त्यानंतरच ज्ञानेश्वरीचा अर्थ सोपेपणाने समजायला लागलाय.

काळाबरोबर गोव्यातले राज्यकर्ते बदलत गेले तसे, कोंकणी भाषेत आणखी अनेक शब्दांची भर पडत गेली. शेतीशी संबंधित शब्द गोव्यातल्या मूळ रहिवाशांच्या बोलीतून कोंकणीत आले, जसे की, कुमेरी, मेर, खाजण. तसंच तांदूळ, नाल्ल (नारळ) ढोल इ. शब्दांचा उगम द्रविड लोकांकडे आहे. इतिहासात कधीतरी सुमेरियन लोक कोंकणात आले असावेत असा एक कयास आहे. कोंकणीतले काही शब्द सुमेरियन भाषेतून आलेले आहेत. श्री अनंत शेणवी धुमे यानी अशी अनेक शब्दांची उदाहरणे दिली आहेत. मूळ कर्नाटकातल्या कदंबांचं गोव्यावर राज्य होतं, तेव्हा काही कन्नड शब्द कोंकणी भाषेत येणं अपरिहार्यच होतं! जसे भांगर म्हणजे सोनं, तांती म्हणजे अंडे, मॉड म्हणजे ढग. तसेच अरब व्यापार्यारनी आपल्याबरोबर दुकान, जवाब. कबूल, चाबूक असे शब्द आणले ते मराठीतही त्याच अर्थाने वापरले जातात. पोर्तुगीज भाषेतले अनेक शब्द कोंकणीत सामावून गेले, जसे, जनेल म्हणजे खिडकी, कदेल म्हणजे खुर्ची, आलमारी म्हणजे कपाट, कोपेल म्हणजे चॅपेल, पाव म्हणजे पाव वगैरे.

पोर्तुगीजांच्या स्थानिक भाषा नाहीशा करण्याच्या धोरणामुळे कोंकणीत असलेलं प्राचीन साहित्य नाहीसं झालं. पोर्तुगीजांच्या अमदानीत संस्कृत, मराठी किंवा कोंकणी पुस्तक जवळ बाळगणं हा गुन्हा समजला जात असे, आणि जी पुस्तकं जप्त होत ती पोर्तुगीजांनी नष्ट करून टाकली. आजही गोव्यातले अनेक लोक पंढरीची वारी करतात, पूर्वीही करत असत, त्यामुळे मराठी संतसाहित्य मौखिक स्वरूपात गोव्यात जिवंत राहिलं. कृष्णदास शामाची कोंकणी कृती 'महाभारत' पोर्तुगालमधल्या एका संग्रहालयात राहिली त्यामुळे त्याचं नाव तरी राहिलं. मराठी आरत्या ज्याच्या नावावर प्रसिद्ध आहेत तो 'विष्णुदास नामा' याच्या नावावर काही कोंकणी रचना आहेत. पोर्तुगीज काळात कोंकणी ही फक्त बोलीभाषा राहिल्यामुळे कोंकणीला स्वतःची अशी लिपी विकसित करता आली नाही. कदंबांच्या काळात 'गोंयकानडी' नावाची एक लिपी वापरात होती, आता ती अस्तित्वात नाही. साधारणपणे देवनागरी ही नंतरच्या काळात कोंकणीची लिपी म्हणून प्रामुख्याने वापरली गेली. काही पोर्तुगीजांनी ख्रिस्ती धर्मप्रसार करण्यासाठी कोंकणी भाषा शिकून घेतली. मग फादर स्टीव्हन्स याने कोकणी व्याकरणाची आणि कोंकणी भाषेवरच्या ग्रंथाची रचना रोमन लिपीत लिहिलेल्या कोंकणीत केली. १६२२ साली प्रकाशित झालेलं हे पहिलं कोंकणी भाषेतील पुस्तक. सध्या कर्नाटकाच्या किनारी भागात कोंकणी लिहायला कानडी लिपी वापरली जाते तर केरळच्या किनारी भागात मल्ल्याळम लिपी. अगदी थोड्या प्रमाणात अरेबिक लिपीही कोंकणीसाठी वापरली जाते.

पोर्तुगीजांच्या अत्याचारांनंतर २० शतकाच्या सुरुवातीला कोंकणीभाषिकांची अस्मिता जागृत झाली. कोंकणी भाषेच्या संवर्धनासाठी मोठं कार्य केलं ते शणै गोंयबाब अर्थात वामन रघुनाथ वर्दे वालावलीकर (१८७७-१९४६) यांनी. त्यांनी कोंकणीच्या संदर्भात मुंबईत राहून फार मोठं कार्य केलं पण त्याचा पाया मराठीचा द्वेष हा होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं होतं आणि आयुष्य मुंबईत गेलं पण त्यांनी आयुष्यात कधी एकही मराठी शब्द उच्चारला नाही असं म्हणतात. त्यांच्या नावावर २९ कोंकणी पुस्तकं जमा आहेत. कोंकणी भाषेच्या संदर्भात आणखी मोठं कार्य करणारे लेखक म्हणजे माधव मंजुनाथ शानभाग, यानी कारवारला राहून आपलं कार्य चालवलं. यानी १९३९ साली कारवार इथे पहिली अखिल भारतीय कोंकणी परिषद भरवली. शब्दप्रभू बा.भ. बोरकर म्हणजे बाकीबाब यानी आपल्या काही कविता कोंकणी भाषेत लिहिल्या आहेत. ‘सासय’ या कोंकणी कवितासंग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. हल्लीच्या काळात मनोहरराय सरदेसाय, शंकर रामाणी, नागेश करमली, जे बी मोराईस इत्यादींनी उत्तमोत्तम साहित्य निर्मिती कोंकणीत केली आहे; पण यावर कळस चढवला तो रवींद्र केळेकराना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराने.


१९६१ साली पोर्तुगीजांच्या पराभवानंतर गोवा हे स्वतंत्र राज्य ठेवावं का या प्रश्नावरून आणि भाषेच्या प्रश्नावरून खूप राळ उडाली. १९६६-६७ आणि १९८६ मधे भाषिक दंगलीही झाल्या. पैकी १९८६ ची दंगल राजभाषेच्या प्रश्नावरून झाली होती. शेवटी राजभाषा म्हणून कोंकणी आणि मराठीला समान दर्जा अशी तोड निघाली. राज्यव्यवहाराची भाषा म्हणून कोंकणी कधीच फार वापरात आली नाही. या पार्श्वभूमीवर आज कोंकणी कुठे उभी आहे? २००१ च्या जनगणनेमधे गोव्याची लोकसंख्या सुमारे १३.४८ लाख होती. यापैकी गोव्यात ७.७० लाख लोकांची मातृभाषा कोंकणी म्हणून नोंदली गेली तर ३.०४ लाख लोकांची मातृभाषा मराठी नोंदली गेली. कोंकणी भाषा बोलणारे ७.६८ लाख लोक कर्नाटकात होते तर ६.५८ लाख महाराष्ट्रात. याचाच अर्थ हा की कोंकणी मातृभाषा असणारे लोक गोव्यापेक्षा इतरत्रच जास्त आहेत! कोंकणी भाषेची चळवळ खरं तर कर्नाटकातून जास्त प्रमाणात चालवली गेली. केरळच्या किनारपट्टीवरही सुमारे ६१००० लोकांची मातृभाषा कोंकणी आहे. गमतीची गोष्ट ही की या जनगणनेमधे भारतातल्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त ०.२४% लोकांची मातृभाषा कोंकणी होती तर सिंधी ०.२५% आणि नेपाळी ०.२८%.

पूर्वापार, म्हणजे पोर्तुगीज अमदानीतच गोव्यात मराठी भाषेतल्या शाळा सुरू झाल्या होत्या. या शाळांनी गोव्यात भारतीय संस्कृती टिकवायला मोठा हातभार लावला. स्वातंत्र्यानंतर या शाळांना सरकारी अनुदाने सुरू झाली. काही शाळा अनुदान मिळवण्यासाठी नावापुरत्या कोंकणी भाषेच्या माध्यमात सुरू झाल्या. प्रत्यक्षात त्यांचं काम इंग्लिशमधूनच चालत असे. हल्लीच गोव्यातल्या सध्याच्या सरकारमधल्या मंत्र्यांच्या एका गटाने इंग्लिश माध्यमाच्या शाळांना अनुदान देण्यासाठी सरकारवर दबाव आणला. पण त्याबरोबर सरकारने असा निर्णय घेतला की नवीन शाळांना अनुदान देणार नाही, तर आता आहेत याच शाळांतील मुलांच्या पालकांनी आपल्याला कोणतं माध्यम पाहिजे ते लिहून द्यावं. जी भाषा १० पेक्षा कमी पालक एखाद्या वर्गासाठी मागतील, ती भाषा बंद करण्यात येईल. यानंतर भाषिक सार्वमताच्या वेळी झाली तशी मोठी रणधुमाळी उडाली. सरकारचं म्हणणं असं होतं की सर्व पालकांना फक्त इंग्रजीच माध्यम म्हणून हवं आहे. एका धार्मिक संस्थेच्या एकूण १७७ शाळांपैकी सर्व शाळांमधे इंग्रजी माध्यम म्हणून लिहून द्यावं असं फर्मान काढण्यात आलं. प्रत्यक्ष आकडे जेव्हा आले, तेव्हा असं लक्षात आलं की इंग्रजी माध्यम म्हणून एकूण २९५५७ पालकांनी मागितलं, मराठी ३१७५९, तर कोंकणी फक्त २५०२!! कन्नड माध्यम मागणार्यांलची संख्या कोंकणी मागणार्यांुपेक्षा जास्त म्हणजे सुमारे ३००० होती. सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी झाली तर कोकणी भाषेवर दूरगामी परिणाम होतील हे सांगायला कोणी तज्ञ नको. सुदैवाने शशिकला काकोडकर, मनोहर पर्रीकर असे अनेकजण या निर्णयाला शक्य त्या सर्व प्रकारांनी विरोध करत आहेत.

गोव्यात रोजच्या वापराची भाषा मुख्यतः कोंकणी आहे, पण मराठी भाषिकही पूर्वापार आहेत. आता त्यात कन्नड, आणि मल्ल्याळम तसंच हिंदी भाषिकांची मोठी भर पडत आहे. याला कारण म्हणजे गोव्यात रेल्वेबरोबर मोठ्या प्रमाणात येणारे कामगारांचे आणि बेकारांचे लोंढे. त्यातून राजकारण्यांनी आपल्या स्वार्थासाठी या सर्व विस्थापितांना गोव्यात राहणारे म्हणून सामावून घेतलंय. याबद्दल कोणाचा विरोध नाही पण या सगळ्या प्रकारात गोव्यातल्या स्थानिक संस्कृतीचं रूप धूसर होत चाललंय. बरं कोंकणी माणूस कमालीचा सहिष्णू. तो सगळ्यांनाच आपल्यासारखे समजतो. आताच बाजारात, बसमध्ये, सगळीकडे सर्रास हिंदी वापरली जाते. २०२० साली गोव्यात भुमिपुत्र अल्पसंख्य असतील असा अंदाज आहे. त्यामुळेच कोंकणी भाषेचं भविष्य खूपच खडतर दिसतंय. मराठी मातृभाषा  म्हणणारे सुमारे ७ कोटी लोक असताना मराठीची दुरवस्था झाली असं आपण म्हणत असतो. तिथे जेमेतेम २५ लाख  लोक बोलतात त्या लहानसा जीव असणार्या कोंकणीने कोणाच्या तोंडाकडे पाहावं?


लेखिका: ज्योती कामत

६ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

व्वा !!

ह्या भाषेच्या इतिहासाची एकदम विस्तृत ओळख करून दिलीत. एकदम माहितीपूर्ण लेख. आवडला !!

प्रदीप वैद्य म्हणाले...

अतिशय अभ्यासपूर्ण लेख ...

तुझा अभिमान वाटला .

क्रांति म्हणाले...

एका गोड भाषेची उत्तम ओळख. खूप आवडला लेख.

अनामित म्हणाले...

good introduction to the history of this language

bare barayla

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

एकदम छान आशिल्लो लेख.

सुधीर कांदळकार

Unknown म्हणाले...

खूप सुंदर, मराठी कोकणी भाषा जपली पाहिजे