भेट!

किती किती दिवसात सांग .. भेट आपुली घडली नाही ।
आणि नभात चंद्रवेल ही .. पुन्हा कधीच फुलली नाही ॥

पाऊलवाटे वरती या बघ
प्राजक्ताचा सडा होता
शब्द-शब्दात तुझ्या माझ्या
पौर्णिमेचा चंद्र होता ।

चांदव्याची कोर ती का ? .. पुन्हा तशी लखलखली नाही ।
किती किती दिवसात सांग .. भेट आपुली घडली नाही ।।

श्वासांचा तुझ्याच मी
माळला होता गजरा
सांगीतले अन रातराणीला
थांब माझ्या अंगणी जरा ।

वाट पाहूनी त्या कळ्यांची .. फुले अजुनी उमलली नाही ।
किती किती दिवसात सांग .. भेट आपुली घडली नाही ।।

दिवस होते शुभ्र कळ्यांचे
चमचमत्या चांदण्या रात्री
गंध सुखांचा क्षणाक्षणावर
अशी जुळुनी आली नाती ।

दिवस थांबला क्षितिजावरती .. रात्र काजळी ढळली नाही ।
किती किती दिवसात सांग .. भेट आपुली घडली नाही ।।

दूर दूर च्या देशीचा
कृष्ण मेघ तो एकला
चमकली दामिनी जरी
शब्द नाही बोलला ।

बरसला नाही मेघ म्हणूनी .. धरा ही रंगली नाही ।
किती किती दिवसात सांग .. भेट आपुली घडली नाही ।।

कवयित्री: मनीषा भिडे

५ टिप्पण्या:

अमित गुहागरकर म्हणाले...

हळूवार..! तरल..! कल्पना छान आहेत.

क्रांति म्हणाले...

खूप सुंदर गीत!

ulhasbhide म्हणाले...

अगदी सहजतेने भाव व्यक्त झालेत.

सुहास म्हणाले...

मस्त... भावना हळुवारपणे शब्दात गुंफल्या आहेत :)

Alvika म्हणाले...

sundar. mandani hi oghavati.