फरक

काळचे सर्व काम आटपून दिवसभराच्या प्लॅनिंग ला सुरवात केली. ठरल्याप्रमाणे आज मी आणि ती दिवसभर फिरायला जाणार होतो. सर्व आवरून माझी दुचाकी काढली . बर्‍याच दूर जायचे होते म्हणून इंधन भरायला पेट्रोल पंपावर गेलो. खिशातून ५०० रु काढून त्याला दिले ,त्याने पेट्रोल भरून पावती मला आणून दिली . सहजच मी आणि ती धुंद अश्या वातावरणात "मुळशी"ला (पुण्यापासून ३५ कि,मी.) जाण्यास निघालो . रस्त्यावर खूप लोक निदर्शने करत होती, पेट्रोल दर वाढीबद्दल !  मी म्हणालो " अरे यार परत ह्या लोकांची नाटकं सुरू झालीत, ह्यांना ना, फक्त बहाणा हवा, सोड, आपल्याला काही फरक नाही पडत " असे म्हणून मी आणि ती परत त्या रोमांटीक वातावरणात पुढे चालू लागलो .
डोळ्याला भुरळ पाडणारा निसर्ग संगतीला होता आमच्या. सुंदर दर्‍या , धबधबे , आणि पडणारा तो बेधुंद पाऊस त्या वातावरणाला अगदी पूरक असा होता. पाहता-पाहता दिवस संपून रात्रीची चाहूल लागली. अंधार व्हायच्या आधी घरी पोहचायचं होत म्हणून परतीला निघालो दोघे . दिवस ओसरून चांदण्यांची चाहूल लागली होती , माझ्या दुचाकीला सुद्धा माझ्या मनातलं कळत असावं म्हणून ती पण सुसाट धावत होती.
सर्व काही कसं मस्त असं चाललं होतं, पण मधूनच गाडीचा वेग आणि आवाज बदलल्या सारखा वाटला,
काही वेळातच गाडी बंद झाली  निर्जन जागी !  दूर दूर पर्यंत कोणी सुद्धा नव्हतं. टाकीत कचरा असेल म्हणून जरा पेट्रोल तपासून पाहिलं तर काय
 इंधन.... समाप्त ...... आई शप्पत !!  भयानक पंचाईत झाली होती , जवळपास कुठेही पेट्रोल पंप नव्हता, संपूर्ण प्रेममयी वातावरण पेट्रोल संपल्यामुळे प्रदूषित झालं. काही सुचेना . ती म्हणाली, अरे सकाळीच पेट्रोल घातलेलं होत ह्यात ५०० रुचं.
नक्की असेल पेट्रोल त्यात, नीट बघ त्यात ..... पण काय, नाईलाज होता . काही तरी पाहण्यास सहज खिशात हात गेला , तर पेट्रोलची पावती होती  आणि त्यात लिहिले होते Petrol per liter 500 Rs .
ते पाहून माझी वाचाच गेली .... संध्याकाळी न दिसणारे तारे, ग्रह आणी उपग्रह सुद्धा दिसू लागले. न कळत पणे सकाळची घटना अगदी जशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहिली .
१) इंधन (पेट्रोल) भरायला ५०० रु दिलेत , पावती न तपासता पुढे चालायला लागलो .
२) रस्त्यावर निदर्शने करणार्‍या लोकांना  " अरे यार परत ह्या लोकांची नाटकं सुरू झालीत, ह्यांना ना, फक्त बहाणा हवा, सोड आपल्याला काही फरक नाही पडत " असे बोललो .

आणि खरंच फरक पडला .....!
घरापासून २५ कि.मी दूर मी आणि ती गाडी ढकलत चालत होतो .
आणि रस्त्यावरच्या खड्याने माझी झोप उघडली ...  मी माझ्या पलंगावर होतो ...

खरंच पेट्रोल दरवाढीने फरक पडतो सामान्य माणसावर ?


लेखक: राकेश दिनेश शेन्द्रे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: