नाळ !

बाळ जन्माला आल्यावर आईशी असलेली नाळ तोडून टाकतात तेव्हा आईला आनंद होतो...आपली सुटका झाल्याचा आणि बाळाच्या जन्माचाही. बाळ बाहेरच्या जगात येऊन स्वत:च श्वास घेऊ लागतो त्यावेळी त्या दोघांनाही ती नाळ तोडल्याचा आनंद होतो. पण पुढच्या आयुष्यात मात्र ही नाळ त्या आईला वारंवार तोडावी लागते. ती एकदाच तोडून तुटत नाही. अनेकवार तोडूनही ती मनाने जोडलेलीच राहते... आयुष्यभर!

आज असे माझ्या मनात का बरं विचार येत आहेत? हं...त्या दिवशीचा खोलवर रुतलेला काटा निघतच नाही. प्रसंग तसा साधाच. लेक पार्टीला गेलेली. सगळ्या मुलीमुलीच होत्या. पार्टीचे ठिकाणही गावातीलच...दूरचंही नाही. पण वेळ रात्रीची होती. रात्री अकरा वाजेपर्यंत धीर धरला आणि नंतर फोन केला..मोबाईलवर. एकदा,दोनदा,तीनदा...’नो आन्सर’चा मेसेज झळकला. रात्री अकरा म्हणजे फार उशीर नव्हे पण सांगू...मुलं मोठी होतात त्यांच्या दृष्टीने...आईच्या दृष्टीने ती लहानच असतात. साडेअकराला लेक घरी आली ती तणतणतच! हा बॉम्बस्फोट होणार हे माहीत असूनही मी अशी का वागते? कळत नाही. एवढ्याजणी आम्ही होतो पण एकीच्याही घरून नवर्‍याचा की घरच्या कोणाचाही फोन आला नाही, तुझा सोडून. मी एकटीच दादरची,बाकीच्या तर लांब राहणार्‍या! तुलाच एकटीला काळजी,बाकी कोणालाही नाही. आईला काळजी वाटणं हा गुन्हा आहे? आईचं प्रेम करणं चुकीचं आहे, त्याची चारचौघात लाज वाटावी असं काय आहे? काहीही कळत नाही.

लेक शाळेत जाऊ लागली. खूप रडायला लागली. त्यापेक्षाही ’माझी आई’कडे (पाळणाघर) नाही जाणार म्हणून रडून गोंधळ घातला होता. पण नोकरीवर जाणं भाग होतं. घरात दुसरं कोणी तिला सांभाळायला नाही. तेव्हाही नाळ तोडायला लागली. नंतर लग्न झालं. घर सोडून निघाली...तेव्हा तर दुसरं घर, दुसरी माणसं...कसं होईल माझ्या लाडक्या लेकीचं? त्यावेळी तर नाळ तोडताना रक्तबंबाळ झालं मन.

चिरंजीवाचा तर दुसराच नमुना...मनाप्रमाणे शिकू दे...असे स्वातंत्र्य दिल्यामुळे शिक्षणाचे क्षेत्र त्याने निवडतानाच लक्षात आलं की याला घरापासून दूरच राहायचे आहे. मरीन इंजिनियरिंग केलं. मर्चंट नेव्हीमध्ये सहा महिने बोटीवर तर सहा महिने घरी असा मामला सुरू झाला. लग्न स्वत:च जमवलं...म्हटलं, जाऊ दे. आपला तीन बेडरूमचा मोठा फ्लॅट आहे...आता बायको,मुले यांच्यामुळे तरी यापुढे सहा महिने तरी याचा सहवास मिळेल...पण कसचं काय! सुनेच्या वडिलांनी एक एकुलत्या एक मुलीसाठी वेलफर्निश्ड ब्लॉक आपल्याजवळच घेऊन ठेवला होता. पाचपरतावण्याच्या दिवशी जेवण झाल्यावर आमच्या देखतच जावयाला ब्लॉकच्या किल्ल्या भेट म्हणून दिल्या. एवढा मोठा मोह टाळायला माझा मुलगा काय संत आहे? अशी त्याही दिवशी नाळ तुटली ती तुटलीच.
पण समाधान दुसर्‍यात मानत होते. लेक तशी गुणाची होती. येत जात होती. जवळच घर होते. पण असे वारंवार प्रसंग यायचे की मनात यायचे की आपल्या अस्तित्वाची गरजच काय!आपल्याविनाही सारं काही छान चालेल की! पूर्वीची चार आश्रमव्यवस्था किती छान होती...वानप्रस्थाश्रम घेतला की मन सगळ्यातूनच आपोआप काढलं जायचं! पूर्वीची लोकं खरंच खूप शहाणी होती नाही?

आई,अहो आई,ऐका ना! मी काय सांगतेय...अलकाच्या हाकेने मी भानावर आले. आमची कामवाली, खूप वर्षे काम करणारी,सर्वांशी प्रेमाने वागणारी,प्रामाणिक आणि कोणत्याही कामाला नाही म्हणणार नाही की कधी कसली अपेक्षा करणार नाही अशी अलका! काय गं,काय ऐकू तुझं! अहो,माझ्या सुनीताचे लग्न ठरलंय! छान स्थळ आलंय,करून टाकते लग्न! माझ्यासारखे तिच्या नशिबी नको भांडी घासायला!...पुन्हा नाळच! पुन्हा मी स्वत:ला भानावर आणले आणि म्हटलं, मग करून टाक लग्न! हो आई; पण एवढा खर्च नाही झेपणारा! तुम्ही किती मदत करणार? मी फेडते सर्व तुमचे,हळूहळू! मी म्हणजे भावनेच्या पुरात एकदम वाहून जाणारी,म्हणून म्हटलं,लेकीला विचारते व उद्या तुला सांगते. गंमत आहे ना, लेकीला माझ्या सल्ल्याची कधी गरज पडत नाही; पण मला मात्र गरज पडते कारण तशी पुढची पिढी व्यवहारकुशल आहे. आम्ही आपले बावळट,भावनाप्रधान! बरं आई, मला ना दोन दिवसात सांगा हं...असे म्हणत ती निघून गेली.

आणि...दरवाज्याची घंटी वाजली!कन्यारत्न हजर!
काय गं,आज अशी अचानक कशी आलीस?
मोबाईलसारखंच...नो आन्सर!उत्तर द्यायलाच हवं असं कुठे आहे का? मी मात्र त्याच प्रश्नाचा धागा पकडून पुढे बोलले,कशी आलीस ते जाऊ दे! पण तुला एक विचारायचं होतं,सल्ला हवा होता. अगं,आपल्या अलकाच्या लेकीचे लग्न ठरलंय तर तिने विचारलंय की काही मदत कराल का? घाबरत घाबरत,तिच्या चेहर्‍याकडे, डोळ्याकडे  न पाहता, एखाद्या सुनेसारखे खाली मान घालून विचारले.
आई, तू पण ना वेडीच आहेस! त्यात मला काय विचारायचं,अलकाला जरूर मदत करायला पाहिजे.पण तू नको करूस! किती हवेत तिला? अगं,पंधरा-वीस हजार तरी द्यायला पाहिजे. बरं मग तिला सांग देते हवे तुला तेवढे. त्यातले पाच हजार आपल्याकडून तिच्या लेकीला आहेर म्हणून सांग. त्याच्यापुढे किती हवे असतील...दहा-पंधरा,ते देईन. ते मात्र फेडायला हवे तिने. व्याज बीज नको हं आपल्याला! अशा वेळेला मदत नाही करायची तर केव्हा?

माझ्या मनात एक खूप मोठ्ठं प्रकाशाचं कारंजं उडालं. मी अंतर्बाह्य उजळून निघाले आणि ते कारंजं मला म्हणालं, वेडी आहेस तू! तुझी नाळ कधी तुटलेलीच नव्हती. तुझ्या भावनांचा,विचारांचा,संस्कारांचा स्रोत अखंड वाहतच आहे तुझ्या मुलीत...अदृश्यपणे, जो कधी तुला कळलाच नाही.


लेखिका: श्रीमती जयबाला परूळेकर

४ टिप्पण्या:

ashwini म्हणाले...

chan

ashwini म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
सुहास म्हणाले...

मस्त... पण थोडे अजुन प्रसंग यायला हवे होते, त्यामुळे कथेचा प्रभाव वाढला असता :):)

सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! नेटवर्क तुटले नव्हते म्हणजे. मस्त.