अविस्मरणीय दीपावली.

२००३ सालातली ही गोष्ट आहे.  भारतीय दिवाळीचा सण जवळ येऊन ठेपला होता तरी केवळ घरातील मराठी कॅलेंडरमध्येच तो दिसत होता. तिथे घराबाहेर सणाचा मागमूसही नव्हता. तेव्हा आम्ही चीनमध्ये राहत होतो. तिथे कसली आली आहे दिवाळी? तिथे ना विविध वस्तूंनी भरलेली दुकाने, ना गोड धोड फराळाचा घमघमाट. ना शाळेला सुट्टी  ना कामाला. त्यामुळेच की काय, घरातही सणाचा फारसा उत्साह वाटत नव्हता. त्यावर्षी दिवाळी घराबाहेरच काढायची असा आमचा निर्णय पक्का झाला. शनी- रवीला लागून कामावर दोन दिवस सुट्टी टाकली आणि चीनमधील ग्वांशी (Guanxi) भागातील गुईलिन (Guilin) येथे जायचे ठरवले.

लहानसा विमान प्रवास करून गुईलिन ह्या चीनच्या निसर्गरम्य अश्या जागी येऊनही थडकलो. ऑक्टोबर महिन्यात तिथे फारच थंडी पडली होती. तरीही बाहेर फिरायला न जाणे हा शुद्ध मूर्खपणा ठरला असता. आधी ऐकल्याप्रमाणे गुईलिन अतिशय विलोभनीय शहर आहे याची तिथे पोहोचल्या पोहोचल्याच खात्री झाली. नदी किनारी, डोंगर कड्यांनी वेढलेले गुईलिन शहर अत्यंत अद्ययावत असे आहे. विमानतळ, मोठमोठाले रस्ते, लांब-रुंद पुल, उच्च शिक्षण संस्था आणि महाविद्यालये, विकसित रुग्णालये यांनी परिपूर्ण असलेल्या गुइलिन शहराने आपले नैसर्गिक सौंदर्य राखून ठेवले आहे. चोहो बाजूंनी डोंगराचे उंच कडे, त्यामधून वळणे वळणे घेत वाहणारी  लि नदी हेच तिथले मुख्य आकर्षण. गुईलिनमधे रस्त्याने कुठूनही कुठेही जा, ही नदी आपली साथ कधीच सोडत नाही. म्हणूनच अनेक प्रवाश्यांचे भरमसाठ लोंढे तिथे वर्षभरासाठी असतात. टूरिझम हाच तिथला मुख्य व्यवसाय म्हटला तरी चालेल. तिथे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अश्या काही प्रेक्षणीय जागा आहेत. परंतु नदीचे सौंदर्य प्रत्येक जागी सर्वाधिक लक्षवेधी होते. कधी उथळ भागात उगाचच खळखळून वाहणारी ही नदी आम्हाला अवखळ बालिश वाटली तर तिचे कधी उंच सखोल भूभागावरून आपल्याच नादात धुंदपणे उंडारणे एखाद्या किशोरीसारखे भासले. लाजत, मुरकत नखरेलपणे कमनीय वळणावळणाने झुळझुळणारी ही नदी तर थेट स्वप्नातली नवयुवतीच. तीच नदी अचानक समजूतदार होऊन मर्यादित पात्रात शांतपणे पसरत जाताना दिसली की आश्चर्य वाटायचे. एखाद्या स्त्रीचे लहानपणापासून प्रौढावस्थेपर्यंत रूप जसे पालटताना दिसते तशीच ही नदी विविध अंगी निरनिराळी दिसली. तिची ती सर्व मनोहारी रूपे आमच्या डोळ्यांचे पडदे पार करून मनाच्या पटलावर कायमची रेखली गेली. अशी ही अनोखी निसर्गाकृती मानवनिर्मित कॅमेरा नामक वस्तूत भरभरून साठवून घेण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. प्रत्येक वळणावळणाला आपली अधिकाधिक दिलखेचक अदा पेश करणारी ही नदी तर जणू एखाद्या फोटो-शूट सेशन मधली सिनेतारकाच! आम्ही हे दृष्टिसुख उपभोगायची एकही संधी सोडत नव्हतो. आम्ही किना-या किना-यावरून तिला त्रयस्थपणे न्याहाळले. तसेच तिच्या पात्रात उतरून तिच्या अंतर्मुखाचा तळ शोधायचा प्रयत्न केला. आम्ही तिला पूर्णपणे जाणले असे नाही पण तिच्या व्यक्तीमत्वाचा ठसा आमच्या हृदयात कायमचा ठसला.

लि आहेच तशी. म्हणूनच तिची देखभाल करण्यात तिथल्या सरकारने कुठलीही कसर सोडलेली नाही. अनेक कायदे करून तिचे संरक्षण केले जाते. तिच्यामध्ये कुठेही गाई, म्हशी डुंबत नव्हत्या. त्यात कुणीही कपडे, भांडी, वाहने धुताना दिसले नाही. यासाठी काही वेगळी सोय केल्याचे समजले. तिच्या आजूबाजूला फारशी घरे ही दिसली नाहीत. हिरवी गार शेते, लहान मोठी झाडे झुडपे आणि काळ्या पांढ-यामधील विविध छटा असलेले डोंगर मात्र किना-यावरून तिचे सौंदर्य अधिक खुलवत होते. त्याचमुळे जगभरातील पाहुणे केवळ या तिला पाहायला गुईलिन शहरात येतात. या पाहुण्यांना नैसर्गिक सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी येथे अनेक सोयी ही आहेत. परंतु त्या सर्वच आधुनिक नाहीत. तेथील पुरातन म्हणण्यापेक्षा पारंपरिकपणाचा आनंद लुटायला हे परदेशी आसुसलेले दिसतात. बांबूच्या आडव्या सपाट होडीवर उभे बांबू लावून त्यावर लहानसे छप्पर आणि त्या खाली दोन चार खुर्च्या टाकून तितक्याच माणसांना सफर करवली जाते.

लि मधली ही बांबू राफ्टिंगची सफर करायला सर्वात मजा आली. बांबू राफ्टिंग करताना नदीच्या पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाताना अर्थातच अधिक काळ लागला. यात काही खडकाळ भूभाग आहेत तर काही सपाट. या बांबू होडीचा नावाडी बांबूनेच ही होडी पुढे पुढे सरकवत होता. अर्थाजनाचा हा मार्ग तिने आणि तिथल्या सरकारनेही रहिवाश्यांना उपलब्ध करून दिला होता. म्हणूनच नावाडी चिनी भाषेतले गाणे मजेत गुणगुणत प्रेमाने होडी हाकत होता. त्याला ती सपाट बांबू बोट “चुबुक, चुबुक“ आवाज करून साथ देत होती. त्या भर दुपारीही प्रखर सूर्य दिसलाच नाही. निळसर आकाशातून निळाई आजूबाजूच्या डोंगरावर, तिच्या जलाशयावर उतरली होती. त्यावर पांढ-या तलम धुक्याने आपली जाळीदार ओढणी अंथरली होती. थंडगार वारा ती ओढणी विस्कटवण्याच्या हेतूने हवेत उगाचच घिरट्या मारत फिरत होता. बारीकसे पक्षी मधूनच पंख फडकवून त्या चेष्टेला साथ देत होते. ती पाण्याची चुळबूळ, चिनी गाण्याचे सूर तिथल्या शांततेला भंग न करता अधिक निरामय करीत खुलवीत होती. तिथे मी पूर्वी न पाहिलेली अशी एक गंमत पाहायला मिळाली. नदीचे पाणी वाहून वाया जाऊ नये आणि त्याचा वापर योग्य प्रकारे व्हावा यासाठी सरकारने काही ठिकाणी विशेषत: गुइलिनमध्ये तिच्या पात्रात पाय-या केल्या आहेत. पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्या-या पाय-यांमुळे पाणी तळ्यासारखे साचून राहते. तिथे अधिक होऊन जमा होत राहत असले तरी पाण्याचा वाहायचा वेग काहीसा मंदावतो. त्या ठिकाणी बांबू राफ्टिंग होत नाही असे नाही. वरच्या पायरीवरून बांबूची सपाट बोट खालच्या पायरीवर बांबूने ढकलली जाते; तीही त्यावर बसलेल्या प्रवाशांसह!! बोट खालच्या पायरीवर उतरताना जी पाण्याची कारंजी उडतात त्यात भिजायला प्रवासी आवडीने जातात. त्यातील बांबूची बोट उलटून होणा-या अपघाताचा धोका पत्करायला प्रवासी तयार असतात. अर्थात नदी फारशी खोल नसल्यामुळे बुडून मरण्याची भिती नसावी. शिवाय या सफरीसाठी लाईफ जॅकेट ही आवश्यक असते.

याच सफरी मधील अजून एक नमूद करावीशी वाटणारी गोष्ट म्हणजे पक्ष्यांनी केलेली मासेमारी- Cormorant Fishing. अश्याच लहान बोटींवर बगळ्यांसारखे Cormorant पक्षी घेऊन पारंपरिक मासेमारीचा हा प्रकार दाखवला जातो. खास प्रकारचा सराव दिलेल्या ह्या Cormorant पक्ष्यांच्या पायाला दोरी लावून त्यांना पाण्यात सोडले जातात. पाण्यात सूर मारून ते पक्षी मासे चोचीत पकडतात. परंतू त्यांच्या गळ्याला हलक्याने बांधलेल्या दोरीमुळे मोठे मासे गिळू शकत नाहीत. परंतू लहान मासे मात्र सहजी गिळू शकतात. मोठा मासा चोचीत पकडला की तो पुढे घशात न सरकता तिथेच राहतो. पक्षी बोटीवर परतल्यावर मासेमारी करणारे कोळी पक्ष्याच्या चोचीतून मासे काढून घेतात. ही क्रूर अशी दिसणारी मासेमारी तिथली पूर्वापार चालत आलेली पद्धती आहे. हा खेळ बाहेरून आलेल्या प्रवाशांचे खास आकर्षण ठरला आहे.
गुईलिन(Guilin) मध्ये म्युझिअम, डोंगरातील गुहा, उंच कडे, त्यावरील बाग, अश्या अजूनही काही प्रेक्षणीय जागा आहेत. परंतु नितळ, स्वच्छ, सुरेख लि नदी मात्र न विसरण्याजोगी होती. तिच्यामुळेच आमची त्या वर्षीची दिवाळी अविस्मरणीय ठरली. तिला आम्ही डोळ्यात आणि मनात काठोकाठ साठवून घरी परतलो.




लेखिका: मीनल गद्रे


(ह्या ध्वनीचित्रमुद्रणातील काही छायाचित्रे आणि संगीत महाजालावरून साभार.)

२ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

मीनल, सुंदर प्रवासवर्णन केलंस. अगदी प्रत्यक्ष पहात आहोत, असं वाटावं इतकं जिवंत आणि स्वाभाविक!

पाषाणभेद म्हणाले...

सुंदर प्रवासवर्णन.
lekhan sundara zaley.