कुठे हरवले बालपण ?

मी शेजार्‍यांच्या घरी सहज जाऊन बसले. त्यांची सून समोर बसली होती.तिला म्हटलं," काय म्हणतीय शाळा?" ती शाळेत शिक्षिका आहे.
ती एकदम म्हणाली, “सुरेखा आत्या, या वर्षी तर गेल्या वर्षीपेक्षा जास्त कडक शिस्त झाली आहे. गेल्या वर्षी निदान  जेवण झाल्यावर हात धुण्याच्या निमित्ताने रांगेत का होईना पण मुलं वर्गाच्या बाहेर जात होती. पण आता या वर्षी मुलांनी डबा वर्गातच खायचा आणि वर्गातच बसायचे."
"का तुमच्या कडे ग्राउण्ड नाही का?" मी विचारलं.
तशी ती म्हणाली, "आहे, चांगलं मोठ्ठ ग्राउण्ड आहे पण खेळायलाच देत नाहीत. बिचारी लहान मुलं सकाळी आलेली असतात ती संध्याकाळपर्यंत तशीच बसून असतात. तुम्ही सांगितलं तसा अनुभव यायला लागला आहे. खूप कसं तरी वाटतं या मुलांकडे पाहून."
ती अगदी मनांपासून बोलत होती. मी हा सगळा अनुभव अनेक वर्ष जवळून घेतला त्यामुळे मलाही कसंतरी झालं. इकडचं तिकडचं बोलून घरी आले. पण डोक्यातून तो विषय जात नव्हता. क्षणभर वाटून गेलं खरंच आपण किती नशीबवान. आपली शाळा अशी नव्हती आणि आपलं बालपणही असं नव्हतं. शाळेत जाताना आम्हाला कधी रडू नाही आलं. शाळा कधी कैदखाना वाटत नव्हती.
मार्च महिना आला की आम्हाला खूप आनंद व्हायचा. कारण एक तारखेलाच सकाळची शाळा सुरू व्हायची. सकाळी साडेसात ते साडेअकरा शाळा असायची. आतासारखी दीड वाजता उन्हांत नाही सोडायचे शाळा, आता मुलांना भर उन्हात सोडतात. रिक्षा मिळत नाहीत. बसने  जाणारी मुलं बसची वाट बघत उन्हांत थांबून लाल भडक होतात. आमच्या वेळी असं नव्हतं. उन्हं चढण्याच्या आत मुलांनी घरी असावं हा उद्देश असायचा. तेंव्हा मार्चच्या सुरुवातीला थोडी थंडी असायची. सकाळी लवकर उठून अंघोळ करून दूधपोहे, सातूचे पीठ, लाह्यांचे पीठ असे काही तरी खाऊन मुद्दाम लवकर जायचे. जाताना खिशात गोट्या घालायला विसरायचे नाही. शाळेत गेल्यावर जेवढा वेळ मिळेल तेवढा वेळ गोट्या खेळून घ्यायच्या. तासही कमी वेळाचे असायचे. शाळा भरभर संपायची. बारापर्यंत घरी असायचो.


तेंव्हा वाडा संस्कृती होती. मोठे वाडे, त्यात बरेचसे भाडेकरू असायचे. संडास, बाथरुम, नळ सगळं सामायिक असायचं. आमचाही वाडा तसाच मोठ्ठा. सात आठ बिर्‍हाडं. दोन दोन खोल्या, समोर मोठाल्या ओसर्‍या, सगळं सामायिक. प्रत्येकाच्या घरात माणसंही भरपूर असायची, नात्यातली, शिकायला वगैरे ठेवून घेतलेली. पण सगळं सामायिक असून कधी कुणाला अडचण वाटली नाही. सगळीकडे तडजोड करायची . सगळं गुण्या गोविंदाने चालायचे. आम्ही मुलं शाळेतून आलो की कुणाच्यातरी घरी सगळ्यांची आंगतपंगत चाललेली असायची. तुझं मीठ माझं तेल असं काही नाही. सगळ्यांनी सगळं आणायचं ज्याला जे लागेल ते खायचं, तिथं  हिशोब नसायचा. हे रोज चालायचे. कामवाली सगळ्यांची एकच. वाड्याच्या मधोमध एक चौक होता. तिथे ती सगळ्यांची भांडी घासायची. मग दुसर्‍या दिवशी तुझी वाटी माझ्याकडे माझा पेला तुझ्याकडे असं चालायचं. शाळेतून आल्यावर जेवण झाले की ओसरीवर आम्ही खेळायचं. शिवाशिवी, लपंडाव, आंधळी कोशिंबीर, कोलांट्या उड्या असे खेळ खेळायचे. वाड्यातल्या बायकांची उन्हाळी कामं चालायची. शेवया, वळवटं, पापड लाटणं. रोज एका घरचं असायचं. आम्ही खेळताना खूप गोंगाट व्हायचा. मग कोणीतरी म्हातारी माणसं ओरडायची,
"अरे किती गोंधळ करतायत रे पोरांनो. आणि बसून खेळा की, कुठं पडलात, लागलंबिगलं तर?"

पण कोणाच्याही आईला राग यायचा नाही. आम्ही लगेच खेळ बंद करायचो. मग खेळाच्या पिशव्या काढायच्या आणि खेळपाणी खेळण्यात मग्न व्हायचे. ओसरीवर कुठेतरी खेळ चालायचा. मुलांनी ऑफिसला जायचे, मुलींनी स्वयंपाक करायचा. पाण्यात साखर घालून चहा व्हायचा, चुरमुर्‍यात पाणी घालून भात व्हायचा, गुळाला दाणे चिकटवून लाडू व्हायचे. खेळ रंगून जायचा. चार वाजून गेले की उन्हं उतरलेली असायची. मग सगळ्या मुलांनी म्हणजे लहान मोठ्या सगळ्या मुलांनी गच्चीवर अभ्यासासाठी जायचं, जाताना खाण्यासाठी कच्चे शेंगादाणे, कच्च्या पापड्या, खारोड्या (बाजरीचे सांडगे)घेऊन जायचं. सगळ्यांनी मिळून खायचं. अभ्यास भरपूर, कुणीही न सांगता करायचा. कारण खेळून मन तृप्त झालेलं असायचं. त्यामुळे अभ्यासात लक्ष लागायचं. संध्याकाळपर्यंत अभ्यास करून खाली यायचं. सगळ्यांच्या घरात देवाला दिवा लावलेला असायचा. शुभंकरोती म्हणून झालं की पुन्हा अभ्यास करायचा. आमच्या शेजारी एक सोवळ्या बाई होत्या, त्यांना कुणीच नव्हतं, त्या एकट्याच राहत. त्या संध्याकाळी दशमी खात, दशमी म्हणजे दह्यातलं थालीपीठ असे. ते दह्यात कुस्करून त्याचा काला करत आणि आम्हा सगळ्या लहान मोठ्या मुलांना हातावर त्याचा घास देत. खूप छान लागत असे. त्यासाठी सगळ्यांची घाई असे. (ती चव मी इतक्या वर्षानंतरही विसरलेली नाही).  रात्री टी.व्ही.. वगैरे नसल्याने सगळ्यांकडे साडेसात आठलाच जेवणं व्हायची. सगळ्या बायका ओसरीवर गप्पा मारीत बसायच्या. मुलं थोडावेळ खेळून झोपून जायची.

परीक्षा झाल्या की सुट्ट्या लागायच्या. चांगल्या दोन महिन्याच्या सुट्ट्या. मग कुणाकडे काही कार्य असलं की खूप पाहुणे जमायचे. ते कार्य सगळ्यांच्या घरचं असायचं. आम्हा मुलांची चैन असायची. सकाळपासून सावलीत जे खेळ खेळता येतील ते खेळायचे. चार वाजले की वाचनालयात जायचे. सहापर्यंत गोष्टींची पुस्तकं वाचायची. सहा वाजता समोरील बागेत खेळायला जायचे. सात वाजता घरी आले की थोड्यावेळाने जेवायची ताट घ्यायची अन गच्चीवर जायचे. मग कोणी कोणती गोष्ट वाचली ते सांगायचे. सगळ्या जादूच्या गोष्टी ऐकून वेगळ्या दुनियेत गेल्यासारखं वाटायचं. सगळे गच्चीवर झोपायला यायचे त्यामुळे खूप छान वाटायचे. सकाळी उठायचा तगादा नसायचा. मात्र रोज कुणाचं तरी वाळवण असायचं. पापड्या, कुरवड्या, खारोड्या वगैरे. कुरवड्या असतील त्यादिवशी मात्र उठवायचे. ज्याला चीक आवडत असेल त्याला उठवायचे. सगळी मुलं पटापट तोंड धुऊन वाट्या चमचे घेऊन बसायची. चीक कुणाचा असायचा मुलं कुणाची असायची. हिशोब नव्हता. मध्येच केंव्हातरी बाहुलीच्या लग्नाचा कार्यक्रम  असायचा. शेजारी एक गावमामी होत्या. त्यांना लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे मामीच म्हणायचे. त्यांची मुलं थोडी मोठी होती. पण त्यांना लहान मुलं फार आवडायची. त्या मुलांकडून मांडव घालून द्यायच्या. एक पुण्याचं कुटुंब होतं. त्या छोटं साखरेच रुखवत करून द्यायच्या. कुणी दागिने करून द्यायचं तर कुणी कपडे शिवून द्यायचे. मंगलाष्टकं वगैरे म्हणून जोरदार लग्नं व्हायचं. मग मामींनी सगळ्यांना हळदी कुंकू लावून, पानसुपारी देऊन चिवडा लाडू, पन्हं असा फराळ द्यायचा. त्या निमित्ताने मला फराळाला बोलावता येते असं त्या म्हणायच्या. किती एकोपा होता. कधी भांडणही व्हायचं, वादविवादही व्हायचे. पण कधी कुणी टोक नाही गाठलं. त्याचा परिणाम मुलांवर होणार नाही याची काळजी घेतली जायची. 

हळू हळू वय वाढत गेलं. दिनक्रम तोच राहिला. फक्त खेळाचं स्वरूप बदललं. पत्ते, कॅरम, व्यापार हे खेळ आले. सुट्टी संपत आली की पाहुण्यांची मुलं आपआपल्या गावाला जायची. मग आम्ही मुलांनी घरांत येऊन ढसा ढसा रडायचं. दोनतीन दिवस करमायचं नाही. पण शाळा सुरू होणार असल्यामुळे नवीन पुस्तकं वह्या, त्याला कव्हर चढवणं. ह्यात पुन्हा दंग होऊन जायचं. पाऊस सुरू व्हायचा. पावसाचा वास, नवीन पुस्तकांचा वास, अधाश्यासारखे पुस्तकातले नवीन धडे वाचून काढायचे. वेगळं वातावरण सुरू व्हायचे. पहिल्या दिवशी शाळेत लवकर जाऊन पहिला बाक पटकावण्याची चढाओढ असायची. खरंतर नंतर उंचीप्रमाणेच बसवले जायचे. पण लवकर जाण्याचे दुसरेही कारण असायचे. सुट्टी कशी घालवली ते सांगायचे. पुस्तकं दाखवायची. आणि गोट्या किती जिंकल्या ते सांगण्यासाठी खिशात गोट्या घेऊन जायचे. दोन चार दिवस अभ्यास व्हायचा नाही. बघता बघता आषाढ श्रावण सुरू व्हायचे. अधून मधून सुट्टी मिळायची. श्रावणात सोमवारी पाच तासानंतर शाळा सुटायची. मंगळवारी बारा वाजता शाळा असायची. एखाद्या शिक्षिकेचं नवीन लग्न झालं असेल तर त्या नवीन बांगड्या, दागिने, नवीन साडी, हार अशा मंगळागौरीची पुजा करून यायच्या. वाड्यात कुणाची मंगळागौर असेल तर जागरण असायचं. मंगळागौरीचे खेळ खेळले जायचे. आम्हा मुलांना ती पर्वणीच असायची. गणपती आले की मेळे असायचे. नाच गाण्यांची प्रॅक्टिस सुरू व्हायची. मेळे पाहायलाही सगळे मिळून जायचे. आणि आमचेही मेळे व्हायचे. दसरा दिवाळी सगळे सण एकोप्याने व्हायचे. नवरात्रात सगळ्यांच्याकडे आरती असायची. तर दिवाळीला सगळ्यांच्याकडे फराळाचं आमंत्रण असायचं. नंतर मात्र अभ्यासाची गंभीरपणे दखल घेतली जायची.  संक्रांतीचे पतंग उडवून झाले की परत सकाळच्या शाळेचे वेध सुरू व्हायचे. रोजची शाळा पण सकाळी साडे नऊ ते साडे तीन. त्यामुळे वेळ भरपूर मिळायचा. कधी आम्हाला अभ्यास करा म्हणावं लागलं नाही. कारण.......
          
त्या वयात जे मुलांना पाहिजे असतं ते सगळं मिळाल्यामुळें मन तृप्त होतं. काय पाहिजे असतं त्या वयात मुलांना? आईवडील, घरांत जी कोणी वडील माणसं असतील, (काकाकाकू, आजीआजोबा वगैरे) त्यांचा जास्तीत जास्त सहवास, प्रेम, शेजार्‍यांचा आपलेपणा, शाळेतली घरच्यासारखी वागणूक, आणि त्या वयातल्या मित्रमैत्रिणी. हे ज्याला मिळतं त्याच बालपण सुखद असतं. नाही  तर ते करपून जातं.

आता काळ बदलला आहे
, परिस्थिती बदलली आहे. मुलांची बाल्यावस्था मात्र तीच आहे. मुलांना आताही तेच पाहिजे असतं. पण आता दिसतं काय तर मुलांचं बालपण हरवलं आहे. ह्या धकाधकीच्या वातावरणात ते पार कुठेतरी दूर निघून गेलं आहे. पण ह्याला जबाबदार कोण? पैशाच्या पाठीमागे लागणारे, पैसे असतील तर मुलांना वाटेल ते देऊ शकतो अशा भ्रमात राहणारे, घरात कुणी बघणारे नाही म्हणून वसतिगृहात पाठवणारेशाळा, शिकवणी, वेळ असलाच तर एखादा क्लास(गाणं, चित्रकला, नाच) असं सतत मुलांना गुंतवून ठेवणारे, हे पालक, का दिवसभर डांबवून ठेवणार्‍या शाळा, का ढीगभर गृहपाठ देणारे शिक्षक?  छोट्या छोट्या खांद्यावर मणामणाचे ओझे घेऊन जाणारी लहान मुलं बघितली की मन सुन्न होतं.

मी असे पालक पाहिले आहेत की मुलांना ते दुसर्‍या मुलांबरोबर खेळायला जाऊ देत नाहीत. मग बंद घरामध्ये ही मुलं सतत टी.व्ही. पुढे बसतात. जे मुलांच्या दृष्टीने चांगले नसते. काही जणांना भातुकलीचा खेळ खेळलेलं आवडत नाही. खेळू द्या न त्यांना भातुकलीचा खेळ. मुलांना जसं समजायला लागतं तसं त्यांना प्रथम आपलं घरटंच दिसतं. ते त्याचंच अनुकरण करायला पाहतात. त्यांच्या खेळात घर असतं, स्वयंपाक करणारी आई असते, ऑफिसला जाणारे बाबा असतात, ताई असते, दादा असतो. घर आणि घरातल्या परिवाराच नातं समजायचं हेच वय असतं. त्या वयात घर, नातं नाही समजलं तर ते कधीच समजत नाही. आणि मुलगी जर लहानपणी भातुकली खेळली तर ती पुढे काहीच करू शकणार नाही असे थोडेच आहे? गावात अजून मुलं लहानपणचं सुख अनुभवतात पण मोठ्या शहरात हे दुर्मिळ होत चाललं आहे. कारणं खूप आहेत.

घरं लहान, शाळा लहान, डोक्यावर अभ्यासाचं प्रचंड दडपण, ह्या मुलांनी खेळायचं तरी केंव्हा आणि कुठे? सध्याच्या काळात जे काय सुख मिळतं ते लहानपणीच. एखाद्याच्या नशिबी तेवढंही नसतं तो भाग वेगळा. पण एकदा लहानपण संपलं आणि माणूस पैसे मिळवायच्या मागे लागला की आयुष्यातली सगळी सुखं हरवून बसतो.  मग उरतात त्या फक्त  लहानपणच्या सुखद आठवणी. एक सुखद विरंगुळा. ह्या विरंगुळ्यापासून ही चिमुरडी दूर जातायत. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. ते मोठे झाल्यानंतर त्यांना असं वाटता कामा नये की

"कुठे हरवले आमचे बालपण?”

धन्यवाद.

लेखिका: सुरेखा कुलकर्णी
(चित्रं महाजालावरून साभार)

२ टिप्पण्या:

सुधीर कांदळकर म्हणाले...

थोडा सकारात्मक विचार हवा होता. सध्याची परिस्थिती इतकी काही वाईट नाही. परिस्थितीचा उगीचच बाऊ केलेआ आहे असे वाटते. काळ जास्त वेगाने बदलला आहे. खेळणारी मुले खेळतात, बक्षिसे देखील मिळवतात. नसती तर एशियाड, ऑलिंपिकमध्ये एवढे भारतीय खेळाडू दिसले नसते. आज गल्लीगल्लीत तेंडुलकर दिसतात. कबड्डी, खोखो देखील व्यवस्थित चालू आहेत.

Alvika म्हणाले...

hmmm, khare ahe. this has happened because of nuclear family and competition everywhere.