"निरागसता आणि कुतुहल!"कास...सातारा येथील या निसर्ग-रम्य ठिकाणी भेट देण्याचा योग आला. गावात फेर फटका मारताना एक आजीबाई, आपल्या नातीला शाळेत नेताना पाहिली! आजीबाईच्या चेहर्‍यावरचं हसू मात्र खूपच निरागस होतं...अगदी मनापासूनचं होतं. उत्साहात, आपल्या नातीला सांभाळत ती हसर्‍या चेहर्‍याने शाळेची वाट चालत होती. सस्मित चेहर्‍याचे कारण कुठलंही असलं तरी, तिच्या चेहर्‍यावरचं ते हास्य मात्र माझ्या मनात घर करून राहिलं! तिच्या सोबत असलेली तिची नात, खट्याळपणा करत होती.
खरंच, आपण आयुष्यात किती वेळा असं निरागसपणे हसतो? कोणत्याही क्षणाला भूतकाळ आणि भविष्यकाळापासून मुक्त ठेवतो? आल्या क्षणाला साजरं करण्याची हिंमत दाखवतो? एखादा खूप मेहनत करणारा मजूर रात्रीची झोप सुखाने घेतो, पण सगळ्या सुखसोयी पायाशी असूनही श्रीमंत माणसाला झोप का लागत नाही? त्याला झोपेच्या गोळ्या खाव्या लागतात, का? याचं कारण आपल्या मनाला आपणच स्थिर ठेवत नाही. प्रत्येक क्षणातला तृप्तीचा आनंद आपल्याला वेचता येत नाही! आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाविषयी आपली तक्रार असते, नाहीतर चुकांची केलेली सारवासारव असते! पण तृप्तीचा हा समतोल  आपण का नाही साधू शकत?
आपल्या मनातही एक सुंदर सृष्टी आहे...निरनिराळ्या विचारांची, कोणतेही विचार हवे तेव्हा निर्माण करण्याची क्षमता आहे आपल्यात. या क्षमतांचा वापर करून येणाऱ्या प्रत्येक क्षणांचा निरागसपणा जपण्याचा प्रयत्न करूया.....


छायाचित्रकार आणि लेखक: आल्हाद पाटील

५ टिप्पण्या:

विशाल म्हणाले...

छानच रे भाऊ :)

amolebirje1982 म्हणाले...

mastach!!!!

शांतीसुधा म्हणाले...

खूपच छान छाचि आहे.

सुहास म्हणाले...

मस्त रे !!

सुधीर कांदळकर म्हणाले...

नातीचा अगोचरपणा, आजीच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहणारे कौतुक, जिवंतपणा असा की आत्ता नात पळेल, नाहीतर वळून आजीला गुंगारा देईल, आजी तिच्यामागे धावेल आणि मग नातीच्या चेहर्‍यावर विजयाचे निरागस हसू उमटेल. जिवंतपणाबरोबरच नातीच्या हालचालीतली अनपेक्षितता पण मस्त टिपली आहे.

झकास! झकास!! झकास!!!