’नॉनस्टिक’चा तडका!

“अगं, तुला जुनी नॉन स्टिकची भांडी बदलून नवीन घ्यायची आहेत का?” इति नणंदेचा फोनवर मला प्रश्न.
“हो, पण ब्रॅण्डेड नॉन स्टिक ची भांडी बरीच महाग आहेत , कोणी आहे का स्वस्तात देणारं ;-) ?”, माझा त्यांना प्रतिप्रश्न.
“तेच सांगायला तुला फोन केलाय. माझ्याकडे एक जण आलाय, मी नेहमी त्याच्याकडून अश्या वस्तू घेते, चांगल्या असतात टिकाऊ. तुमचा पत्ता देऊ का त्याला ? येईल तो घेऊन वस्तू ! आणि ऐक, त्यांची एक स्कीम चालू आहे. मी तुझा पत्ता त्याला दिला आणि तू काही घेतलंस तर तुला एक गिफ्ट मिळेल आणि मी पत्ता दिला म्हणून मला पण मिळेल.” पुनश्च नंणदेची फटकेबाजी.
“चालेल, द्या. पण गिफ्ट काय आहेत ?” आता मूळ वस्तूपेक्षा न पाहिलेल्या फुकट मिळणार्‍या गिफ्टने मला आकर्षित केले.
“अगं, आहेत बर्‍याच...मी देते त्याला तुमचा पत्ता,येईल तेव्हा त्यालाच विचार, चल ठेवते”. नणंदबाईंनी स्वत:चं गिफ्ट खुंटा हालवून बळकट केलं.
पत्ता दिलाय पण माणूस काही लगेच येईल असे नाही, असा विचार करून मी पुन्हा माझ्या कामाला लागले. पण १५-२० मिनिटांतच तो माणूस एका हातात आमच्या पत्त्याची आणि दुसर्‍या हातात नणंदेच्या पत्त्याची चिठ्ठी घेऊन दत्त म्हणून हजर झाला. वास्तविक आम्ही त्या वेळी अगदी पानावर बसायच्या तयारीत होतो, म्हणून त्याला संध्याकाळी या असे सांगून पिटाळायचा विचार केला.
पण तो अगदी चिवट विक्रेता होता. “कोई बात नही, भाभीजी. कितना टाइम लगेगा आपको खाना खाने में?”
“अरे भाई, टाइम जायेगा, आधा घंटा तो कम्मसकम लगेगा”, माझ्या बंबैय्या हिंदीत त्याला हाकलायचा क्षीण प्रयत्न करून पाहिला.
“चलेगा, भाभीजी.......आप शांतीसे खाना खाओ. मै आधे घंटे के बाद आता हूं”,
“अरे, एक काम करना ना आप, शाम को आ जाईये शांतिसे देख लेंगे सब सामान. अभी थोडा घाई है” अडखळत्या बंबैय्या चा आधार.
“अरे, पर वो जो स्कीम है ना, वो आज के दिन ही है, आप को नही चाहिये तो कोई जबरदस्ती नही है लेनेकी, पर देखने मे कौनसा हर्ज है?”
“अच्छा ? ठीक है ! फिर आधे घंटे बाद आ जाओ. हम लोग खाना निपटाते है तब तक”. माझ्या डोळ्यासमोरून गिफ्ट जात नव्हत्या.
“वांदा नही, आप खाना खाईये, मै रूकता हूं” चिकाटीने घोडे पुढे दामटत तो पुढच्या इमारतीच्या दिशेने निघाला.
**************************
रविवारचा दिवस असल्याने सगळी मंडळी घरात होती. तो गेल्या गेल्या नवरा आणि चिरंजीव माझ्यावर डाफरले,”काय गरज होती त्याला अर्धा तास सांगायची, चांगला तास लागेल म्हणून सांगायचे ना !, पिडा कुठची, एक रविवार आराम मिळत नाही”. नवर्‍याच्या झोपेत आणि चिरंजीवाच्या दूरचित्रवाणीवर लागलेला चित्रपट पाहण्यात येणारा व्यत्यय या प्रतिक्रिया देत होत्या पण माझ्या गिफ्टच्या आड ही क्षुद्र माणसे येऊ पाहत आहेत हे मला सहन झाले नाही.
“बिचारा, इतक्या उन्हातान्हात ओझी घेऊन हिंडतोय. आपण त्याला साधे पाणी देखील विचारले नाही. चला जाऊदे, आता गिळा पटापट तो यायच्या आत, उद्या नव्या नॉन स्टिक तव्यावरच्या ताज्या पोळ्या हादडाल ,तेव्हा मलाच दुवा द्याल”. माझ्या गिफ्टवर संक्रांत येऊ नये याकरता मलाच तोंडाची तलवारबाजी चालवणे भाग होते.
***************************
चटाचटा जेवण आटपून आणि पटापटा आवरून मी खिडकीत त्याची वाट पाहत बसले. न जाणो हा विसरला आणि निघून गेला तर काय घ्या ? किंवा स्कीम चे नाव ऐकून बाकीच्या बायकांनी त्याच्याकडच्या सगळ्या वस्तू उचलल्या तर ? शी बाई ! उगाच जेवा-बिवायच्या फंदात पडलो! आता नाहीच आला हा प्राणी परत.... तर कुठे शोधत हिंडायचे? मन चिंती ते वैरी न चिंती. असतील नसतील त्या देवांचा धावा करून झाला आणि क्षण आला भाग्याचा......तो माणूस दृष्टिक्षेपात आला. मी त्वरित जाऊन दरवाजा उघडून, त्याच्याकरता खुर्ची मांडून प्रतीक्षेत बसले.  
तो आला...आणि सरळ मांडी घालून खाली बसला. त्याच्याजवळच्या बॅगेतून एक एक वस्तू काढून दाखवत राहिला. मध्येच त्याने, “आपके पास पुराना नॉन स्टिक का सामान है ना लेकीन?” असे विचारले.
“हा है ना ! घबराओ मत, एक छोड तीन तीन है रिटर्न करने के लिये”.
“बहोत बढिया, जरा दिखायेंगे क्या है?”
मी आतून जाऊन तीन रया गेलेले पण जणू याच संधीची वाट पाहत असावेत असे तवे घेऊन आले.
“चलेगा, एक आयटेम का १००/- कम होगा”.
“बस, खाली सौ? अरे लेने जाओ तो कितना महंगा मिलता है” श्रीं चा नाटकात प्रवेश. एव्हाना चिरंजीवही दूरचित्रवाणी बंद करून शेजारी येऊन बसले होते. सासू देखील झोपेतून उठून बसली होती.
“अरे क्या करे साहब, ये तो भंगार मे जायेगा, इसका कुछ नही आता. वजन पें जाता है. वैसे तो हम लोग लेते नही है ये चीज. पर अभी स्किमका है तो चलता है. एकसाथ सब बर्तन बेचते है तो कुछ थोडाबहुत कमाने को मिलता है. अभी ये देखो, ये तीनो का तीनो तवा फोकट गया है. भाभीजी इसको आप युज नही करना, पायझन है इसमें. एक बार कोटींग निकल जाये तो इससे पायझन बनता है. खाने में मिक्स होता है. इसे दोबारा कभी मत युज करना”. आपली आई आणि बायको आपल्याला विष खाऊ घालत आहे ह्या अविश्वसनीय धक्क्याने अनुक्रमे चिरंजीव आणि नवरा हादरलेले असतानाच...
“नही, नही वो इस्तेमाल नही करती हूं मै. दुसरा है अच्छावाला” माझी बाजू सावरून घ्यायचा माझा प्रयत्न.
“फिर कोई वांदा नही भाभीजी. ऐसा करो, इसका मै तीनसो रुपया दे दूंगा. आप इसमे से कोई भी आयटेम सिलेक्ट करो”.
“मतलब ? देखो मेरेको रोटी तवा चाहिये, ये तीन तवा ले लो और इसके बदले रोटी तवा दे दो, और कुछ गिफ्ट भी देने वाले हो ना आप”.
“अरे, देंगे ना भाभीजी, गिफ्ट तो आपही को देंगे , हम रखके क्या करेंगे. पर पहले ये आयटेम तो सिलेक्ट करो”.
“पर इसमे रोटी तवा नही है, मुझे तो वो ही चाहिये था”.
“तो क्या हुवा भाभीजी, आप इसमेसे कोई आयटेम ले सकते हो, ये देखो, पॅन है, कढाई है, आमलेट वाला छोटा तवा है...इतने सारे बर्तन है, कोई भी ले लो”.
“अरे वो सब है मेरे पास, बस तवा नही है, वो दे दो और कुछ नही चाहिये”.
“तवा तो अभी नही है भाभीजी, एक बचा था, वो बाजूवाले बिल्डिंग मे से ले लिया, इधरसे गया था तो”.
झालं !  म्हणजे मगाशी याला नंतर ये म्हटलं ते आपल्यावरच शेकलं की ! झालं म्हणजे तवा पण नाही आणि गिफ्टपण नाही :-(
“फिर क्या करेंगे?”
“अरे चिंता क्यू करते हो, इधर मेरे पास नही तो क्या हुआ, दुकान मे रहेगा ना !”
“दुकान है किधर आपका ?”
“इधरही पिछे बाजू, वो जो डान बास्को का गराज आता है ना, उसके वो बाजू, रोडसाईड पे है”
“ अच्छा ! नजदीकही है मतलब, तो लेके आओ ना”
“अरे मॅडमजी, अभी किधर वापस जाके लेके आये, अभी तो ये माल खतम करके दुकान जायेंगे, खाना खायेंगे फिर गिफ्ट देने निकल जायेंगे” भाभीजीची मॅडमवर पदोन्नती.
“पर देखो मुझे तो इसमेसे कोई भी आयटेम नही चाहिये, वो सब मेरे पास पहलेसेही है, मुझे बस रोटी तवा ही चाहिये”
“ठीक है, भाभीजी चिंता मत करना, आप अभी इसमेसे कोई एक आयटेम ले लो, शाम को गिफ्ट आयेगा वो रख लो, कल तो हमारा दुकान बंद रहेगा. मंगलवार को मै खुद रोटी तवा लेके आऊंगा और ये चीज वापस ले के जाऊंगा”
“पर फिर मंगलवार को ही ले लूंगी, आज क्या जल्दी है?”
“जैसी आपकी मर्जी भाभीजी, पर आज लेती तो गिफ्ट मिलता आपको. मंगलवार को खाली चीज मिलेगी”.
“हे राम ! अशी पण भानगड आहे का?, अरे पर जब तवा नही है आपके पास तो और कुछ ले के क्या फायदा”
“अरे भाभीजी, आपको बोला ना मैने मंगलवार आ के तवा दे जाऊंगा, ये चिज वापस ले जाऊंगा, जो भी पैसा बनता है मेरा आपके पास वो भी लौटा दूंगा. आप खाली फुकट टेन्शन ले रही हो”. भाभीजी च्या दिराने धीर न सोडता विक्रीचे तंत्र राबवायला सुरुवात केली.
“तो फिर एक काम करते है, इसमे से कोई भी चीज ले लेती हूं, ये तीन तवे का पैसा इसमेंसे कम कर लेना और नये तवे का पैसा जोड कर जितना बनता है उतना दे देती हूं. चलेगा ना !”
“अरे नही भाभीजी, वो जो स्कीम है ना उसमे क्या है...हम लोग को कार्ड दिखाना पडता है...कौनसा आयटेम बेचा करके. अगर उसमे फरक हुआ तो फिर गिफ्ट नही मिलेगा. फिर आप भी नाराज हो जायेंगी और हम को भी बुरा लगेगा के मेरे भरोसे कश्टमर रहा और आपका नुकसान किया”.
“फिर क्या करु ?”
“देखो, इसमेसे कोई भी आयटेम ले के रख्खो, ४.३० बजे हमारी मॅडम आपके नाम का कार्ड ले के आयेगी, बस एक याद रखना उन्होने पूछा तो इतना बता देना की पिछली बार भी कुछ नॉन स्टीक आयटेम हमारेसे लिया है”.
“क्यूं , ऐसा क्यूं?”
“क्यूं की ये स्कीम खाली पुराने कश्टमर के लिये है, जिन्होने पहलेभी कुछ लिया है हमारेसे”.
“पर अगर ये स्कीम उन लोगोंके लिये ही है, तो आप यहा क्यूं आये हमारे घर? हमने तो कभी आपसे कुछ लिया नही है”.
“अरे भाभीजी, ये गिफ्ट का स्कीम दुकान का है, पर कमिशनके लिये हमको भी तो बेचा हुआ आयटेम दिखाना पडता है ना. अब जब आप मेरा फायदा कर के दे रही है तो मेरा भी फर्ज बनता है ना के आपका फायदा करके दूं”. कलियुगात रामावतार ? बात कुछ हजम नही हुई.
वास्तविक तो जो काही म्हणाला ते पटले नाही पण गिफ्टचा मोह सोडवत नव्हता.
“अच्छा, लेकीन ये गिफ्ट कौनसा है ? और जिसने मेरा पता आपको दिया उनको भी मिलेगा ना? नही तो मेरेको गालियॉं पडेंगी”.
“अरे घबराओ नही, दोनोंको मिलेगी. शाम को मॅडम टेम्पो लेके आयेंगी, जो चाहे चुन ले ना”.
“मुझे मिक्सर चाहिये, है क्या उसमे ?”
“हा, क्यूं नही मॅडमजी. है ना मिक्सर है, पॉपकॉर्न मेकर है..बहोतसी आयटेम है. चुन लेना जो चाहे”
यानंतर घासाघीस करून मी ७५० रु. किमतीची एक कढई त्याच्याकडून विकत घेतली. तिची किंमत मला जास्त वाटत होती, शिवाय ती ब्रॅंण्डेड नव्हती. पण नॉन स्टिक वस्तू महागच असतात हे माहिती होतं. ७५० रु. तले तीन तव्यांचे रु.३०० त्याने वळते करूनदेखील मला त्याला वर दानावर दक्षिणा म्हणून रु.४५०/- द्यावे लागले. मला हवा असलेल्या रोटीतवा रु.५९०/- चा आहे, त्यामुळे रु.५९०/- वजा रु. ४५०/- मिळून रु.१४०/- मला त्याच्याकडून येणे होते. जाताना मात्र तो ती कढई न वापरण्याबद्दल निक्षून गेला.
******************
तो गेल्यावर नवरोबांनी मिठाची गुळणी सोडली आणि बोलते झाले ,” रु. ५९०/- च्या खरेदीवर तो तुला मिक्सर देणार म्हणजे भरपूर मार्जिन असणार त्याला मग निदान भाव करून पैसे तरी कमी करून घ्यायचेस ना.”
मी गिफ्टचे मांडे भाजत असल्याने त्यांच्या कुत्सित बोलण्याकडे नेहमीच्या पद्धतीने दुर्लक्ष करती झाले.
संध्याकाळी ४.३० ची मी आतुरतेने वाट पाहत होते. ती गिफ्ट घेऊन येणारी बया काही येईना. त्या भाभीजीच्या दिराने मला मानभावीपणे त्याचा भ्रमणध्वनी दिला होता आणि त्याचे नाव संदीप असे सांगितले होते. एकदा वाटले त्याला फोन करून विचारावे. पण मग वाटले इतका आततायीपणा कशाला करावा. येईल ती, थोडं मागे-पुढे होईल...त्यात काय एवढंसं.
जरा उशीराने ६ च्यापुढे आम्ही उभयतां नवरात्राची तयारी आणायची म्हणून बाहेर पडलो. अर्थात सासूबाई घरात होत्या, त्यांना गिफ्ट म्हणून मिक्सर घेण्याची आठवण करून मगच बाहेर पडलो. परत येईतो आमची गिफ्ट काही आमच्यापर्यंत आली नव्हती. दुसर्‍या दिवशी सोमवार असल्याने दुकान बंद असणार असं त्यानेच सांगितलेलं चांगलं लक्षात होतं माझ्या. त्यामुळे बहुतेक मंगळवारी एकदमच तो गिफ्ट आणि तवा आणेल असं वाटले.
सोमवारी सकाळी नणंदबाईंचा ऑफिसातून गिफ्टबद्दल विचारणा करण्याकरता फोन आलाच. त्यांनीही गिफ्ट मिळालेली नसल्याचे सांगितले, त्यावर मी त्यांना आश्वासन दिले की, तो माणूस उद्या तवा घेऊन माझ्याकडे येणार आहे...त्याला विचारीन किंवा तुम्हाला काय हवंय ते सांगा,मी घेऊन ठेवते असंही सांगितलं.
मंगळवार उजाडला पण पुढच्याच दिवशी घटस्थापना असल्याने नवरात्राच्या तयारीच्या गडबडीत मी होते. ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेले. बुधवारही गेला..घटस्थापना झाली....तरीही गिफ्टचा पत्ता नाही की त्या तव्याचाही. आता मात्र मला शंकेची पाल मनात चुकचुकायला लागली. मी त्याने दिलेल्या फोन नंबरवर फोन करायला सुरुवात केली पण फोन बंद ठेवण्यात आलेला आहे अश्या आशयाचा निरोप ऐकू येत होता. पुढचे तीन-चार दिवस मी सातत्याने त्या दिलेल्या क्रमांकावर फोन करायचा प्रयत्न करत होते. चार दिवसांनी एकदाचा त्या क्रमांकावर फोन खणखणला तेव्हा माझ्या आनंदाला पारावर उरला नाही. पण तो आनंद फार काळ टिकला नाही. कारण हा नंबर मुंबईच्या फोर्ट भागातल्या कोणातरी माणसाचा होता, ज्याचं नाव संदीपही नव्हतं आणि त्या व्यक्तीचा नॉन स्टिक भांड्यांशी चमच्याचा देखील संबंध नव्हता. थोडक्यात त्या संदीप नामक भाभीजीच्या दिराने भाभीजी ला चुना लावल्याचे स्पष्ट झाले. अर्थात माझ्याकडे त्याच्याकडून घेतलेली कढई होती म्हणजे अगदीच काही नुकसानीत नव्हते. मग मी सहजच त्या कढईचा खोका काढून त्यावर किंमत पाहिली तर छापलेली होती रु. ४२५/- फक्त. म्हणजे त्या वस्तूची मूळ किंमत फक्त रु.४२५/- असताना रु.७५०/- सांगून वर तीन तव्यांचे प्रत्येकी रु.१०० प्रमाणे एकूण रु.३००/- कमी करून देखील माझ्याकडून रु.२५/- जास्त उकळले होते. मला हसावं की रडावं ते कळेना. एक माणूस माझ्या घरात येऊन, घरात माझ्याखेरीज नवरा, मुलगा, सासू समक्ष सगळ्यांच्या नाकावर टिच्चून आम्हाला फसवून जातो आणि आम्ही केवळ नणंदेने पाठवलेला माणूस आहे ह्या भरवशावर त्यावर विश्वास टाकतो याला आमचे भाबडेपण म्हणावे की मूर्खपणा म्हणावा हे कळेचना. त्याच वेळी त्या खोक्यावरची किंमत का नाही पाहिली ? किंवा त्याने भले दिला फोन नंबर पण आपण तो तिथल्या तिथे लावून खात्री का नाही करून घेतली या पडलेल्या प्रश्नांना आता काही अर्थ नव्हता. मागच्या वेळी जी फसवणूक झाली होती त्यातून आम्ही आमच्या अक्कलहुशारीने फसवणूक होता होता वाचवली होती त्यावेळी माझ्या कामी आलेल्या सिक्स्थ सेन्स बद्दल मला फार अभिमान वाटला होता, तो यावेळी कुठे शेण खायला गेला होता, कोण जाणे. कोणीही यावे टिचकी मारूनी जावे प्रमाणे कोणीही यावे आणि फसवूनी जावे याचा भयंकर अपमान वाटतो.शिवाय अशी फसवणूक झाली की साहजिकच राग येतो, फसवणारी व्यक्ती कुठे तरी याची फळं भोगेल असे म्हणून आपण आपली तात्पुरती समज काढतो, पण आपण कोणाला पाच पैशाला फसवलेले नसताना आपल्या बाबतीतच हे का घडावे ? याचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही हेच खरे.


लेखिका: श्रेया रत्नपारखी

५ टिप्पण्या:

कविता नवरे म्हणाले...

mast khuskhushit shailit mandlay anubhav :)

क्रांति म्हणाले...

कितीदा असं फसतो ना आपण! मस्त लिहिलं आहे अगदी.

श्रेया म्हणाले...

धन्यवाद कविता आणि क्रांति

सुधीर कांदळकर म्हणाले...

हे फिरते लोक कोणताही कर भरीत नाहीत. बहुतेक असे फिरस्ते हे घरफोडी करणारांचे खबरी असतात. घरफोडी करायची घरे हे लोक हेरतात. तेव्हा सांभाळून. धरात तर सोडा, अशांना बंगल्याच्या काय, सहनिवासाच्या गेटमधून देखील आत घेऊं नये.

अमित गुहागरकर म्हणाले...

लेख वाचून मजा आली.. पण तुमची फसवणूक झाली, याचं दू:ख झालं.

बाकी चमच्याचा संबंध, भाभीजीची मॅडम म्हणून पदोन्नती, चिरंजीव आणि नवर्‍याला विष खाऊ घालत असल्याचा धक्का वगैरे पंचेस आवडले. लेखनशैलीही सुंदर.