गणवेश !

"अगं आई माझी शाळा सुरू होतेय पुढच्या आठवड्यात , लक्षात आहे ना तुझ्या ?" इति अनन्या .

आता मला तर हिचे टाईमटेबल अगदीच पाठ होते त्यात , कधी हिची शाळा सुरू होतेय असे झालेय , कारण ही घरी असली की ऑफिसला सतत हिची चिंता काय करत असेल , एकटीच आहे ,जेवण केले की नाही , किती टी.वी. पाहतेही ....त्यातच भरीस भर म्हणजे आपण हिच्यासोबत जास्त टाइम स्पेन्ड करू शकत नाही ही अपराधीपणाची भावना मनात यायची . तरी मी खूप प्रयत्न करून ऑफिसातली सारी कामे पटापट आपटून जिवाचा आटापिटा करत घरी येई ते फक्त ह्या आमच्या राणिसरकारांसाठी ........  चला आता या धावपळीतून जीव सुटणार . असा विचार करत अनुकडे वळत म्हटले , " अगं हो गं बाई माहितीये ,असे सांगतेय जसे खूप मोठ्ठा पराक्रम गाजवणार आहेस ! शाळाच सुरू होतेय त्यात काय नवीनं ?"

"अगं नवीनं कसे नाही म्हणतेय तू , अगं सगळेच तर नवीनं नाही का ? आता मला नवीनं वर्गात जायचेय तर नवी पुस्तके , वह्या शाळेच सामान नको का ? तू ना सगळे विसरते बघ आई ." असे म्हणत अनन्या आपले तोंड फुगवून बसली . तिच्या त्या गोंडस चेहर्‍यावरचा तो रागामुळे झालेला फुगा पाहून माझे हसू आवरेना , मनात आले आता माझ्या खारूटीची शाळा सुरू झाले की सारे घर खाली होऊन जाणार आधीच हा ऑनसाईटला असल्यामुळे घरी एकटे वाटते , आता हिची शाळा सुरू झाली की मला घर जसे खायला उठेल . या विचारानेच माझा जीव कसावीस झाला . पण तेवढ्यात माझी खारुटी येऊन मला बिलगली आणि म्हणते कशी "ए आई का गं गप्प झालीस अशी, मी तर असेच  म्हटले कारण मला वाटले तू खरेच विसरली . सॉरी गं  ...रागावलीस का ? आई बोल ना प्लीज.. "

तिच्या स्पर्शाने मी भानावर आली , पाहते तर काय खारुटी रडकुंडीला आलेली . मग तिला जवळ घेत म्हटले
"अगं नाही गं अने, मी माझ्या खारुटीवर कशी रागावणार ! मी तर हा विचार करत होते की आपल्या खारुटीला काय काय सामान आणावे लागणार शाळेसाठी ! आपण या शनिवारी जायचे ना मग खरेदीला ?"
माझ्या या वाक्यानेच अनन्याची कळी खुलली रडकुंडीला आलेल्या चेहर्‍याचे अगदी फुलपाखरू झाले आणि मग सामानाची यादी सांगायला सुरुवात केली राणिसरकारांनी..

"हे पहा मला एक कंपास , एक नवीनं दप्तर ,एक शाईचा पेन , रिबिन्स.......हं आणि आई वह्यांची यादी न  आपण दुकानात जाऊन करू कारण मला विषय माहीत नाही किती आहेत ते... ..." झाले सुरू अनेचे यादीपुराण .....

"ए आई या वेळेस ते मला कॅमलचे नवीनं कलर घेऊन देशील का , अग कसले छान आहेत माहितीये तुला !!
आई घेऊन देशील का गं प्लीज ?? मी अजिबात कपडे खराब करणार नाही खरेच प्रॉमिस.....प्लीज घेऊन दे ना ..." हिचे लग्गा लावणे सुरू , मला तिची गंमत वाटत होती , कसला निरागस निष्पाप चेहरा करून पटवत होती मला ,हिला रंग घेऊन देणे ही एक कटकट होती खरे तर , कारण त्यानंतर ही तिच्या कपडयांची आणि सार्‍या घराची रंगरंगोटी करत असे !

पण तिचे मन मला मोडायचे नव्हते म्हणून म्हटले ठीक आहे घेऊयात . असे म्हणताच "माझी आई , माझी आई " करत आमच्या खारुटीचा अगदी मातृप्रेमाचा वर्षाव झाला माझ्यावर !!

हिची एकीकडे बडबड चालू असताना माझी कामांची आवराआवर सुरू होती . ती आपली मनात गोष्टींची यादी करण्यात गुंग झालेली . थोडा वेळाने हिची बडबड बंद झाली म्हटलं फायनली संपले वाटते यादी प्रकरण ! असा विचार करते तोच ही धावत माझ्याकडे आली जणू काहीतरी खूप मोठ्ठ सांगायचेय असल्या आवेशात ..
ही म्हणते "अगं आई मेन तर सांगायचेच राहिले " मनात म्हटले नक्की हिला काही तरी सटरफटर हवे असणार !
" अगं मी या वर्षी चौथीत जाणार ना " इति अनन्या
मी आपली कन्फ्युज , आता तिसरी झाली तशी चौथीतच जाणार ना . तरी ती हिरमुसू नये म्हणून मी म्हटले ,
"हं चौथीत जाणार तर मग ?"

"अगं मी आता चौथीत जाणार म्हणजे मोठ्यांच्या शाळेत जाणार नाही का ?"

आता छोट्यांची शाळा आणि मोठ्यांची शाळा हा कन्सेप्ट असा की , बालवाडी ते तिसरी ही छोट्या मुलांची शाळा आणि चौथी ते दहावी ही मोठ्या मुलांची शाळा पण ही मुले  त्या छोट्या मुलांची शाळा आणि मोठ्या मुलांची शाळा यातला "मुलांची " हा शब्द गाळून फक्त छोट्यांची शाळा आणि मोठ्यांची शाळा बोलत असत...!

"बरे मग , मोठ्यांच्या शाळेत जाणार तू , त्यात काय ..आता तुझी शाळा फक्त दुपारची होणार ....त्यात काय फरक पडेल तुला ?"
"अगं आई असे काय करतेस तू , अगं त्याचां शाळेचा ड्रेस आणि आमचा ड्रेस वेगळा नाही  का?? आपल्याला या वेळेस माझ्यासाठी नवीनं ड्रेस घ्यावा लागेल .....कळले का तुला?"

" अगं हो की खरेच ! " मी.

"शाळेचा ड्रेस ... गणवेश "....या शब्दानिशी मनात खुडबूड झाली ...खूप काही जुळलेले होते त्या गणवेशाशी.....

" आबा आज काम नका सांगू मला , आज म्या शाळेत जाणं लई जरुरी हाये ..मायला सांगाना म्यास्नी शेतावर आज नको पाठवायला......." मी आबांना चहाचा कप हातात देता देता अगदी काकुळतीने सांगत होते . आबा माझे ऐकत असत , त्यांना मी शाळेत जाणे आवडत असे , आपल्याला शिकता नाय आलं म्हणून काय आपली पोरं शिकली पाहिजे असे त्यांचे मत , ह्याउलट आय चे तिला मुलींनी शाळेत जाणे पटत नसे , मुलींनी आपले घरचे काम आवरावे , नाहीतरी लग्नानंतर काय करणार ही शिक्षणाचे ....काय करायचे शाळेत जाऊन ..अशी तिची मते , त्यामुळे ती मला शाळेत जायला नेहमी हटकत असे . पण आबांसमोर काही चालत नसल्यामुळे शाळेत जायचं असेल तर घरची सारी कामं आवरून जा , असा तिने दंडक काढलेला होता.

पण मला आज शाळेत लवकर जायचे होते , कारणंच तसे होते ....आज माझे खूप दिवसांचे स्वप्न पूर्णं होणार होते , त्या कल्पनेनेच मी आज खूप खूश होते..... कालच आमच्या शाळेत एक मोठ्या अक्षरात फळ्यावर सूचना लिहिलेली होती .

"उद्या दि.२६ जुलै रोजी सकाळी १० वाजता , सरकारी योजनेमार्फत आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थिनींना जिल्हाअधिकार्‍यांचा हस्ते गणवेश वाटप करण्यात येणार आहे .

सर्व विद्यार्थिनींनी सकाळी ९.३० वाजता शाळेच्या मैदानावर हजर राहावे . कार्यक्रमास गैरहजर असणार्‍या विद्यार्थिनींना गणवेश मिळणार नाही .
                             
                           - मुख्याध्यापिका-
                                                            श्रीमती भोसले."


काल ती सूचना मी निदान १०० वेळा तरी वाचली असेल . परत परत वाचून मी खात्री करून घेत होते.. कितीतरी दिवसांनी माझे स्वप्न पूर्णं होणार होते . मला स्वतःचा एक गणवेश मिळणार , शाळेचा गणवेश ,माझा ..इतर मुलींप्रमाणे मी पण शाळेत गणवेश घालून जाणार त्यानंतर  .....!!

मी या विचारानेच रात्री झोपले नाही , सकाळी सकाळी उठून मी माझी सारी कामे केलीत जेणेकरून मला शाळेत लवकर जाता येईल , आणि आई ने अजून काम सांगू नये म्हणून माझे आता आबांना लग्गा लावणे चालले होते.....

" बरं पोरी म्या सांगतो तुझ्या आयला , तू जा गुमान शाळंत " असे म्हणत आबा शेतात निगुन गेले. मी आपली शाळेची पिशवी भरणे सुरू केले ..आज शाळेत जाण्यास अगदी उतावीळ होऊन गेलेले मी ...पटापट वही -पाटी भरली आणि मी जायला निघाले .आधीच शाळा दूर , मला १५ किलोमीटर चालत जावे लागत असे आणि वाटेत सारी शेतं लागत असे , आमचे शेतदेखील...म्हणून मी पटापटा पावले टाकत निघाले . आई आधीच शेतावर गेलेली  ,मी शेताजवळच्या रस्त्यावर आले तर दूरूनच पाहिले  शेतावर आई बांधावर काम करत होती इकडे एका बाजूला लिंबाच्या सावलीत दादुची झोळी बांधलेली होती. तो झोपलेला आहे की नाही हे पाहण्यासाठी म्हणून मी गुपचुप त्याच्या झोळीकडे गेले . तर पाहते तर काय दांडूतल्याने जोरात गळा काढलेला होता , त्याला भूक लागलेली होती. आता मी काय करावे सुचेना , आधीच आठ वाजलेले . आता आपण इथे थांबलो तर आपल्याला उशीर होईल. मी या विचारात असतानाच आईची हाक माझ्या कानावर आली ." अगं ए रुक्मे पाहतेयस काय ,तुला दिसत नायं का, तुझा भावो रडतोया ....आण त्याले हिकडं , आनं ह्यो जरा बांधाला माती लाव , म्या त्याला पाहत्ये तोवर" मी एकदम भानावर आले . पण मला आता तिकडे जायला जिवावर आले होते , आता आपल्याला शाळेत जायला उशीर होणार हे तर नक्की.......

माझे दप्तर तिथेच टाकून मी दादुला आईकडे घेऊन जाऊ लागले. आईने त्याला जवळ घेतले आणि म्हणाली "रुक्मे कर गं माझी बयो येव्हढं , लयी पाय दुकताय बग" . माझा चेहरा उतरला , तरी माझे कपडे सावरून मी कामाला लागले , म्हटलं जेवढं पटकन करू तेवढे चांगले..............

पण आईला यायला उशीर लागला , तसतसा माझा जीव कसावीस होत होता. शेवटी मला आबांनी काम करताना पाहिले आणि मग आईला रागावत म्हटले " अवं तुला सांगितलं व्हतं ना मी रुक्मीला कामं नको लावू , तरी पोरीला कामाला लावलं " आबा झपझप पावलं टाकत माझ्याकडे येत म्हटले .."पोरी , जा तू आता शाळंत म्या पाहत्यो ते बांधाचे"

माझे आबा , किती छान , असा मनात विचार करत मी धूम ठोकली ....आधीच खूप उशीर झालेला होता म्हणून मी पळत पळतच शाळेच्या रस्त्याला लागले , पायांना खडे टोचत होते पण मला आज काही फरक पडत नव्हता मी जोर जोरात पळत होते.....आज मला गणवेश मिळणार , मला आता फक्त गणवेश दिसत होता ...तेवढ्यात न कळत पाय घसरत मी एका मोठाल्या दगडावर मी आपटले ....पायाला चांगलेच खरचटले होते , डोक्याला एक खोच पडली त्यातून रक्त  वाहणे सुरू झाले होते...मी कसे तरी उठण्याचा प्रयत्न केला पण पायच उठेना.... ..."आपण आज कार्यक्रमास नाही पोहचू शकणार आपल्याला गणवेश नाही मिळणार....." या कल्पनेनेच मला रडू कोसळले.
  तरी जिवाचा हिय्या करत मोठ्या कष्टाने मी उठले , लंगडत लंगडत शाळेच्या रस्त्याने चालू लागले . पण आता पाय उचलेच ना....डोळ्यात मला गणवेश दिसू लागला , शुभ्र पांढर्‍या रंगाचा शर्ट आणि त्यावर निळ्या रंगाचा पेटिकोट ...त्या विचाराने डोळ्यात अश्रूंनी गर्दी केलेली....

 शेवटी हळूहळू चालत शाळेच्या पटांगणापर्यंत पोहोचले , तेव्हा जिल्हाधिकार्‍याची गाडी जातांना दिसली , आणि माझे हातपाय गळाले.....वर्गात गेल्यावर सार्‍या मुली माझ्याकडे पाहून विचारू लागल्या " का गं रुक्मिणी कुठे होतीस , हे पहा कसला छान गणवेश मिळाला आम्हाला " त्यांच्या हातातल्या गणवेशाकडे पाहून मला काय बोलावे काही कळेना . मी आपली शांत , मला आता काहीच वाटत नव्हते..

तेवढ्यात साठेबाई आल्यात , मला पाहताच म्हणाल्या , "कुठे होतीस रुक्मिणी , अगं तू एवढी हुशार मुलगी , आज तुला स्कॉलरशिपसाठीचे बक्षीस मिळणार होते , तू आली का नाहीस कार्यक्रमाला " . पण त्यांना माझा अवतार लक्षात आला ,मला लागलेले आहे हे पाहताच त्या म्हणाल्या "अग किती लागलंय तुला , काय झाले कुठे पडलीस काय " मला हे ऐकू आले . आणि माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा सुरू झाल्या , मला सारखे रडू येत होते . मला तसे रडताना पाहून बाईंनी मला वर्गाबाहेर घेऊन गेल्यात . आणि शिक्षकांच्या खोलीत जाऊन माझी मलमपट्टी केली .मला बाकावर बसवून बाई माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हटल्या " तू विश्रांती घे बाळ , मी आलेच ." मी आपली सुन्न , मला काही कळत नव्हते पण मला रडू येत होते.

थोड्या वेळाने साठे बाई परत माझ्याजवळ आल्या आणि खांद्यावर हात ठेवत म्हणाल्या , " मला माहिती आहे तू का रडतेय , शांत हो बाळ . मी तुझ्यासाठी काहीतरी आणलेय. बहुधा ते पाहून तुला बरे वाटेल."
पण मी एका शब्दाने काही बोलले नाही ,  मान खाली घालून फक्त सगळे शांतपणे ऐकत होते. तेवढ्यात बाईंनी माझ्या हातात एक पाकीट दिले, म्हणाल्या उघड .  मी नाराजीने ते उघडायला म्हणून घेतले आणि ....आणि पाहते तर काय एक नवा कोरा गणवेश माझ्या हातात होता , तो पाहून मी क्षणात साठे बाईंना बिलगले....
तर बाई म्हणाल्या  " अगं कळते गं आम्हाला पण की आमच्या मुलींना काय हवंय " असे म्हणत बाईंनी डोक्यावर हात फिरवला आणि निघून गेल्या .... .....
माझ्या हातात माझा गणवेश होता आणि डोळ्यात कृतज्ञता आणि आनंदाचे अश्रू होते  .............................................

"ए आई आपण आजच माझा शाळेचा ड्रेस घ्यायला जायचे का गं ?" असे मला म्हणत खारूटीचे छोटे हात माझ्या गळ्याशी होते .....
माझे ओलावलेले डोळे पुसत  मी माझ्या खारुटीला म्हटले " ठीक आहे, जाऊयात आजच आपण , आणि त्याला शाळेच्या ड्रेसला गणवेश म्हणतात गणवेश , लक्षात ठेव!"

लेखिका: अश्विनी अशोक कबाडे

५ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

भावस्पर्शी कथा! अगदी समोर घडत असावं सगळं अशी ओघवती शैली. खूप खूप आवडली ग अश्विनी.

Suhas Diwakar Zele म्हणाले...

सुंदर.. एकदम भावस्पर्शी !!

सुधीर कांदळकर म्हणाले...

सद्यस्थितीवर भाष्य करणारी, तरीही किती अकृत्रिम, मन:स्पर्शी. आवडली.

सुधीर कांदळकर म्हणाले...

गणवेष, गणवेश नव्हे. एक गुण कापला जा तुमचा.

Shreya's Shop म्हणाले...

छान कथा....मनाला भिडलीच एकदम