मी आहे !

युष्याची वाट चालताना अनेक माणसं भेटतात. हाय-हॅलो करतात, गप्पा मारतात, हसतात, खिदळतात, तुमची कंपनी एन्जॉय करतात. कालांतराने त्यातले अनेक, तुम्हाला आणि तुम्ही त्यांना विसरून जाता. त्यातले फारच थोडे 'खरा मित्र' म्हणून आपल्या मनात घर करतात.

मित्र… व्याख्या करता येईल ?  नाही. अनेक गोष्टी समजतात, जाणवतात, आपण अनुभवतो; पण त्या व्याख्यातीत असतात.
कोण असतो मित्र ?
स्वतःला देखील न कळणार्‍या कुठल्यातरी मानसिक पातळीवर ज्याच्याशी मनाच्या तारा जुळून मैत्रीचा 'राग' झंकारतो तो असतो मित्र. ज्याला तुमच्या कडून मैत्री व्यतिरिक्त कसलीच अपेक्षा नसते. मित्र आपल्या विचारांशी सहमत असणारा असलाच पाहिजे असं बंधन नसतं. विचारच काय तर आचार, भाषा, लिंग, जात-धर्म, रंगरूप, वय, आर्थिक स्थिती, समाजातलं स्थान या बाबतीतही भिन्नता असू शकते. ज्याच्याजवळ आपण आपलं गुपित अगदी निःशंकपणे सांगू शकतो,  आणि  जो कुठलाही आडपडदा न ठेवता तुमच्याकडे मन मोकळं करतो, तो मित्र. तुमच्या योग्य गोष्टींचं समर्थन आणि चुकीच्या वर्तनाबद्दल तुमची कानउघाडणी
करणारा, सुख-दु:खात सोबत करणारा,  तुम्ही यशाचं एखादं शिखर सर केल्यानंतर घडणार्‍या कौतुक सोहोळ्यात ज्याच्या चेहर्‍यावर तुमच्यापेक्षाही जास्त आनंद दिसतो,  तो असतो तुमचा मित्र. आपलं  एखादं महत्वाचं काम ज्याला आपण हक्काने सांगू शकतो,  तो मित्र.  तुमच्या घरातलं प्रेमाचं माणूस निधन पावतं त्यावेळी,  जमा झालेल्या अनेक चेहर्‍यात,  मुखवटा न घातलेला आणि तुम्हाला धीर देणारा चेहरा दिसतो तो तुमच्या मित्राचा असतो. कदाचित तुमच्याकडच्या एखाद्या गंमती-जमतीच्या कार्यक्रमाच्या वेळी "मला महत्वाचं काम आहे, मी येणार नाही" असं जो बिनधास्तपणे सांगू शकतो, पण अडचणीच्या वेळी स्वतःची सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून तुम्हाला मदतीचा हात पुढे करतो, तो असतो मित्र.
आर्थिक समस्या आहे. इतके पैसे कुठून उभे करायचे हा प्रश्न मनाला  भेडसावत असताना,  स्वतःच्या कुवतीबाहेर जाऊन देखील तुम्हाला जो मदत करतो, तो असतो मित्र.
ग्रुपमध्ये असतांना जो तुमची थट्टा-मस्करी  करतो, टेर घेतो पण जर कुणी तुमचा अपमान करायचा प्रयत्न केला तर तुमच्या आधी जे माथं भडकतं ते माथं तुमच्या मित्राचं असतं. तुम्ही हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट आहात, मित्र येतो. त्याच्या हातात सफरचंद,  मोसंबी, फुलांचा बुके,  'गेट वेल सून'चं कार्ड, असलं काहीही नसतं. तो येतो, तुमच्याबरोबर बसणार्‍या तुमच्या नातेवाईकांना रिलिव्ह  करायला आणि तुम्हाला रिलिफ द्यायला.

तुमचा आहे कोणी असा खरा मित्र ? असू शकतो. पण त्यासाठी तुमच्या मनात देखील मैत्रीची निर्मळ, निरपेक्ष भावना असली पाहिजे, मैत्रीची भावना जागली की भेटतो तो. ज्याप्रमाणे प्रेम हे ठरवून करता येत नाही, ते नकळत होतं; मैत्रीचं देखील तसंच  आहे. मैत्री केली जात नाही, ती आपोआप होते.

खूप चिंतित आहात, व्यथित आहात,  मनात विचारांचा कल्लोळ माजलाय अशा वेळी, मनाच्या गाभार्‍यात, "मी आहे तुझ्या बरोबर" असा तुम्हाला आश्वस्त करणारा एक स्वर उमटतो ….. नीट ऐका. तुमच्या मित्राचा स्वर असतो तो .......
"मी आहे तुझ्या बरोबर" …..…..
......  "मी आहे".


लेखक: उल्हास भिडे

1 टिप्पणी:

आशिष निंबाळकर म्हणाले...

भिडे काका मस्तच !