सोंग !

गापुढे हा सभ्यपणाचे सोंग मिरवितो
चेहर्‍यावरती भोळा चेहरा ओढून घेतो
अवतीभवती भाट जमवुनी थाट मांडतो

बाता मारून जनांस सांगे 'सारस्वत मी'
मार्दवताही ह्याच्या नाही शब्दांमधुनी
वाद घालतो हीन पातळी पार गाठुनी

फक्त प्रसिद्धीसाठी झटतो जिथे-तिथे हा
श्रेय लाटण्यासाठी करतो पुढे-पुढे हा
खुद्द आपला करून घेतो उदो-उदो हा

लाभासाठी सारे करतो, म्हणतो 'सेवा'
मनात ह्याच्या कपटी बाणा मत्सर-हेवा
अश्या मानवा निर्मिलेस तू कशास देवा?

रंग बदलणारा सरडाही बनला असता
ह्याच जिवाचा साप विषारी बनला असता
अथवा लोभी कोल्हासुद्धा बनला असता !

कवी: रसप (रणजित पराडकर)

३ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे अशा नगांना सणसणीत चपराक मारावी अशी कविता आहे तुझी रणजित. अगदी योग्य वर्णन केलंस अशा दुतोंडी व्यक्तींचं.

ulhasbhide म्हणाले...

क्रांति यांना अनुमोदन.

सुधीर कांदळकर म्हणाले...

छान. मजा आली.