सबकुछ पीडीएफ !

पीडीएफ स्वरूपातल्या फाइल्स वाचकांना नवीन नाहीत. एखादी माहिती समोरच्या व्यक्तीला विशिष्ट स्वरूपातच दिसू द्यायची असेल, किंवा त्याने त्यात बदल करून स्वत:च्या नावावर खपवू नये असे वाटत असेल तेव्हा या पीडीएफ स्वरूपाचा सर्रास वापर केला जातो. पण प्रत्येक वेळी आपल्याकडे पीडीएफ तयार करण्याची प्रणाली उपलब्ध असेलच असे नाही. त्यावेळी काही ऑनलाईन संकेतस्थळांचा वापर करून आपण हे काम करू शकतो. अश्याच काही पीडीएफ संबंधित संकेतस्थळांची ही माहिती....

ब्राऊजर मधील एक साधीशी बुकमार्कलेट, कोणत्याही नोंदणीची गरज नाही. कोणतीही प्रणाली संगणकावर उतरवून घ्यायची गरज नाही. वेबपेजेस आणि गूगल रीडर मधील लेख प्रिंट करता येतील अश्या क्षमतेची पीडीएफ बनवते. तयार पीडीएफ संगणकावर उतरवून घ्यायची सोय अथवा इतरत्र पाठवण्याची सोय.

ऑनलाईन पीडीएफ तयार करून मिळते. १० एम्बी पर्यंतची आपली फाइल किंवा संकेतस्थळाच्या पानाचा दुवा द्यायचा, आपला विरोप (ईमेल) पत्ता द्यायचा की त्या पत्त्यावर आपल्याला आपली तयार पीडीएफ पोचती होते.

आपल्याकडे पीडीएफ तयार आहे पण जर ती आपण स्वत: तयार केलेली नसेल आणि त्यात काही बदल जर आपल्याला करायचे असतील तर ह्या संकेतस्थळावर आपल्याकडची मूळ पीडीएफ चढवायची, आपला विरोपाचा पत्ता द्यायचा की मायक्रोसॉफ्ट वर्डच्या स्वरूपात  आपल्याला फाइल मिळते.

एखाद्या संकेतस्थळावरची पृष्ठे पीडीएफ स्वरूपात मिळवायला अनेक प्रणाल्या आहेत, वर उल्लेखल्या प्रमाणे अनेक संकेतस्थळे देखील आहेत. पण ती पीडीएफ बनवताना आपल्याला पीडीएफच्या दृश्य स्वरूपात बदल करायला फारशी मुभा नसते. पण हे संकेतस्थळ मात्र आपल्याला कागदाचे माप, आडवे-उभे ,रंगीत की साधे, चित्रे-पार्श्वभूमी निवड करायची संधी देतं. कोणत्याही नोंदणीची, विरोपाच्या पत्त्याची गरज नाही, अमर्यादित वापर असे याचे स्वरूप आहे. एचटीएमएलटूपीडीएफचा वापर करून देखील एखादे वेब पृष्ठ आपण पीडीएफ मध्ये परावर्तित करू शकतो.

ऑनलाईन पीडीएफ रीडरच नाही तर पीडीएफ मध्ये बदल करू शकणे(एडीटर), ऑनलाईन पीडीएफ अर्ज भरणे( फॉर्म फिलर), अर्ज तयार करणे(फॉर्म डिझायनर), पीडीएफ वर नोंदी करणे(ऍनोटेटर), फाइलची व्याप्ती (साइज) कमी करणे.. अश्या अनेक खुब्या या संकेतस्थळावर आहेत. कुठलीही प्रणाली संगणकावर उतरवायची गरज नाही, कुठेही नोंदणी करायची गरज नाही, संकेतस्थळाची कोणतीही खूण (वॉटरमार्क) पीडीएफवर दिसणार नाही.  क्रोकोडॉक देखील काहीसे अश्याच प्रकारचे संकेतस्थळ आहे.

८ एम्बी ची एक फाइल अश्या जास्तीत जास्त १० फाइली एकत्र जोडणे किंवा जास्तीत जास्त १० एम्बीच्या पीडीएफ मधील पाने वेगळी करणे यासारखी कामे हे संकेतस्थळ लीलया करते.

बर्‍याचदा आपल्याला हवी असलेली एखादी पीडीएफ छापण्याचा (प्रिंट) किंवा त्यातला मजकुराची प्रत( कॉपी/पेस्ट) करण्याचा आपल्याला अधिकार नसतो. किंवा आपल्याकडे असलेल्या पीडीएफ फाइलला पासवर्ड दिलेला असतो. पीडीएफ उघडण्यापासून ते छापण्यापर्यंतचे प्रतिबंध नको असतील अश्या वेळी हे संकेतस्थळ उपयोगी पडेल.५ एम्बी पर्यंतची पीडीएफ फाइल इथे अपलोड करून आपला कार्यभाग आपला साधता येऊ शकतो.  फ्री माय पीडीएफ या संकेतस्थळाचा वापर देखील याकरता करता येईल.

पीडीएफ वर डिजीटल सही टाकण्याकरता याचा वापर करता येतो. ऑनलाईन किंवा ऑफलाईनही वापरता येईल.

साध्या पीडीएफ फाइलचे रुपांतर पेज उलटवू शकणार्‍या फ्लॅश पीडीएफमध्ये करण्याकरता हे संकेतस्थळ वापरता येईल. जास्तीत जास्त १० एम्बीची फाइल एका वेळी वापरता येईल.

नोकरीकरता अर्ज करताना ठिकठिकाणी आपली माहिती आपल्याला पाठवावी लागते. बर्‍याचदा असा अनुभव येतो की, आपण कष्टाने व्यवस्थित तयार केलेली वर्ड फाइल जेव्हा आपण ऑनलाईन साठवतो किंवा इतरांना पाठवतो तेव्हा त्याचे दृश्य स्वरूप बदलते. नोकरीकरता म्हणून पाठवलेली अशी माहिती पाहिली की उमेदवाराबद्दलचे प्राथमिक मतच वाईट होऊ शकते. त्यावर उपाय म्हणून या संकेतस्थळावरची सोय वापरता येईल. आपण फक्त माहिती भरायची, त्यांनी दिलेल्यापैकी टेम्पलेट निवडायची की आपला बायोडेटा पीडीएफ स्वरूपात तय्यार !

पीडीएफ फाइलची व्याप्ती(साइज) कमी करण्याकरता निविया संकेतस्थळावरची ही सोय वापरता येईल. याच संकेतस्थळावरची पीडीएफ रिसाईज ही सोय वापरून फाइलचे आकारमान बदलता येऊ शकते. जास्तीत जास्त ५ एम्बी ची फाइल याकरता वापरता येऊ शकते.

बर्‍याचदा असेही होऊ शकते की, आपण मारे पीडीएफ तयार करून पाठवली पण समोरच्या व्यक्तीकडे पीडीएफ वाचण्याची सोय नाहीये किंवा इंटरनेटवरून तशी प्रणाली उतरवून घ्यायची सोय देखील नाहीये. अश्या वेळी काय कराल ? अश्या वेळी पीडीएफ फाइलचे प्रत्येक पृष्ठ पानागणिक तसेच्या तसे चित्ररूपात बदलण्याची सोय हे संकेतस्थळ देते. ती चित्रे आपण कोणालाही पाठवली की पीडीएफ वाचता येण्याची सोय नसली तरी काही बिघडत नाही.

अनेकदा आपण घाईघाईत पीडीएफ तयार करतो आणि मग लक्षात येतं की अरेच्च्या ह्या पीडीएफ वर ती आपण तयार केली असल्याचा/ आपल्या मालकीची असल्याचा काहीच पुरावा नाही. अश्यावेळी आपलं एखादं ओळखचिन्ह पटकन टाकायचे असल्यास पीडीएफ एड या संकेतस्थळावरची वॉटरमार्क पीडीएफ ही सुविधा वापरून हे काम करता येईल. क्वचित एखाद्या पीडीएफमध्ये असलेले दुवे जर काम करत नसतील तर ते बदलण्याकरता देखील याच संकेतस्थळावरची रिब्रॅण्ड पीडीएफ ही सुविधा वापरता येईल.  जास्तीत जास्त २० एम्बीची फाइल वापरता येईल, पण या दोन्ही सुविधांचा वापर करून तयार केलेल्या पीडीएफवर या संकेतस्थळाचे ओळखचिन्ह मात्र असेल.

आजकाल सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात. ३ जी मुळे इंटरनेटचा फोनवरचा वापर देखील वाढलेला आहे. वेगवेगळ्या कंपन्यांनी आपापल्या प्रणाल्या तयार करून त्यायोगे फोनचा वापर संगणकाला पर्याय म्हणून कसा करता येईल हे पाहिले आहे. स्मार्ट फोन्सवर वापरण्याकरता अडोबचे पीडीएफ रीडर उपलब्ध आहे. पण फोनवर पीडीएफ वाचणे काहीसे कटकटीचे असते त्यापेक्षा ईपब ह्या प्रमाणित ईबुक स्वरूपात पुस्तके वाचणे केव्हाही सोप्पे. आपल्याकडे असलेली पीडीएफ ईपब स्वरूपात परावर्तित करायची झाल्यास ह्या संकेतस्थळाचा वापर करता येईल.

समजा आपण प्रवासात आहोत , ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर आहोत, एखाद्या मीटिंगमध्ये आहोत. आपल्या हातात एखाद्याचे बिझिनेस कार्ड आहे, मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन किंवा समोरच्या फळ्यावर काही आकृत्या आहेत ज्या आपल्याला पुढेमागे उपयोगी पडण्याची शक्यता आहे. अश्या वेळी हे संकेतस्थळ उपयोगाला येते. आपण मोबाईलवर फोटो काढून ठेवून, विरोपाने त्यांना पाठवला की उलट टपाली आपल्याला अशी एक पीडीएफ मिळते ज्यात आपण मजकूर शोधू शकू.

यापूर्वी आपण पीडीएफ ला दिलेला पासवर्ड कसा काढायचा हे पाहिले. पण आता जर आपल्याच एखाद्या पीडीएफला आपल्याला पासवर्ड द्यायचा असेल तर हे संकेतस्थळ वापरून आपण ते करू शकतो. अर्थात वर दिलेल्यापैकी पर्याय जर समोरच्या व्यक्तीला देखील माहीत असतील तर हा पासवर्ड ती व्यक्ती निकामी करू शकते हे देखील ध्यानात ठेवायला हवं.

आपण एखादी पीडीएफ तयार केली. पण ती छापल्याने कागदाच्या वापराने पर्यावरणाचे नुकसान होऊ नये असे आपल्याला जर वाटत असेल तर, एक तर आपण कोणी प्रिंट काढू नये असा पर्याय देऊ शकतो. पण अशी बंधने काढून टाकता येतात हे मी वरच सांगितलं आहे. त्यामुळे ह्या संकेतस्थळाचा वापर करून आपली पीडीएफ, पीडीएफ स्वरूपाच्या ऐवजी डब्ल्यू डब्ल्यू एफ या स्वरूपात साठवणे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

आत्तापर्यंत दिलेली ही माहिती ही ऑनलाईन म्हणून वापरण्यायोग्य संकेतस्थळांची होती. आता काही ऑफलाईन म्हणजे संगणकावर प्रणाली उतरवून घेऊन वापरण्यायोग्य माहिती.

एकदा ही प्रणाली संगणकावर उतरवून घेऊन (डाऊनलोड) प्रस्थापित(इन्स्टॉल) केली की, आपण छापण्याची(प्रिंट) आज्ञा देऊ शकत असलेल्या कोणत्याही प्रणालीमधून त्या त्या कागदपत्रांची पीडीएफ तयार करू शकता. इतकेच नव्हे तर ही प्रणाली एकापेक्षा जास्त पीडीएफ एकत्र जोडणे, एका पीडीएफ मधून नको असलेली पृष्ठे वगळणे, जर काही दुवे टाकलेले असतील तर ते दुवे जोडणे, पार्श्वभूमी किंवा शिर्षलेख(हेडर) जोडणे. इ. कामे देखील ही प्रणाली करू शकते. याच प्रणालीत सिग्नेचर९९५ या ऍड-ऑन ची भर घातली   की पृष्ठ क्रमांक, वॉटरमार्क, फाइलविषयिची माहिती आणि बरेच काही बदल करता येतात.

























एखाद्या महत्त्वाच्या पीडीएफचा प्रिंट आऊट घ्यायचाच असल्यास तो पुस्तकासारखा हवाय की आणखी कोणत्या पद्धतीने हे ठरवायचा पर्याय ही प्रणाली देते आणि त्याप्रमाणे आपल्याला प्रिंट आऊट मिळतो.

ह्या प्रणालीमुळे आपल्याला आपल्या संगणकावर असलेली पीडीएफ सुलभतेने वाचायला अनेक पर्याय उपलब्ध होतात. हातातल्या पुस्तकासारखी पाने उलटणे / स्लाईड्ससारखी सरकवणे, स्क्रोल करणे सारख्या सुविधा ही प्रणाली देते. इतकेच नव्हे तर आपल्याला आपली एखादी पीडीएफ मार्ट स्वरूपात परावर्तित करून प्रकाशित करता येते. इतर उपलब्ध पुस्तके देखील संगणकावर उतरवून घेता येतात.

महाजालावर अनेक मुबलक सामग्री उपलब्ध आहे. कदाचित यापेक्षा देखील अधिक सफाईने काम करणारी संकेतस्थळे / प्रणाल्या उपलब्ध असतील पण मला योग्य वाटलेली माहिती मी आपल्याकरता उपलब्ध करून दिलेली आहे.


लेखिका: श्रेया रत्नपारखी

१० टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

व्वा श्रेयाताय, उत्तम माहिती. अडोबीसोबत काम करताना अनेक पीडीएफ सॉफ्टवेअरबद्दल माहिती मिळाली होती, तुझा लेख वाचून त्यात अजुन भर पडली.

अंकाची सजावट फार छान केली आहेस.. :) :)

Shreya's Shop म्हणाले...

धन्स रे सुहास, दोन्ही प्रतिक्रियांकरता. तुमच्या सारख्या बझ्झनांच्यामुळेच तर बळ मिळतं.

Harshal Jain म्हणाले...

उत्तम आणि बरीच माहिती दिली आहे. :)
पीडीएफ९९५ सारखे अजून एक सोफ्टवेर आहे "डूपीडीएफ" म्हणून. यामध्ये पण प्रिंट आज्ञावली देऊन आपण अगदी कुठलीही फाईल पीडीएफ बनवू शकतो. दुवा : www.dopdf.com

Meenal Gadre. म्हणाले...

Very useful info !!!

विनायक पंडित म्हणाले...

श्रेया! तुमचे आभार कसे मानू? अगदी आत्ताच माझे cute pdf creater आणि nitro pdf creater दोन्ही अचानक काम करेनासे झालेत.user cancelled the project असा संदेश येतो.कारण कळायला मार्ग नाही.e Scan Anti-Virus विकत घेऊन गेल्या फेब्रुवारीत इन्स्टॉल केलाय एक वर्षासाठी.त्याचा monitor is starting up असा मेसेज माझ्या संगणकावर येतो पण माझा संगणक मला स्कॅन करता येत नाही.दोन्ही गोष्टींचा काही संबंध असेल का? काय करू? (खरं तर हा प्रश्न विचारण्याची ही जागा नसावी पण आपला विस्तृत लेख वाचून रहावलं नाही.)

Suhas Diwakar Zele म्हणाले...

Monitor is Starting up हा एरर मॉनिटरला सिग्नल न मिळाल्याने येतो. एकदा सगळे कनेक्शनस् टाईट करा आणि जर तुम्ही कम्प्युटर उघडू शकत असाल तर हार्डडिस्कच्या वायर्स एकदा काढून परत लावा....

SUDHIR KANDALKAR सुधीर कांदळकर म्हणाले...

वा! मस्त माहिती. आत्ता माझा संगणक ऍडोबचे काहीतरी इन्स्टॉल करू काय म्हणून सतत ठणाणा करून विचारतो आहे.

Shreya's Shop म्हणाले...

@हर्षल जैन, मीनल, विनायक आणि कांदळकर साहेब धन्यवाद.

@विनायक , तुमचा प्रश्न एव्हाना सुटला असेल अशी अपेक्षा आहे. सुहास ने जो सल्ला दिला होता, तो पाळून पाहिलात का? खरं तर मला यातलं काही सांगता येणं कठीण दिसतंय. ;-)

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

श्रेयाताई, एकदम छान आणि माहितीपुर्ण लेख. आभार्स :)

विनायक पंडित म्हणाले...

आभार सुहास! करून बघतो, नुकतीच झाडलोट केलीए (गृहस्वामिनीच्या ठणाणांणांणां नंतर)श्रेया धन्यवाद!