दाटले घनासम काही!

दाटले घनासम काही पण ओठातून उमलत नाही
घुसमट अवघी होते पण काहीच बरसत  नाही

त्या गौर तनावर तेव्हा मी भुलून मोहून गेले
हे वेड मोहखळीचे  का मजला  उमगत नाही

वाटले साद घालुनी मज बोलल्या नेत्र कळ्या या
नयनाचे गूढ हे गहिरे का मजला  उकलत नाही

त्याने वाहवा म्हटले अन थरथरली दीपकळीही
दर्दी दाद ही त्याची का तहान  शमवत नाही

अत्तरे  खोलुनी बसले शोधण्या त्या गंध तनूचा
श्वासातून जाणवतो पण प्रत्यक्षी गवसत नाही

वार्‍याने हलते मखमल चाहुलीचा घेऊन भास
कानाशी फुंकर हळवी कोणाची समजत नाही

हा खेळ मनाचा म्हणू की जादू ही घडते असली
प्रतीबिंबीही आता माझ्या मी पण उतरत नाही

सूर ही माझे झाले त्याच्या  एका नजरेचे बंदी
त्याच्या श्वासावीण काही गाण्यातून उमटत नाही

कवयित्री: अनुजा मुळे (स्वप्नजा)
(ही कविता ’बाजीराव’वर आहे ....”मस्तानी’च्या भावना सांगणारी)

३ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

सुंदर कविता अनुजा.

हा खेळ मनाचा म्हणू की जादू ही घडते असली
प्रतिबिंबीही आता माझ्या मी पण उरत नाही

हे खासच!

ulhasbhide म्हणाले...

छान, तरल .... :)

अमित गुहागरकर म्हणाले...

वाह..! अगदी हळुवार..!