॥ पराक्रमाचे अभंग ॥

से हाही एक
भीम पराक्रम
आमचा विक्रम
याची देही ॥१॥

तुम्हांस सांगतो
त्याचे झाले असे
चाणाक्षांना दिसे
सर्व काही ॥२॥

आम्ही बैसलेलो
तैसेच एकदा
घोळक्यात बघा
पंटरांच्या ॥३॥

तेंव्हा काय झाले
सांगू महाराजा
फूटलाच बाजा
अचानक ॥४॥

समोर चालले
फूलपाखरू ते
सहजच पाहे
आम्हाकडे॥५॥

पाहूनीया तिला
आम्ही झालो ठार
बाण आरपार
हृदयात ॥६॥

रूप मनोरम
सुंदर देखणे
तिचे ते बघणे
ओय होय ॥७॥

एका कटाक्षात
हजारोंनी घंटा
वाजल्या त्या बघा
मनामध्ये ॥८॥

पुढे काय झाले
विचारात तुम्ही
निम्मा गड आम्ही
जिंकलाच ॥९॥

सरळ जाऊनी
भेटलो तिजला
सांगितले सारे
वाटलेले ॥१०॥

अरे काळतोंड्या
भडकली जरी
वाखाणणी केली
धैर्याचीही ॥११॥

पॉईंट धरोनी
आम्ही तोचि एक
नाही आम्ही फेक
पटविले ॥१२॥

नंतर जाहल्या
वारंवार भेटी
जूळलेल्या गाठी
मनांचिया ॥१३॥

प्रियेस जिंकली
आता काय मग
राहिले शिल्लक
मिळविणे ॥१४॥

सोपे नाही देवा
इतुके सगळे
उभे राही नवे
प्रश्न मोठे ॥१५॥

भला मोठा तिचा
दैत्य बाप होता
हातामध्ये सोटा
सर्वकाळ ॥१६॥

सांगायाच्या आधी
त्यालाच कळले
पित्त खवळले
सासर्‍याचे ॥१७॥

आमच्या दोघांत
शस्त्र परजत
आला तो धावत
राक्षसच ॥१८॥

आम्हांस पाहून
गचांडी धरली
किंचाळला वरी
भयानक ॥१९॥

बांगड्या भरल्या
नाहीत आम्हीही
ऐसेची म्हणोनी
बजाविले ॥२०॥

परंतु तेंव्हाच
प्रिया रडवेली
त्याला क्षमा केली
मनातच ॥२१॥

वरूनिया मात्र
पाय पकडले
नाही ते सोडले
सासर्‍यांचे ॥२२॥

एकूण माहोल
सारा पाहोनिया
अखेरीस राया
थंड झाला ॥२३॥

इतुके नव्हते
पुरेसे म्हणोनी
आमचे घरही
बाकी होते ॥२४॥

आई वडिलांनी
घरी केली होती
जय्यत तयारी
आरतीची !! ॥२५॥

आता काय करू
कळेना आम्हाला
प्रसंगच बाका
आला होता ॥२६॥

अरे कार्ट्या म्हणे
केलेस लफडे
कूळ उद्धरीले
चांगलेच ॥२७॥

ढाली सारखाच
प्रियेचाच मग
केला उपयोग
मार्ग तोच ॥२८॥

झाले एकदाचे
सफळ संपूर्ण
प्रेमप्रकरण
आशीर्वादे ॥२९॥

यात पराक्रम
आहे एक ऐसा
खानदानी तैसा
मीच एक ॥३०॥

कवी: समीर पु. नाईक

३ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

मजेदार प्रेमकथा :)

सुधीर कांदळकर म्हणाले...

झकास, मजा आली. आवडली.

अमित गुहागरकर म्हणाले...

अभंगातील प्रेमकथा आवडली.