इथे तर...



कुणा झाडावर होतही असेल चांदण्याची पखरण
इथे तर अजूनही तापतंय वैशाखाचं ऊन रणरण


कुणाच्या तरी नशिबी असेल फुलांचं तलम अंथरूण
इथे तर आयुष्यात काटेच काटे ठेवलेत पेरून

कुणीतरी सखीसोबत गातही असेल सुरेल तराणे
इथे तर फक्त आसवांसोबतच आयुष्याचे वाहणे

कुणाची असतील पाळं मुळं खोलवर पसरलेली
इथे निष्पर्ण, वठली झाडे अधांतरी लटकलेली

कुणाचा असेल कुठेतरी  कुणात जीव गुंतलेला
इथे तर श्वास श्वास सुटण्यासाठी आसुसलेला

कवयित्री: नयना वानखेडे

२ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

ह्म्म्म.... एखाद्याचं नशीब म्हणायचं ... दुसरं काय.

क्रांति म्हणाले...

कुठे फुलांना मरण जन्मता
दगडांना पण चिरंजीविता

विरोधाभास आणि सुख-दु:खाची असमतोल वाटणी हेच तर आयुष्य नाही?

चांगली मांडली आहे भावना. चित्रही समर्पक.