ये दिल है नखरेवाला..!

चिविंच्या एका विधानात क्षुल्लक बदल करून मी म्हणेन, 'ऑफिसातील रुक्ष जीवनातील शुष्कपणा घालवून त्यात नवचैतन्य उत्पन्न करण्यासाठी ऑफिसात एखादी तरुण सुंदर 'रिसेप्शनिस्ट' असावी, अशी योजना ज्याच्या मेंदूतून साकार झाली त्या महाचतूर इसमास माझे त्रिवार दंडवत..!

१५ दिवसापूर्वीच आमच्या ऑफिसातल्या 'लीला' नामक रिसेप्शनिस्टच्या प्रणय'लीला' संपुष्टात आल्या आणि आमच्या ऑफिसात अवकळा पसरली.
त्याचे झाले असे...
आमच्या ऑफिसातील तथाकथित रिसेप्शनिस्ट मिस लीला ही मिसेस लीला होण्याआधी तिची ऑफिसात हाता-पायांच्या बोटांवर मोजता येणार नाहीत, इतकी लफडी अस्तित्वात होती. ती नेहमीच कुणाबरोबर तरी 'डेट'वर असे. माझा परममित्र गोपाळही एकदा तिला घेऊन एका महागड्या हॉटेलात गेला होता. तेथील चार अंकी रकमेचं बील चुकवल्याचा मोबदला म्हणून लीलाने गोपाळच्या उजव्या गालावर किस दिला. गोपाळला स्वर्गीय आनंद होणे साहजिकच होते. मग काय विचारता? गोपाळच्या अंतरीचा इम्रान हाश्मी जागा झाला आणि त्याने लीलाकडे आपल्या ओठांवर किस करण्याची मागणी केली. दूसर्‍याच क्षणाला गोपाळच्या ज्या गालावर लीलाने कीस केलं होतं, त्याच गालावर आता तिच्या सँडलनेदेखील बर्‍यापैकी किस केलं. ही हकीगत मला खुद्द गोपाळने सांगितली. आणि तो अपमान सहन न झाल्याने गोपाळने 'चालू' ही पदवी लीलास बहाल केली.

लीलासोबत संसार थाटण्याची स्वप्ने पाहणार्‍यांच्या शर्यतीत आमच्या बॉसने बाजी मारली. आपल्या पहिल्या पत्नीस घटस्फोट देऊन बॉसने आपल्या नावाचं मंगळसूत्र लीलाच्या गळ्यात मारलं आणि लीलासाठी ऑफिसचे दरवाजे बंद केले.

पुढे जेव्हा ही लीला बॉसच्याच सोसायटीतील एका छचोर तरुणाचा हात धरून 'रफुचक्कर' झाली, तेव्हा तिची ही 'अगाध' लीला पाहून आमचा बॉस अनुक्रमे काला, निला, पिला पडल्याचे मी या डोळ्यांनी पाहिलंय. पण ते पुढं घडलेलं रामायण आहे.

गेले १५ दिवस आमच्या ऑफिसात, वर्तमान पत्रात जाहिराती, इंटरव्ह्युज इ. इ. ची धामधूम होती आणि सरतेशेवटी आज एक सुंदर तरुण रिसेप्शनिस्ट आमच्या ऑफिसात दाखल झाली. तोच तिच्याभोवती लीला हाती लागली नाही, म्हणून हात चोळीत बसलेल्या 'काम'गारांचा गराडा पडला. मला तिचं नखही दृष्टीस पडलं नाही.
"रझिया गुंडोमें फस गयी." गोपाळ परेश रावलच्या शैलीत म्हणाला.
"तिचं नाव रझिया आहे?" माझा भोळा प्रश्न.
गोपाळने एक रागीट कटाक्ष माझ्याकडे टाकला. मी समजलो, त्या नवीन रिसेप्शनिस्टला पडलेला गराडा पाहून गोपाळने हे 'फिल्मी' उद्गार काढले होते. कधी कधी गोपाळला मी प्रेमाने 'फिल्मी मलेरिया' म्हणत असे.

त्याच्या या फिल्लमबाजपणाचा एक किस्सा सांगतो.
एकदा तो लीलाला म्हणाला, "लीला, तुझे वडील नक्की टेररिस्ट असावेत."
"असं का बोलतोएस?" लीला उडालीच.
"मग त्यांनी तुझ्यासारखा सौंदर्याचा अणुबॉम्ब कसा काय बनवला?" गोपाळच्या या फिल्मी डॉयलॉगच्या बॉम्बने लीला घायाळ झाली होती आणि म्हणून ती त्याच्याबरोबर 'डेट'वर जाण्यास तयार झाली होती.

काही तासांत नवीन रिसेप्शनिस्टचं नाव 'सुझी' असल्याचं मला गोपाळकडून कळलं. पण त्याची काय विशेष गरज नव्हतीच, कारण लगेचच ओळख परेड सुरू झाली. माझ्या समोरच्या डेस्कवर बसणार्‍या आणि लीलाबरोबर रासलीला खेळून मोकळा झालेल्या अभयने नेहमीप्रमाणे आपली ओळख "हाय, आय अ‍ॅम अभय. कॉल मी अ‍ॅबी." अशी करून दिली. मीही माझी ओळख अशी हटके करून द्यावी का? असा विचार मनात आला होता पण सुझीला पाहताच तो विचार झुरळासारखा कुठेतरी गुडुप झाला.
अहाहा..! काय ते लावण्य..! कंटाळवाण्या स्थितीत एकाच साच्यातल्या मिनिटाला आमच्यासारख्या शेकडो मुर्त्या घडवणार्‍या ब्रम्हदेवाने हिला मोठ्या सवडीने घडवले असावे, यावर कुणीही विश्वास ठेवील.

सुझी, कभी मेरी ऑंखोंसे मेरे दिल मे बस गयी..! काही कळले नाही. आता मी काहीतरी निमित्त काढून सुझीशी बोलू लागलो.

त्यादिवशी कॉफी मशीनमधून कॉफी घेतल्यावर सुझी गर्रकन वळली. तिच्या मागे मी उभा होतो, परिणामी तिच्या कपातील सगळी कॉफी माझ्या व्हाईट्ट शर्टावर सांडून त्यावर आफ्रीका आणि अमेरिका यांचे नकाशे उमटले.
"ओह..! आय अ‍ॅम एक्स्ट्रीमली सॉरी..!" आपली कोवळी जीभ आपल्या शुभ्र दातांखाली दाबत सुझी म्हणाली.
"व्हाय शुड से सॉरी?" क्षणभर तिच्या पापण्यांची उघडझाप झाली. "दाग अच्छे है..!" माझं मन 'सर्फ'ने धुतलेल्या कपड्यांपेक्षा कितीतरी स्वच्छ आहे, याची प्रचिती दिली.
मुळात हा डॉयलॉग तिने माझ्या गालावर चुंबन दिल्यानंतर माझ्या गालास लागलेली लिपस्टिक पाहून मी म्हणणार होतो. पण मला धीर धरवला नाही.
मी तो शर्ट धुतला नाही. तसाच घडी करून बॅगेत ठेवून दिला.... तिची आठवण म्हणून. तो प्रसंग सतत माझ्या डोळ्यांपुढे येत होता. तिचं जीभ चावून सॉरी बोलणं..! उफ्फ..! मार डाला..! मग झोप कसली येतेय?
शेजारच्या शास्त्रीकाकांनी रात्री नेहमीप्रमाणे रेडिओवर बिनाका गीतमाला लावली होती. त्यावर मोहम्मद रफी आपल्या लाडिक आवाजात
'खोया खोया चांद खुला आसमान
आँखोमें सारी रात जाएगी
तुमको भी कैसे नींद आएगी'
गात होते. एरवी मला असली जुनी गाणी प्रचंड बोअर वाटायची. पण का कुणास ठाऊक? आज मला ते गाणं 'आपलं' वाटू लागलं. म्हणजे जणू माझ्याच मनातील अस्वस्थता कुणीतरी गाण्याच्या माध्यमातून व्यक्त करतंय.

ये दिल है नखरेवाला.... ओ ओ ओ
नया है नखरा पाला ... आ आ आ

नवीन कपड्यांची खरेदी, नवी हेअरस्टाइल, निरनिराळे परफ्यूम आणखी काय काय? मला नवा 'लुक' की काय म्हणतात? तो मिळाला. पण सुझीला माझ्याकडे पाहायला एकदाही फुरसत मिळाली नाही.
गेले दोन दिवस ती संध्याकाळी ऑफीस सुटल्यावर बॉससोबत त्याच्या गाडीतून घरी जाई. अर्थात बॉसची ही पुढची पावले मी तेव्हाच ओळखली आणि तिसर्‍याच दिवशी आधीच अंगाने भूगोल असलेल्या बॉसचा सुझीला अपरिचित असलेला इतिहास सांगून तिला बॉसपासून परावृत्त केले, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात की काय म्हणतात? तिथे पडला.

काही दिवसांत सुझीचा वाढदिवस होता. त्या दिवशी ऑफिसालगतच्या मिनी कॅन्टिनमध्ये बर्थ डे सेलिब्रेशनसाठी आम्ही सगळे जमलो. मी मोठ्या चतुराईने सुझीच्या बाजूला जाऊन उभा राहिलो. केक कापल्यावर त्यातील एक तुकडा घेऊन सुझीने तो माझ्यापुढे धरला. मी तोंड उघडणार तोच अभय उर्फ अ‍ॅबी नावाच्या कावळ्याने घुसखोरी करून केकचा तो तुकडा आपल्या तोंडात घेतला आणि माझी झालेली फजिती पाहून सुझीसह उपस्थितांत एकच हशा पिकला.
माझ्या मनाला ते आत कुठंतरी लागलं. मी दुखावलो, हे सुझीने जाणले असावे. तिने मला आपल्या घरी चहासाठी बोलावले. मीदेखील सकाळचा तो कटू प्रसंग विसरून संध्याकाळी तिच्यासह तिच्या घरी गेलो.
मला सोफ्यावर बसायला सांगून सुझी किचनकडे वळली. चहा होईतोवर मी सोफ्यासमोरील टिपॉयवरील एक मासिक घेऊन चाळू लागलो. पण माझं लक्ष मासिकात नव्हतं. मनात असंख्य विचारांचा नुसता गोंधळ चालू होता. बरेच दिवसांपासून सुझीवर असलेलं आपलं प्रेम तिच्याकडे व्यक्त करावं आणि घरी आम्हां दोघांशिवाय तिसरं कुणी नव्हतं. अशी संधी मिळणे, म्हणजे केवळ दुग्धशर्करा योगच म्हणावा..!
मनात हे लाडू फुटत असतानाच योगाप्रमाणे दुग्धशर्करायुक्त चहा घेऊन ती बाहेर आली. माझ्या हाती कप देताना तिच्या नाजूक बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला. क्षणभर सर्वांग शहारलं. तिनेही लाजून आपली मान वळवली. हाय..! तिची ती नजाकत पाहून माझं दिल घायाळ झालं. मी माझ्या हातातील कप टिपॉयवर ठेवून तिचे हात माझ्या हाती घेतले.
पण एक क्षणच..!
तोच दारात एक आडदांड गृहस्थ येऊन थबकला. आमचे हात एकमेकांच्या हातात पाहून का कुणास ठाऊक? मला मारण्यासाठी त्याचे हात शिवशिवले. त्याच्या लालबुंद डोळ्यांत मला माझा 'काळ' दिसत होता. मी काही बोलायच्या आत त्याच्या एका ठोश्यासरशी माझ्या मुखातील दोन दातांनी इतर दातांची संगत सोडली. पुढेही बराच वेळ त्याने बुक्का, ठोसे, गुद्दे अशा तीन प्रकारे (मार खाण्यार्‍याला मात्र हे तीनही प्रकार एकसारखेच भासतात, ही गोष्ट निराळी..!) माझ्या अंगाची अशी मशागत (की 'दशागत?') केली, की चेहरा रक्ताने पूर्णं बरबटल्यामुळे मी पारावरच्या शेंदूर फासलेल्या 'म्हशागत' दिसत असेन. सुझीचा वाढदिवस आणि माझी पुण्यतिथी एकाच दिवशी येईल की काय? याची मला भीती वाटू लागली. माझ्या शरीरातील २०६ हाडांचं रीतसर ४१२ तुकड्यांत रूपांतर केल्यानंतर आता माझ्या अंगात मोडण्यासारखं काही उरलं नाही, हे त्याच्या लक्षात आलं असावं. त्याने माझा नाद सोडला.

पुढे सबंध अंगाला बँडेज गुंडाळलेला 'मी' महिनाभर हॉस्पिटलात बेडवर पडून होतो. एकदा गोपाळ भेटायला आला होता.
"ये तेरे को क्या 'सुझी'?" गोपाळने माझ्या सुजलेल्या अंगाकडे पाहत कोटी केली.
तेव्हाच हॉस्पिटलातील खिडकीतून उडी टाकून आत्महत्या करावी, असा विचार माझ्या मनात आला. पण याला माझं सुदैव म्हणा वा दुर्दैव.. माझी कॉट तळमजल्यावर होती. पण ते पुढं घडलेलं रामायण आहे.

माझं अंग कणकीसारखं अक्षरश: तिंबून काढणारा तो मर्द'गडी' वास्तवात सुझीचा 'गडे' होता, हे मला नंतर समजलं.

इसे पता चला है .... ओ ओ ओ
के प्यार क्या 'बला' है ... आ आ आ


लेखक: अमित दत्तात्रय गुहागरकर

६ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

मस्तच! मज्जा आली वाचून.

क्रांति म्हणाले...
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Suhas Diwakar Zele म्हणाले...

हा हा हा =)) =))

सुधीर कांदळकर म्हणाले...

हा हा हा हा ऽऽऽऽऽ

Shreya's Shop म्हणाले...

धम्माल.....खरं तर वाचताना कल्पना आलीच होती पण लेखन शैली मस्त आहे खुसखुशीत.

आशिष निंबाळकर म्हणाले...

अमित खुप छान रे, आवडली एकदम