श्वास!

श्वास गोठले तुझ्याविना; तर
ठेवशील ना मला प्रवाही?
असशील कोठे जरी तू; माझे
श्वास राहू दे तुझ्यात काही

श्वासांमध्ये घरटे अपुले
नि:श्वासातच अपुले अंगण
देहावरती तुझे मिरवते
श्वासांचे रोमांचित गोंदण

श्वास बिलगती जेथ तिथे तू
श्वास जाहले अपुले अंतर
अक्षर अक्षर नाव उमटते
श्वासांमध्ये तुझे निरंतर

सोस कशाला शतजन्मांचा?
चार श्वास घ्यावे प्रेमातून
दोन श्वास मी तुझ्यात घेते
दोन श्वास तू घे माझ्यातून

श्वासांचा हा प्रवास अपुला
श्वासांपल्याड, सुटता बंधन
आत्म्याचे हे श्वास कुठे जर
करीन ते ही तुलाच अर्पण

कवी: उमेश कोठीकर

४ टिप्पण्या:

क्रांति म्हणाले...

सुंदर प्रेमगीत!

ulhasbhide म्हणाले...

खूपच छान, तरल प्रेम-कविता

रविंद्र "रवी" म्हणाले...

वा! फारच छान!!!!!!!!

अनामित म्हणाले...

Yaa sampoorn kavy vibhaagaat kavitaa mhanataa yeiil ashee heech kavitaa aahe. Kaveeche abhinandan.
Baakee kaveenee krupayaa hee kavitaa abhyaasoon tyavarun kaahee shikataa yeiil kaa te pahaave. Itar kaveenee raag n manataa yaa vinanteechaa jarur vichaar karaavaa.