आपण दोघे...

तुझं माझ्या आयुष्यात येणं
नियतीने ठरवलेलं माझं
विधिलिखितच जणू
स्वीकारलं मीही ते
खाली मान घालून
कसलीच प्रतिक्रिया देता
आजही विचार करतो जेव्हा
गतकाळातील घटनांचा मी
पोहोचत नाही कुठल्याच निष्कर्षाप्रत

तुझ्यात माझं अन् माझ्यात तुझं
खोलवर गुंतत जाणं
स्वाभाविक होतं की
होती केवळ एक तडजोड
घरच्यांच्या इच्छेखातर का
मारलं होतं आपण आपलं मन???



आता परतीच्या वाटा
झाल्या आहेत बंद
माहीत आहे मला
झालोय नकोसा मी तुला
पण तरीही.....पण तरीही
आपण दोघे एक आहोत
हे आहे अंतिम सत्य
तुझ्यावाचून मी अन्
माझ्यावाचून तू आहोत
केवळ अपूर्ण......अन्
दुधात विरघळलेली साखर
सांग... करतं का गं कोण वेगळी?

कवयित्री: रूपाली नाईक

२ टिप्पण्या:

ulhasbhide म्हणाले...

ह्म्म्म्म.... अशा प्रसंगी दोघांपैकी एकाने असा समजूतदारपणा दाखवलाच पाहिजे.

क्रांति म्हणाले...

आवडली कविता. द्वैतातलं अद्वैत हेच असावं.