संपादकीय


वंदन रसिकजन.



प्रभातसमयी उषासूक्त अन् संध्यासमयी शुभंकरोती
मनामनाचे हंस विहरती संस्कारांचे वेचत मोती
तमातून तेजोवलयाची वाटचाल साजरी कराया 
रसिकांसाठी उजळविल्या या साहित्याच्या दीपज्योती

दिवाळी, उल्हासाचा, उत्साहाचा, चैतन्याचा, प्रकाशाचा अभंग ठेवा घेऊन येणारा उत्सव. वसुबारसेला सवत्स धेनूचं पूजन करून सुरुवात होते या प्रकाशयात्रेची ती थेट यमद्वितीयेपर्यंत. शांत, मंद तेवणार्‍या सोज्वळ पणत्या, फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, स्वादिष्ट, रुचकर फराळाची रेलचेल, नवनवीन खरेदी म्हणजे दिवाळी. हो, खरंच? इतकीच असते दिवाळी? मी काही विसरत तर नाही ना? छे! ही तर अर्धवट ओळख झाली दिवाळीची. अहो, मराठी माणसाची दिवाळी साहित्याशिवाय कशी पुरी होईल? म्हणूनच तर वाचनवेड्या मराठी माणसाला उत्सुकता असते दिवाळी अंकांची. जसे ठेवणीतले कपडे, अलंकार, शोभेच्या वस्तू दिवाळीच्या निमित्तानं दृष्टीस पडतात, तसंच ठेवणीतलं, खास राखीव साहित्य दिवाळी अंकांनी जपलेलं असतं. आपल्या पिढ्यानपिढ्या दिवाळी अंकांच्या मोहिनीत गुंगल्या आहेत. गेल्या काही वर्षांत जसा आंतरजालाचा प्रचार आणि प्रसार वाढला, तसे कितीतरी जालीय दिवाळी अंक आपल्याला एका टिचकीसरशी झटपट वाचायला मिळू लागले.

जालरंग प्रकाशन ही साहित्यासाठी झपाटलेल्या काही सुहृदांची कल्पना. २००९ मधे "शब्दगाऽऽरवा" हा हिवाळी विशेषांक काढून या संस्थेनं आपली मुहूर्तमेढ रोवली, आणि आजचा हा दीपज्योती२०११ या संस्थेचा १०वा अंक! आजवर शब्दगाऽऽरवा २००९-१०, हास्यगाऽऽरवा [होळी विशेषांक] २०१०-११, ऋतू हिरवा [पावसाळी विशेषांक] २०१०-११, जालवाणी [ध्वनिमुद्रित साहित्य] २०१०-११, दीपज्योती [दिवाळी अंक] २०१० असे तब्बल ९ अंक दोन वर्षांत आम्ही रसिकार्पण केले. हा दहावा अंक म्हणजे विविध साहित्यप्रकाराने  रंगलेलं इंद्रधनुष्य! कथा, कविता, गझल, विडंबन, ललित, विज्ञान, तंत्रज्ञान, चरित्र, व्यक्तिचित्रण, वैचारिक, प्रवासवर्णन, छायाचित्रण, पुस्तक परिचय, चमचमीत पाककृती, विविध साहित्याचं अभिवाचन असं भरघोस रंगतदार साहित्य, थोडक्यात "जो जे वांछील तो ते लाहो" अशा स्वरूपाचा हा अंक रसिकांपर्यंत पोहोचविण्यात आमच्या संपादकीय तसंच तंत्रज्ञ चमूचा फार मोठा वाटा आहे. आपलं उत्तमोत्तम साहित्य या अंकासाठी पाठविणार्‍या सुहृद साहित्यिकांशिवाय या अंकाचं स्वप्नही पाहणं कठीण होतं. आणि रसिकहो, आपणाशिवाय आमच्या या धडपडीचं कौतुकं कोण करणार? आपली पसंती, आपले अभिप्राय, प्रतिसाद आमच्यासाठी नेहमीच मोलाचे, मार्गदर्शक ठरणारे आहेत. तेव्हा हा सर्वांगपरिपूर्ण, रंगतदार अंक वाचून आपले अनमोल विचार आम्हाला अवश्य कळवावेत. धन्यवाद.
आपणां सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. कळावे, लोभ असावा!
या अंकातील साहित्यामध्ये व्यक्त झालेली मते ही ज्या-त्या लेखक/लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत.त्यासाठी संपादक अथवा संपादन समितीमधील कुणीही जबाबदार राहणार नाही.

३५ टिप्पण्या:

Suhas Diwakar Zele म्हणाले...

क्रांतीताई, संपादकीय उत्तम जमलंय..

तुझ्या, देव काकांच्या आणि श्रेयाताईच्या मेहनतीचे हे फळ, मराठी साहित्य विश्वात एक अनोखी मुहूर्तमेढ रोवेल यात शंका नाही. आता अंक वाचायला घेतो. बाह्यरूप, सजावट खूप आवडली.

सर्वांचे अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा !!

Arati Khopkar (Aval) म्हणाले...

अरे वा ! छानच ! प्रमोद देव, क्रांती साडेकर आणि सगळे खुप छान झालाय अंक, अजून वाचतेय.तुम्ही सर्वांनी खुप मेहनत घेतली आहे. खुप खुप अभिनंदन आणि धन्यवादही :)
- आरती

Gangadhar Mute म्हणाले...

जोरदार, जोमदार आणि आंतरजालीय विश्वासाठी क्रांतीकारी झालेला दिसतोय दिवाळी अंक.

सुंदर संपादकीय, उत्तम सजावट आणि लेखक कविंची नामावली पाहता साहित्यही उच्च दर्जाचेच असणार, शंकाच नाही.

या सारस्वतांच्या मांदियाळीत माझ्या वेड्यावाकड्या आवाजालाही स्थान मिळाले, देवाची लीलाच म्हणावी लागेल याला.

पाषाणभेद म्हणाले...

अंक सर्वांगाने सुंदर झालाय. वरवर चाळला. अजून चकल्या, करंज्या, शेव, चिवडा तयार झाला नाही. तयार झाला की निवांत पाय ताणून देवून वाचतो.

मंदार जोशी म्हणाले...

देवकाका, नेहमीप्रमाणे प्रचंड मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आहे. अप्रतिम झालाय अंक. वाचेन तसं प्रतिसादही देईन त्या त्या लेखनावर.

पाषाणभेद म्हणाले...

अरे हो दिवाळीच्या शुभेच्छा द्यायच्या राहिल्याच की!
आपणा सर्वांना हि दिवाळी आनंदाची, भरभराटीची जावो.

विशाल विजय कुलकर्णी म्हणाले...

सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! हि दिवाळी आणि नववर्ष सर्वांना आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो हिच शुभेच्छा !
बाकी आपला अंक नेहमीच दर्जेदारच असतो. त्यामुळे ते वेगळे सांगणे नलगे :)
जसजसे वाचत जाईन तसे अभिप्राय नमुद करेनच!

Abhijit Dharmadhikari म्हणाले...

सुंदर दिवाळी अंक! अभिनंदन, देवकाका! :-)

प्रमोद देव म्हणाले...

अंकाचं देखणं स्वरूप हे केवळ श्रेयामुळेच शक्य झालंय...श्रेयालाच सगळं श्रेय आहे त्याचं...द्विरुक्ती झाली का? ;)

Kanchan Karai (Mogaraafulalaa) म्हणाले...

वा! अंक प्रथमदर्शनी आवडला. क्रांति, तुझी तर ओळ न्‌ ओळ वाचण्यासारखीच अस्तेच. अंकात सहभागी झालेल्या सर्व साहित्यकारांना मन:पूर्वक शुभेच्छा. सध्या इंटरनेटशी लपाछपी सुरू आहे, तेव्हा अंक सवडीने वाचेन व ऐकनदेखील. प्रतिक्रिया अर्थातच देणार! अंकाशी संबंधित सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!

jivanika म्हणाले...

अंक खूप छान झालाय !! अभिनंदन!!
आणि दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा!!!

अनामित म्हणाले...

आणि काका मला संधी दिल्याबद्दल आभार!! इतरही लेख वाचेनच आणि प्रतिक्रियाही नोंदवेन!!
पुन्हा शुभेच्छा!!

iravatee अरुंधती kulkarni म्हणाले...

वा!! छान अंक आहे.... अभिनंदन सर्वांचे! :-)

अनामित म्हणाले...

अंकातले सर्व विभाग चाळले. संपादकीय छानच झाले आहे. प्राजक्ता म्हात्र्यांची छायाचित्रमालिका खूप आवडली. बाकी विभाग सवडीने वाचेन.

अंकाच्या पानांची पार्श्वभुमी नयनरम्य (eye pleasing) असायला हवी होती. मोठी चित्र आणि भडक रंग यामुळे वाचनातले चित्त विचलित होते आहे.

- आश्लेषा

विनायक पंडित म्हणाले...

पहिल्याच चेंडूवर षटकार! असं वाटतंय इथपर्य़ंत आल्यावरच! देवकाका, क्रांति, श्रेया तुमचं मनापासून अभिनंदन!!! शुभेच्छा!

शांतीसुधा (Shantisudha) म्हणाले...

बझ्झवर अभिनंदन केलंच आहे आता इथेही करते. ह्या अंकाची संपादीका क्रांतीताई तसेच नेहमीच, प्रत्येक अंकाच्या पाठीशी उभी असलेली देका आणि श्रेता जोडगोळी यांचं विशेष अभिनंदन........इतका सुंदर आणि देखणा अंक दिल्याबद्धल! दिवाळी शुभेच्छांचा पॉप-अप आवडला. अंक सवडीनंच वाचावा-ऐकावा लागणार आहे. वाचल्यावर प्रतिक्रीया नक्कीच देणार.

ulhasbhide म्हणाले...

अंकावर खूप मेहनत घेतलेली दिसतेय.
.... देखणा आहे.
सर्वांचं अभिनंदन.
साहित्याची रेलचेल आहे.
हळू हळू वाचेन आणि अभिप्राय देईन.
दिवाळीच्या शुभेच्छा.

Meenal Gadre. म्हणाले...

मस्त रंगतदार झाला आहे. वर्गिकरण छान आहे

Jyoti Kamat म्हणाले...

अंक फारच सुंदर झालाय आणि त्यामागची मेहनत जाणवतेय. मी काहीबाही लिहून देवकाकांच्या ताब्यात दिलं. ते इतकं छान स्वरूपात येईल हे माहिती नव्हतं! सगळ्यांचं अभिनंदन, आभार आणि दिवाळी शुभेच्छा!!

२१ ऑक्टोबर २०११

shobha म्हणाले...

देवकाका, नेहमीप्रमाणे प्रचंड मेहनत घेतलेली स्पष्ट दिसते आहे. अप्रतिम झालाय अंक. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ! हि दिवाळी आणि नववर्ष सर्वांना आनंदाचे आणि सुख-समृद्धीचे जावो हिच शुभेच्छा !!!

राकेश दिनेश शेन्द्रे म्हणाले...

सुमोहक मुख;प्रुष्ठ , प्रान्जळ लेखन , गमतीदार किस्से , इत्यादी गोष्टींनी परीपुर्ण असा अंक .

हा केवळ "अंक" नसुन "उच्चांक" आहे .

अभीनंदन साहेब

सामान्य माणूस म्हणाले...

आज तुमचा अंक प्रकाशित झाला. माझ्या व्यापातून वेळात वेळ काढून हा अंक चाळला. जमलेले साहित्य अंकाची शोभा वाढवायचे काम करत आहे. अशीच भरपूर वैविध्यपूर्ण साहित्याची रेलेचेल यापुढच्या हिवाळी अंकात देखील असू द्यावी. तुमच्या टिमने केलेल्या अपार कष्टाचे(रोपट्याचे) आज वडाचे झाड झालेले आहे. माझ्या तुम्हा सर्व साहित्यिक मंडळींना मनापासून दिवाळीकरिता आणि या उपक्रमाकरता घेतलेल्या कष्टाला हार्दिक शुभेच्छा !
माझ्याच भाषेत लिहायचे तर,"हा ई अंक लई भारी झालाय"

हेरंब म्हणाले...

अप्रतिम झालाय अंक. हळूहळू वाचायला घेतोय.. नंतर सविस्तर प्रतिक्रिया देईनच.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रतिक ठाकूर म्हणाले...

अंक सध्या वर वर चाळला.
अंकाची मांडणी अतिशय आकर्षक आहे.
सविस्तर प्रतिसाद मागाहून येतीलच
ही केवळ पोच.
ज्या सर्वांचा हातभार या अंकासाठी लागला आहेत त्या सर्वांचे अभिनंदन आणि आभार. :)


सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

Wahida Kazi म्हणाले...

काकाश्री,
अगदी डोळ्यात भरण्यासारखा अंक दिसतोय...मेहनत रंग लाई है ! हळू ह्ळू प्रत्येक लेख वाचून प्रतिसाद अवश्य देईन .
दिपावलीच्या सर्व लेखक अन वाचकांना लक्ष लक्ष शुभेच्छा !!
~ वाहीदा

Deepak म्हणाले...

वा!.. दिवाळी मस्त जाणार आता... एकापेक्षा एक झकास दिवाळी अंक वाचायला मिळताहेत. टीमचे अभिनंदन व आभार. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

विजयकुमार देशपांडे म्हणाले...

दीपज्योती नमोस्तुते !
दिवाळी अंक चाळत आहे. खूपच छान !
दीपावली शुभचिंतन !

अनामित म्हणाले...

सुंदर झालाय काका अंक... तुमचे, क्रांतीताई चे आणि श्रेयाताईचे मन:पुर्वक अभिनंदन!!!

अंक हळूहळू वाचतेय.... प्रतिक्रीया नोंदवेनच!!!

Unknown म्हणाले...

ह्या अंकातील कल्पक आणि कलाकार ह्या प्रत्येकाचे मन:पूर्वक अभिनंदन, अंकाची मांडणी छान आहे. श्रेयाचे श्रेय आहे, हे फार ठळक जाणवले. पडद्यामागचे देव दिसले जाणवले.

मनीषा म्हणाले...

खूपच सुंदर दिवाळी अंक ..
सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा !!

Priyanka Joshi म्हणाले...

देव काका अंक खूपच छान झाला आहे. माझ्या घरी सगळ्यांना खूप आवडला. मला ह्या अंकात लेख लिहिण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून आभार
सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेछा

mukteshwar म्हणाले...

sarvang sundar aahe diwali ank

Shreya's Shop म्हणाले...

समस्त वाचकांना आणि अंकाच्या सजावटीला दाद दिलेल्या सर्वांना धन्यवाद. जालरंगच्या पहिल्या अंकापासून हे काम आवडीने घेतले होते. येणार्‍या प्रत्येक अंकात काहीतरी वेगळं द्यायचा प्रयत्न करत होते, कधी जमत होते तर कधी नव्हते. पण प्रत्येक वेळी वाचकांनी भरभरून दाद दिली. सगळ्यात मुख्य म्हणजे ब्लॉगरवर काम करण्याच्या मिळालेल्या संधीमुळे आणि देव काकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे बरेच काही शिकता आले. पुनश्च सगळ्यांना धन्यवाद आणि नुसतेच कौतुक नको तर चुका दाखवून कानही पकडा ही रसिक वाचकांना विनंती. दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

Alvika म्हणाले...

अंक खूपच सुंदर सजलाय. 'दिवाळी अंक' वाचण्याची खरच मजा लुटता येतेय.
साहित्याचे सर्व प्रकार अगदी लीलया बागडताहेत. मस्त.
मला ह्या सुंदर अंकात डोकावू द्यायची संधी मिळाली, हे माझे सदभाग्य.
धन्यवाद. आपणा सर्वांस ही दिवाळी सुख-समाधानाची व भरभराटीची जावो हीच शुभेच्छा.

amol mendhe म्हणाले...

wachtoy